उगवतीचे रंग
नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का ?
जेव्हा आपण नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का असा प्रश्न विचारतो, त्याच वेळी आपण नकळत हेही कबूल करतो की आज या घडीला नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. एकदा हे लक्षात आले म्हणजे तो थांबवता येईल का ? खरंच आपल्याला असं करणं शक्य आहे का आणि ते शक्य असेल तर ते कशा प्रकारे साध्य करता येईल असे प्रश्न मनात येतात. जेव्हा एखादी समस्या आपल्यासमोर उभी राहते, तेव्हा विचारान्ती तिचे उत्तर पण आपल्याला मिळू शकते. एखाद्या समस्येचे उत्तर नाही, अशी समस्या असू शकत नाही. म्हणूनच नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे.
नैतिकता, नैतिक मूल्य म्हणायला खूप मोठे शब्द वाटतात. असं वाटतं की ही काहीतरी कठीण गोष्ट आहे. पण तशी ती अजिबात नाही. मी समाजात वावरताना इतरांशी कसा वागतो, माझं वागणं इतरांसाठी आनंददायी ठरतं का की त्रासदायक ठरतं, माझ्याशी इतरांनी जसं वागावं असं मला वाटतं तसा मी इतरांशी वागतो का, मला अनंत अडचणी आल्या किंवा माझ्यासमोर काही प्रलोभनं उभी राहिली तर अशा वेळी मी माझी तत्त्वं गुंडाळून ठेवतो की त्याही परिस्थितीत कसोशीनं त्यांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टींवर माझी नीतिमूल्ये ठरतात. मी किती शिकलेलो आहे, माझ्याजवळ कोणती पदवी आहे, मी कोणत्या पदावर काम करतो, माझ्याकडे किती संपत्ती आहे या गोष्टी तुम्ही नीतिमूल्यांचं पालन करता की नाही याच्या आड येत नाहीत. किंबहुना नैतिक मूल्ये म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन करण्याची बाब असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
चारित्र्य, शील, संस्कार यासारख्या गोष्टी तर नैतिक मूल्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेतच पण तुम्ही समोरच्या व्यक्तीशी कसे वागता, एक व्यक्ती म्हणून समोरच्या व्यक्तीचा आदर करता का , त्याचं म्हणणं किंवा विचार शांततेनं ऐकून घेता का, स्वतःशी आणि समोरच्या व्यक्तीशी प्रामाणिक राहता का यासारख्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्या चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि संस्काराच्या निदर्शक आहेत. एखादी गोष्ट दुसऱ्याने करू नये असे जर आपल्याला वाटत असेल, तर आपणही ती करू नये हे उघडच आहे. बऱ्याच वेळेला व्यासपीठावरून मोठमोठी भाषणे देणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यात आणि बोलण्यात विसंगती आढळते. भ्रष्टाचार करू नका, लाच देऊ नका, हुंडा देऊ नका, हुंडा घेऊ नका, आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकवा असा विविध प्रकारचा कंठशोष बऱ्याच वेळेला व्यासपीठावरून होताना दिसतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात या व्यासपीठावरून बोलणाऱ्या व्यक्ती त्याच्या विपरीत वागताना आढळतात. म्हणूनच संत तुकारामांनी म्हटले आहे ' बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. '
आपली मुले शाळा, कॉलेजात जातात. तिथे त्यांना शिक्षण मिळते. माहिती मिळते. ज्ञान ही अजून पुढची पायरी आहे. पण शिक्षणासोबतच त्यांना नैतिक मूल्ये त्या ठिकाणी मिळतात का हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. ज्ञान किंवा माहिती आणि नैतिक मूल्ये यात एक मोठा फरक आहे. ज्ञान किंवा माहिती ही दिली जाऊ शकते, नैतिक मूल्ये दिली जाऊ शकत नाहीत. ती रुजवावी लागतात. अगदी शेतात शेतकरी जसे धान्य पेरतो तशीच. आणि ही पेरणी अगदी सुरुवातीपासून करावी लागते. मुले नैतिक संस्कार सांगून घेत नाहीत, तर वडीलधाऱ्यांच्या अनुकरणातून ते संस्कार, ती मूल्ये ग्रहण करतात. आईवडील, शिक्षक यांनी जर वेळ पाळली, वेळेचे महत्व ओळखले तरच मुलांना ते लक्षात येईल. चांगल्या गोष्टींची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते.
एक छानसा प्रसंग मला आठवतो. नीलिमा आणि अनुजा या दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटतात. अनुजा खूप दिवसांनी नीलिमाकडे येते. त्यांच्या गप्पा सुरु असतात. नीलिमाचा मुलगा सोहम एक पुस्तक वाचत असतो. ते पाहून अनुजा म्हणते, ' अग, सोहम किती शहाण्यासारखा वागतो ! तो चक्क गोष्टीचं पुस्तक वाचतोय. आमच्या सोनूला तर कितीही सांगा, तो अजिबात ऐकत नाही. सारखा मोबाईल किंवा टीव्ही बघत असतो. त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला किंवा टीव्ही बंद केला तर भयंकर गोंधळ घालतो रडून रडून. आणि अवांतर पुस्तक तर तो अजिबात हातात घेत नाही. ' यावर नीलिमा म्हणाली, ' अग, मुलं अनुकरणातून शिकत असतात. मी आणि माझे मिस्टर आम्ही आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करतो. टीव्हीसुद्धा आम्ही बघत नाही. आमचा टीव्ही बंदच आहे. आपण टीव्ही, मोबाईल बघायचा आणि मुलाला सांगायचं की तू अभ्यास कर, तर तो कसा ऐकेल ? आम्हाला असलेल्या फावल्या वेळेत आम्ही सुद्धा अवांतर वाचन करीत असतो. हे सगळं माझा मुलगा बघत असतो. त्यामुळे त्याला वाचन कर किंवा टीव्ही बघू नकोस हे वेगळं सांगावं लागत नाही. '
अनुजा म्हणाली, ' नीलिमा, आज तू माझे डोळे उघडलेस. मुलांवर संस्कार करायचे असतील तर कसं वागायचं याचं जिवंत उदाहरणच तू माझ्यासमोर ठेवलंस. '
आपण साने गुरुजींचं ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचतो किंवा तो चित्रपट बघतो. त्यात श्यामची आई प्रत्येक वेळी बोलता बोलता किती सहज संस्कार त्याच्या मनावर करते हे पाहण्यासारखं आहे. श्याम अंघोळ करून करून येतो तेव्हा तो म्हणतो, ' आई, माझ्या पायाला घाण लागेल. मी जमिनीवर पाय कसा ठेवू ? ' आई म्हणते, ' बाळ, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस, तसाच मनाला माती किंवा घाण लागू नये म्हणून जपत जा हो. ' ही संस्कारांची पाठशाळा आहे. ती घरापासून सुरु होते.
राम लक्ष्मण वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिकत असतात. तेव्हा ते इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच तेथील सर्व कामे करीत असतात. राजपुत्र म्हणून वेगळी सवलत ते घेत नाहीत किंवा त्यांना दिली जात नाहीत. त्यांचे शिक्षण जेव्हा पूर्ण होते आणि ते परत जायला निघतात तेव्हा वसिष्ठ ऋषी सर्व स्नातकांना उपदेश करताना म्हणतात, 'आज तुमचे आश्रमातील शिक्षण पूर्ण झाले आहे. पण खरे शिक्षण आयुष्यभर सुरूच असते. ' सा विद्याया विमुक्तये ' जे सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त करते, तेच खरे शिक्षण. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञेतून मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट केवळ मी सांगितली आहे म्हणून ती खरी आहे किंवा प्रमाण आहे असं मानू नका. तुम्ही स्वतः त्यावर विचार करा. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून निर्णय घ्या. आपल्या वागण्याने समाजाचं अहित तर होत नाही ना याची काळजी घ्या. ' हा गुरु वसिष्ठानी केलेला उपदेश आजही आपण त्यावर विचार करावा असा आहे. म्हणूनच त्यांच्या आश्रमातून राम लक्ष्मणासारखे शिष्य घडले.
आपल्याला पुढे असे दिसेल की अशा प्रकारचे शिक्षण आणि संस्कार घेतलेला राम पुढील आयुष्यात कितीही कसोटीचे, मोहाचे किंवा निराश करणारे प्रसंग आले तरी विचलित होत नाही. त्याच्या आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ स्थान आहे. रामाला राज्याभिषेक होणार असतो. त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग असतो. पण अशाच वेळी कैकयी आपले दोन वर दशरथाकडून मागून घेते आणि ज्याला राजा म्हणून गादीवर बसण्याची संधी मिळणार होती, त्याला वनात जावं लागतं तेही थोडथोडकं नव्हे तर चौदा वर्षांसाठी. पण राम विचलित होत नाही. आपल्या पित्याची आज्ञा त्याला शिरसावंद्य असते. खरे तर प्रजाजन त्याच्या पाठीशी असतात. लक्ष्मणासारखा भाऊ त्याला म्हणतो की तू उठाव करून अयोध्येचा राजा हो. सगळे तुझ्या पाठीशी आहेत. ' पण राम अविचल आहे. राज्याचा मोह, आपल्या तरुण पत्नीचा मोह त्याला अडवू शकत नाही. घरातून होणारे आणि शिक्षणातून संस्कार जर प्रबळ असतील तर असे श्रीरामासारखे मर्यादापुरुषोत्तम घडतात. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद घडतात आणि अखिल विश्वाला ते वंदनीय ठरतात.
आजही आपण ठरवले तर अशी व्यक्तिमत्वे घडवणे शक्य आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. मात्र सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागेल. एक गोष्ट मला आठवते. एक नातू आपल्या आजोबाना विचारतो, ' आजोबा, मी कोणत्या क्षेत्रात करिअर करू ? कोणत्या क्षेत्रात करिअरला वाव आहे ? ' आजोबा मोठं छान उत्तर देतात, ' बाळा, तू माणूस हो. माणूस बनण्याच्या क्षेत्रात अजिबात स्पर्धा नाही. ' आज आपण आपल्या मुलांनी वकील, डॉक्टर, इंजिनिअर वा अन्य कोणी उच्च पदस्थ व्यक्ती व्हावे, त्यांनी परदेशात जावे, भरपूर पैसे कमवावे असा विचार करतो. तसे शिक्षण त्यांना देतो. पण आपण त्यांना तू माणूस हो, एक चांगला नागरिक हो असे कितपत सांगतो ? ' आज विज्ञानात प्रगती केलेला माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला आहे. कदाचित तो ब्रह्माण्डालाही गवसणी घालेल. पण माणूस माणसापासून दूर जातो आहे, नैतिक मूल्ये हरवून बसतो आहे. पण हताश होऊन हातपाय गाळून बसून चालण्यासारखे नाही. ' एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईन. ' सुरुवात करायलाच हवी आणि मुळापासून करायला हवी.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा