मुख्य सामग्रीवर वगळा

स्वदेशीची जादू - भाग आठ बारा बलुतेदारी आणि फड पद्धती

उगवतीचे रंग 

 स्वदेशीची जादू - भाग आठ 

बारा बलुतेदारी आणि फड पद्धती 

सकाळची रम्य वेळ होती. श्यामराव आनंदात गाडी चालवत होते. बऱ्याच दिवसांनी आपला बालमित्र भेटल्याने आणि त्याच्याकडे राहून गप्पा मारल्याने त्यांचा मूड फ्रेश होता. छानपैकी ऊन पडले होते. वातावरणात सुखद गारवा होता. ' फिटे अंधाराचे जाळे ' हे गाणे त्यांच्या ओठी त्या वातावरणामुळे आपोआप आले होते. सोपानरावांकडे रात्रभर मुक्काम केल्यामुळे पिंकी आणि राजेश खुश होते. सोपानरावांनी गावात त्यांना कुंभार आळी, रामू लोहाराचे दुकान आदी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आणल्याने त्यांना त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या मनात त्याबद्दल बरेच प्रश्न होते. गाडीत त्याबद्दल त्यांच्या गप्पा सुरु होत्या. 

श्यामलाताई आणि सोपानराव यांचे एक वैशिष्ट्य होते. मुलांची उत्सुकता आणि कुतूहल ते कधी दाबून ठेवत नसत. आपल्या परीने ते त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीत असत. माहिती नसेल तर माहिती घेऊन सांगत. श्यामराव आणि श्यामलाताई या दोघांचेही अवांतर वाचन बऱ्यापैकी होते. त्यामुळे ते मुलांचे कुतूहल शमवू शकत. मुलांनाही आपल्या आईवडिलांबाबत धाक असण्याऐवजी प्रेम आणि आदर होता. 

पिंकी शामलाताईंना म्हणाली, ' आई, सोपानकाकांच्या छोट्याशा गावात किती नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या नाही ? त्या गावात कितीतरी वस्तू बनवणारे कारागीर आहेत. त्यांना बहुतेक गोष्टी गावातच मिळून जात असतील, नाही का ? ' 

' पिंकी, अग स्वातंत्र्यपूर्व काळात तर आपली खेडी अतिशय स्वयंपूर्ण होती. गावातील लोकांच्या सगळ्या गरजा गावातच भागवल्या जात. एवढंच नाही तर गावातील लोक विविध वस्तूंचे उत्पादन करून शहरातील लोकांना पुरवठा करीत. भारतात जवळपास साडेसात लाख खेडी होती. खेडी म्हणजे उद्योगाची उत्तम केंद्रे होती. या गावांमध्ये इतके उत्पादन व्हायचे की गावातील लोकांच्या साऱ्या गरजा भागून त्या वस्तू निर्यात व्हायच्या. 

' खेड्यातील हे सगळे कारागीर शेतकऱ्याला मदत करणारे असायचे. शेतकऱ्याचे काम ज्यांच्यावाचून अडून राहायचे अशा कारागिरांना बलुतेदार म्हणत असत. आणि ज्यांच्यावाचून शेतकऱ्याचे काम फारसे अडत नसे किंवा कधीतरी त्या लोकांची गरज लागे अशा लोकांना अलुतेदार म्हणत. ' श्यामलाताई म्हणाल्या. 

' अलुतेदार आणि बलुतेदार  किती गमतीदार शब्द आहेत ! हे आम्हाला नवीनच कळले. ' राजेश म्हणाला. ' आई, शेतकऱ्यांना ज्यांची गरज लागत असे बलुतेदार कोण मग ? ' 

' राजेश आणि पिंकी, अशा बलुतेदारांची संख्या साधारणपणे बारा होती म्हणूनच त्यांना बारा बलुतेदार म्हणत. काल सोपानकाकांच्या गावात तीन चार बलुतेदारांना आपण भेटलो. आपण रामुकाकांच्या दुकानावर गेलो. ते शेतकऱ्यांना लागणाऱ्या लोखंडाच्या वस्तू बनवतात. जसे नांगर, कुदळ, फावडे,विळा इ. ते लोहार. हरीकाका कुंभार मातीच्या वस्तू बनवतात. त्या सगळ्या गोष्टी रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या आहेत. सुतारकाका लाकडाच्या वस्तू बनवत होते. त्याही शेतीला लागणाऱ्या असतात. अशी आणखी शेतकऱ्याच्या उपयोगी पडणारी माणसे म्हणजे परीट, न्हावी,  सोनार, तेली, माळी, कोळी. मांग, महार. ' 

' बाळांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जातींबद्दल बोलत नसून बारा बलुतेदारांबद्दल बोलतो आहोत. ते ती ती कामे करीत असत. परीट गावातील लोकांचे कपडे घरोघर जाऊन गोळा करायचे आणि ते स्वच्छ धुवून आणून द्यायचे. आजकाल आपल्या शहरातील लॉंड्री जे काम करतात, ते काम परीट किंवा धोबी करीत असत. त्यांच्याबद्दल एक गमतीदार गोष्ट सांगू ? ' 

' हो आई, सांग ना. आम्हाला आवडेल ऐकायला, ' राजेश म्हणाला. 

राजेश, या परीट समाजातील लोक व्यायाम करून आपले शरीर बळकट ठेवत असत. बरेचसे लोक उत्तम कुस्तीगीर किंवा पहिलवान असायचे. तुम्ही कुस्तीच्या डावातला ' धोबीपछाड ' शब्द ऐकला असेल. खेळातील ही युक्ती अवलंबून ते आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत. धोबीपछाड हा डाव यांनीच शोधला बरं का ! ' 

पिंकी हसत म्हणाली, ' आई, धोबीपछाड देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आता कळला बघ. ' पण आई इतर लोकांची काय कामे होती ते पण सांग ना ' 

' हो हो सांगते ना. गावातील लोकांच्या विविध गरजा हे लोक पुरवायचे. त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार नावं पडली. आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी तेल लागते. गावात तेलाचे उत्पादन करण्याचे काम तेली करीत. सोनार लोक दागदागिने, देवांच्या मूर्ती बनवत. शेतात फळे, फुले, भाज्या पिकवणे हे काम माळी करत. देवांची पूजा करणे, मंदिरांची व्यवस्था राखणे आदी कामे गुरव करत. कोळी समाजातील लोक नदीच्या पुरावर लक्ष ठेवणे, गावाच्या संरक्षण व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे आदी कामे करत. पूर्वी महार म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या बहुतेकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांना नवबौध्द असे म्हटले जाते. ते आणि मांग किंवा मातंग समाजातील लोक चौकीदारी करणे, ओरडून दवंडी देणे अशी कामं ही मंडळी करीत. त्याचप्रमाणे केकती पासून दोर वगैरे तयार करणे, झाडू तयार करणे, घरांची तोरणे तयार करणे आदी कामे ते करत. ' 

' आई, ही सगळी मंडळी किती महत्वाची कामे करीत होती नाही ? गावातील लोकांच्या सगळ्या गरजा त्यातून नक्कीच भागत असतील. ' राजेश म्हणाला. 

' हो, अरे पूर्वीचं ग्रामीण भागातील लोकांचं सगळं जीवनच या लोकांवर अवलंबून असायचं. शिवाय या सगळ्या बारा बलुतेदार लोकांमुळे एकमेकांच्या गरजा भागायच्या. त्यामुळे सगळे एकोप्याने राहत होते. प्रत्येकाचेच काम महत्वाचे होते. त्यामुळे गावात शांततेचे वातावरण असायचे. काही वाद झाले तरी गावातच पंचायतींमार्फत लोकांचे प्रश्न सोडवले जायचे. त्यात दोन्ही बाजूंच्या लोकांचे समाधान व्हायचं बरं का !'श्यामलाताई म्हणाल्या. 

' वा वा श्यामल, छान माहिती सांगितली बरं का मुलांना, ' श्यामराव म्हणाले. मी पण तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो, गाडी चालवता चालवता, चालेल ना ? की आईचंच ऐकायचंय ? श्यामराव हसत हसत उदगारले. 

' अहो बाबा, तुमचं ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तुम्ही काहीतरी वेगळी माहिती सांगता. तुम्ही सांगा ना या बारा बलुतेदारांबद्दल काहीतरी. मी घरी गेल्यावर ही सगळी माहिती छान लिहून काढणार आहे. आमच्या शाळेच्या नियतकालिकात ही माहिती घ्या म्हणून मी आमच्या बाईंना विनंती करेन. ' पिंकी म्हणाली. 

' अरे वा, छानच ! बाळांनो, एक महत्वाची गोष्ट तर आईकडून सांगायची राहिलीच. हे बारा बलुतेदार आहेत ना, वर्षभर शेतकऱ्यांच्या गरजा भागवायचे. मग शेतकरी त्यांना हंगाम म्हणजेच त्यांच्या शेतात पीक आलं की प्रत्येकाचा वाटा द्यायचे. अशा रीतीने सगळेच घटक एकमेकांवर अवलंबून असायचे. ' एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ' ही उक्ती त्यांनी खरोखर आचरणात आणली होती बरं का ! ' आणि बरं का प्रत्येक समाजात अतिशय चांगली माणसे होऊन गेली. संत होऊन गेले. त्यांनी लोकांना सदाचरणाचा, भक्तिमार्गाचा उपदेश केला. ' बाबा म्हणाले. 

' हो बाबा, बरोबर आहे. माळी समाजात श्री संत सावता माळी, तेली समाजात संत जगनाडे महाराज, शिंपी समाजात संत नामदेव, चर्मकार म्हणजे चांभार समाजात संत रोहिदास, कुंभार समाजात संत गोरा कुंभार, धोबी समाजात संत गाडगे बाबा असे अनेक संत प्रत्येक समाजात होऊन गेले. बरोबर आहे ना बाबा ? पिंकी म्हणाली. 

' हो अगदी बरोबर सांगितलंस पिंकी. या संतांनी भक्तिमार्गाबरोबरच मानवतेची सुद्धा शिकवण लोकांना दिली. परमेश्वराची भक्ती आपलं काम करता करता सुद्धा करता येते याचा आदर्श स्वतःच्या उदाहरणाने लोकांना घालून दिला. ' बाबा म्हणाले. ' अजून एक नवीन माहिती सांगतो तुम्हाला. तुम्ही फड पद्धतीबद्दल कधी ऐकलं आहे का ? ' 

' फड पद्धत ? आम्ही तर पहिल्यांदाच ऐकतो आहोत. ' पिंकी म्हणाली. 

' श्यामल, तुला माहिती आहे का याबद्दल ? ' श्यामरावांनी विचारले. 

' अहो, आता तुम्ही सुरुवात केली आहे, तर तुम्हीच सांगा की मुलांना. मला पण याबद्दल फारशी माहिती नाही. ' श्यामलाताई म्हणाल्या. 

' ठीक आहे. थोडक्यात सांगतो. ही फार जुनी पद्धत आहे. मौर्य काळापासूनची किंवा त्याही पूर्वीची. अहिल्या होळकरांच्या काळातही ही पद्धत वापरली जात होती. आपल्या महाराष्ट्रात तर फार फार पूर्वीपासून होती. पण आता लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही. '

' या पद्धतीत नदीला वळण बंधारा घालून पाणी शेतीकडे वळवलं जाई. छोटे छोटे बंधारे असत. प्रत्येक जण आपल्या हद्दीतून जाणाऱ्या बंधाऱ्याची देखभाल करीत असे. जमिनीचे विभाग केले जायचे. त्यांना फड म्हणत. गावातील सगळे शेतकरी एकत्र यायचे आणि कोणत्या जमिनीच्या तुकड्यावर कोणते पीक घ्यायचे हे ठरवायचे. त्यानंतर सगळ्या शेतजमिनीची वाटणी व्हायची. गावातील जमिनीच्या एक चतृर्थांश जमीन तशीच ठेवली जायची बरं का ! ही जमीन गायरान म्हणून वापरली जायची. बाकी जमिनीत सर्वांच्या सहकार्याने बारमाही, सहामाही, चारमाही अशी पिके घेतली जायची. शेतात लागवड आणि पिकांची जोपासना करण्यासाठी सगळे एकमेकांना मदत करायचे. मग कापणीनंतर पीक सर्वांमध्ये वाटले जायचे. यात बारा बलुतेदारांना पण त्यांचा हिस्सा दिला जायचा. 

या पद्धतीचे खूप फायदे होते. सर्वाना पाहिजे तशी पिके लावली जायची. त्यामुळे जास्त उत्पादन किंवा अपव्यय टाळला जायचा. शिवाय जमिनीचा कस टिकून राहायला मदत व्हायची. गायरानाची जमीन सुद्धा दरवेळी बदलली जायची. सर्वांच्या गरजा भागायच्या. गावे सर्व बाबतीत स्वावलंबी व्हायची. गावात कोणी उपाशी, भिकारी किंवा बेरोजगार राहात नव्हता. यापेक्षा सहकाराचे सुंदर उदाहरण दुसरे कोणते असू शकेल ? चला, आता आपण थोडा ब्रेक घेऊ या. जेवण घेऊन मग पुढे जाऊ या. ' बाबा म्हणाले. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१०/०८/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...