उगवतीचे रंग
स्वदेशीची जादू - भाग १२
चंद्र आहे साक्षीला
राजेश आणि पिंकी ही नव्या पिढीतील मुले होती. ज्ञान आणि माहिती मिळवण्याची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सतत कुठली तरी गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल त्यांना असायचं. त्यांच्या या ज्ञानयज्ञात भर घालण्याचे कार्य श्यामराव आणि श्यामलाताई त्यांच्या परीने करीतच होते. कधी कधी भगवानकाका त्यात मोलाची भर घालत. तशातच २३ ऑगस्ट २०२३ चा दिवस उजाडला. या दिवशी भारत आपले चंद्रयान-३ चंद्रभूमीवर उतरवणार होता. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु होते. सगळ्यांच्याच नजरा समोरच्या पडद्यावर खिळून होत्या. क्षणाक्षणाला चंद्रयान आणि चंद्राचा पृष्ठभाग यातील अंतर कमीकमी होत होते. संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी ' विक्रम ' लॅण्डर अलगदपणे चंद्राच्या जमिनीवर उतरले.
१४ जुलै २०२३ रोजी सुरु झालेली ही भारताची चंद्रझेप २३ ऑगस्टला यशस्वीपणे समाप्त झाली. बंगळुरूच्या नियंत्रणकक्षात काहीशा तणावात असलेल्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे चेहरे आनंदाने फुलून आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. भारताने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय होता. अजूनपर्यंत चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणे कोणत्याही देशाला शक्य झाले नव्हते त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताने आपले यान यशस्वीपणे उतरवले होते. अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या पंक्तीत आता भारत सन्मानाने जाऊन बसला होता. संपूर्ण देशात या अभूतपूर्व यशाने आनंदाचे वातावरण होते. ठिकठिकाणी लोक विजयोत्सव साजरा करीत होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे होते. त्यांनी तिथूनच आपल्या देशातील वैज्ञानिकांशी आणि देशवासियांशी संपर्क साधला. आपल्या वैज्ञानिकांचे आणि देशातील जनतेचे अभिनंदन केले. या आनंदाच्या प्रसंगात त्यांनी अखिल विश्वालाही आपल्यामध्ये सामील करून घेतले. हे यश केवळ भारताचे नाही तर अखिल मानवजातीचे आहे असे गौरवोदगार त्यांनी काढले. भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी असा पहिला संदेश यानाने पाठवला. ' मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो आहे आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा ! '
श्यामराव आणि श्यामलाताईंचे डोळे या आनंदाच्या क्षणाने नकळत पाणावले. मुलांनी टाळ्या वाजवल्या. श्यामलाताईंनी घरातील सगळ्यांच्या हातावर थोडी साखर ठेवली. एवढ्यात श्यामरावांना एक फोन आला. तो फोन त्यांच्या कॉलेजमधील मित्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ राव यांचा होता. ते म्हणाले, ' श्यामराव, उद्या आपल्या येथील महाविद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी माझ्या भाषणाचे आयोजन केले आहे. तू , वहिनी आणि मुलांना घेऊन जरूर ये. मी चंद्रयान मोहिमेची माहिती सांगणार आहे. ' हे ऐकून श्यामरावांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, ' अरे बरं झालं. नाहीतरी मुलांना अनेक प्रश्न असतातच. मुलांनाच काय आम्हालाही बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. तेव्हा तुझं भाषण म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. आम्ही सगळे नक्की येतो. '
श्यामराव, श्यामलाताई , राजेश आणि पिंकी वेळेआधीच डॉ कलाम हॉलमध्ये जाऊन आपापल्या जागी स्थानापन्न झाले. अर्थात भगवानराव आणि श्यामरावांचे इतरही मित्र या कार्यक्रमासाठी हजर होतेच. राजेश आणि पिंकी यांच्या शाळेतील इतरही निवडक विद्यार्थ्यांना या प्रसंगी बोलावण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकही हजर होते. सगळ्यांनाच डॉ राव काय सांगतात याची उत्सुकता लागून राहिली होती. सुरुवातीच्या औपाचारिक स्वागत आणि परिचयानंतर डॉ राव यांनी माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांनी माहिती देताना प्रोजेक्टरचा वापर केल्याने त्यांचे भाषण अधिकच प्रभावी झाले होते. वेळोवेळी ते समोरच्या पडद्यावर चंद्राच्या पृष्ठभागाचे, यानाचे फोटो आणि इतर माहिती दाखवत होते.
'आपण सगळ्यांनी काल चंद्रयानाचे चंद्रावरचे अवतरण पाहिलेच आहे. आपल्या देशाचे हे मोठे यश आहे. पण हे यश एकाएकी मिळालेले नाही. यामागे वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. चंद्रयान मोहीम एक आणि दोन यातील यशापयशानंतर त्यातील यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता आपल्या वैज्ञानिकांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यातूनच आजचे हे दैदिप्यमान यश आपल्याला प्राप्त झाले. मी तुम्हाला माहिती तर सांगणारच आहे पण काही प्रश्नही विचारणार आहे. तुम्ही पण तुमच्या मनातील शंका विचारू शकता. तुम्हाला सांगता येईल का की मानवाने चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले ? '
' २० जुलै १९६९ या दिवशी अमेरिकेच्या अपोलो ११ या यानातून मानवाचे पहिले पाऊल चंद्रभूमीवर प्रथम पडले. ' पिंकीने उत्तर दिले.
' शाब्बास, बेटा. अगदी बरोबर उत्तर दिलेस, ' डॉ राव म्हणाले आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारतो. बघा, कोणाला सांगता येतं का ? या यानातून प्रवास करणारे आणि चंद्रभूमीवर पाऊल ठेवणारे अंतराळवीर कोण ? '
' मी सांगतो, ' राजेश म्हणाला. ' सर, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. '
' अगदी बरोबर,' डॉ. राव म्हणाले. ' आणि या यानाला लुनार मोड्युल असे म्हणत. नंतर २००३ साली चीनने चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवले आणि मग भारताला आपणही चंद्रयान मोहीम हाती घ्यावीशी वाटू लागली. तशी ती या[आपण घेतली सुद्धा ! आणि त्यानंतर फक्त पाच वर्षातच आपले चंद्रयान १ यशस्वीरीत्या चंद्रावर गेले. या यानाने आपली कामगिरी चोख बजावली बरं का ! जवळपास वर्षभर त्याने चंद्राच्या पृष्ठभूमीवरची विविध प्रकारची माहिती आपल्याला पाठवली. ही गोष्ट आहे २००८ मधली. याच वर्षात आपल्या देशाने ११ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले आणि त्यातील १० उपग्रह हे एकाच प्रक्षेपकाने म्हणजे रॉकेटने अंतराळात सोडले. ' डॉ राव बोलतच होते. सगळे लक्षपूर्वक ऐकत होते. त्या आधी ५ ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची म्हणजेच इस्त्रोची स्थापना करण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०१४ रोजी आपले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले. या पहिल्याच प्रयत्नात आपण यश प्राप्त केले आणि असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.
' याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का ? भारताने असे रॉकेट विकसित केले की जे वेगवेगळे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी उपयोगी पडतील. त्याला म्हणतात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन म्हणजे इंग्रजीत ज्याला म्हणतात पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल अर्थात पी एस एल व्ही. या पी एस एल व्ही ने इस्रोच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला. २००८ मध्ये या एकाच वेळी दहा उपग्रहांचे प्रक्षेपण केले गेले. शास्त्रंज्ञांचे हे फार मोठे यश होते. यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताच्या अंतराळ मोहिमांचा खर्च खूप कमी व्हायला मदत झाली. त्याशिवाय भारताने आपल्या उपग्रहांसोबतच इतर देशांचेही उपग्रह प्रक्षेपण करून परकीय चलनही प्राप्त केले.आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ भूस्थिर उपग्रह इस्त्रोने अवकाशात यशस्वी रित्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ करोड अमेरिकन डॉलर इतका आहे.त्यानंतर भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान अर्थात जी एस एल व्ही म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल आपण साधारणपणे इ.स. २००० मध्ये आपण विकसित केले. त्याच्या साहाय्याने अधिक वजनाचा उपग्रह आपण प्रक्षेपित करू शकतो. चंद्रयान-३ मोहिमेसाठी जी एस एल व्ही मार्क -३ किंवा एल व्ही एम -३ असेही म्हटले जाते, त्याचा वापर करण्यात आला.
त्यापूर्वी आपला उपग्रह ' आर्यभट्ट ' आपण १९७५ मध्ये अवकाशात सोडला होता पण त्यासाठी रशियन रॉकेटचे साहाय्य घ्यावे लागले होते. उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते. ते त्यावेळी भारताकडे नव्हते. क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान अमेरिका, रशिया, जपान आदी निवडक देशांकडेच उपलब्ध होते. पण या देशांनी भारताला हे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. '
' सर, पण हे देश भारताला हे तंत्रज्ञान द्यायला का तयार झाले नाहीत ? ' एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला.
' सांगतो. छान प्रश्न विचारलास. अमेरिकेसारख्या देशांना भीती वाटत होती की भारत या तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धात हानी करणारे मिसाईल्स बनवू शकेल. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारताला देणे त्यांना धोक्याचे वाटत होते. शिवाय करोडो डॉलर्स खर्च करून अंतराळात जाऊ पाहण्याऱ्या देशांना भारताने त्यांच्याशी स्पर्धा करू नये असेही वाटत होते. '
' पण तुम्हाला अभिमानाने सांगतो की भारतीय वैज्ञानिकांनी हे आव्हान स्वीकारले. १९९४ मध्ये त्यांनी यावर संशोधन करायला सुरुवात केली. त्यानंतर बरोबर २० वर्षांनी भारताने विकसित केलेल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या आधारे २०१४ मध्ये पहिल्या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आणि भारत अशा आघाडीच्या सहा देशांमध्ये जाऊन बसला. त्या आधी ५ ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची म्हणजेच इस्त्रोची स्थापना करण्यात आली होती. अनेक अडथळे, अडचणींना तोंड देत इस्रोने आपली वाटचाल सुरूच ठेवली. २४ सप्टेंबर २०१४ रोजी आपले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले. या पहिल्याच प्रयत्नात आपण यश प्राप्त केले आणि असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. २०१९ मध्ये आपण ' शक्ती ' हे अँटी सॅटेलाईट मिसाईल सुद्धा विकसित केले. पण अर्थात तो वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे.
उपस्थितांमधून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तेवढ्यात एका विद्यार्थ्याने हात वर केला. तो म्हणाला, ' सर, या सगळ्या गोष्टी खूपच अभिमानास्पद आहेत पण क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय हे जरा स्पष्ट करून सांगाल का ? '
' सांगतो ' डॉ राव म्हणाले. मला आनंद होतो आहे की तुम्ही या विषयात एवढा रस घेऊन ही माहिती समजून घेत आहात. तर क्रायो म्हणजे अत्यंत कमी तापमान. आपली नेहमीची इंजिने अत्यंत कमी तापमानात कमी करू शकत नाही. मग अशावेळी इंजिन आणि इंधनही त्याप्रकारचे विकसित करावे लागते. त्यात द्रवरूप ऑक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजनचा वापर केला जातो. त्यांना क्रमशः उणे १८३ आणि उणे २५३ डिग्री सेंटीग्रेड तापमानावर साठविले जाते. अवकाशातील यानासाठी अशाच प्रकारे काम करणारी क्रायोजेनिक इंजिने उपयोगात आणली जातात. '
' बापरे, केवढे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान ! राजेश पिंकीला म्हणाला. पण यामुळे भारत त्याबाबतीत स्वावलंबी झाला. त्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. पिंकी म्हणाली.
डॉ राव पुढे बोलतच होते. २२ जुलै २०१९ रोजी भारताने चंद्रयान-२ चे प्रक्षेपण केले. पण यात ज्याला आपण सॉफ्ट लँडिंग म्हणतो, तशा पद्धतीने यान चंद्रावर उतरवण्यास आपल्याला अपयश आले. पण या मोहिमेतील चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर आजही कार्यरत असून आपल्या चंद्रयान-३ या मोहिमेसाठी त्याच्या माहितीचा मोठाच उपयोग झाला. भारताची ही चंद्रयान-३मोहीम चंद्रावरील अवघ्या एका दिवसाची पण पृथ्वीवरील १४ दिवसांएवढी असणार आहे. पण भविष्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची आहे. चंद्रयान अलगद उतरण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी या मोहिमेचा मोठाच हातभार लागलेला आहे.
चंद्रयानाचा विक्रम लॅण्डर चंद्रावर सुखरूप उतरल्यामुळे आपली वैज्ञानिक क्षमता सिद्ध झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलो आहोत. आजपर्यंत तिथे पोहोचणे कोणालाही शक्य झाले नव्हते. जैव-भौगोलिक दृष्ट्या या भागाचे एक वेगळे महत्व आहे. प्रज्ञान बग्गी आणि विक्रम लँडरमुळे चंद्राविषयीची नवनवीन माहिती जगासमोर यायला मदत होणार आहे. त्यामुळेच चंद्रयान-३ चे महत्व केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठीच महत्वाचे आहे.
अवकाश मोहिमांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानही प्रगत होत असते. या मोहिमेमुळे आपले परग्रहावर उतरण्याची क्षमता विकसित होणार आहे. त्याचा भविष्यातील मोहिमांसाठी नक्कीच फायदा होईल. केवळ अवकाश मोहिमाच नाही तर मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. शिवाय भविष्यातील सूर्य, मंगळ, शुक्र यांचा अभ्यास करण्यासाठी ज्या मोहिमा आखल्या जातील, त्या दृष्टीनेही ही मोहीम महत्वाची आहे. शिवाय आपल्या गगनयान या मोहिमेसाठी पण याचा उपयोग होणार आहे. या मोहिमेत अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे, त्यांना प्रशिक्षण देणे यासाठी ही चंद्रमोहीम खूप उपयोगाची ठरणार आहे. '
एवढ्यात काहीतरी विचारण्यासाठी पिंकीने हात वर केला. ती म्हणाली, ' सर, या मोहिमेतील लँडरला ' विक्रम ' हे नाव देण्यामागे काही खास कारण आहे का ? '
' बरोबर, अगदी महत्वाचा प्रश्न विचारलास, ' डॉ राव म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ विक्रम साराभाई यांना भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे योगदान आणि कामगिरी प्रचंड आहे. त्यांच्या स्मरणार्थ या लँडरला त्यांचे ' विक्रम ' हे नाव देण्यात आले आहे. आणि या ' विक्रम ' ने आपले सगळे टप्पे यशस्वीपणे पार करून चांद्रभूमीवर यशस्वीपणे नियोजितपणे सॉफ्ट लँडिंग केले. हाही एक विक्रमच आहे. त्यामुळे या यानाचे ' विक्रम ' हे नाव अगदी सार्थ ठरले. या लँडरचे बहुतेक सगळे भाग विविध भारतीय कंपन्यांनी आणि तंत्रज्ञांनी बनवले आहेत. त्यामुळे हा लॅण्डर म्हणजे भारताचे स्वरूपच आहे असे म्हणायला हरकत नाही. या मोहिमेत भारतभरातील शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. त्यामुळे हा एक नवा भारत आहे. ' श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
' सर, या मोहिमेत कोणत्या प्रमुख शास्त्रज्ञांचा सहभाग होता ?' एका विद्यार्थ्याने डॉ राव यांना विचारले.
' उत्तम प्रश्न. डॉ राव म्हणाले. त्यांची नावं तर मी सांगणारच आहे पण या प्रसंगी मला डॉ विक्रम साराभाई यांच्यासोबतच डॉ होमी भाभा, सतीश धवन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम, के सिवन इ. मान्यवरांची सुद्धा तीव्रतेने आठवण होते आहे. आपण सर्वांनी प्रक्षेपण पाहताना पाहिलंच असेल की त्यावेळी एस सोमनाथ यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत होता. ते सध्या इस्त्रोचे प्रमुख आहेत. शिवाय डॉ एस उन्नीकृष्णन अय्यर, डॉ. पी वीरमुथुवेल, एस शंकरन, एस मोहनकुमार, ए राजराजन, कल्पना कालहस्ती यांचाही प्रमुख वैज्ञानिकांत समावेश आहे. '
प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी विश्वाचा वेध आपल्या अंतर्दृष्टीने घेतला. त्यातून विश्वहिताचे पाठ देणारी उपनिषदे प्रकटली. आज आपले भारतीय वैज्ञानिक आपल्या अजोड कामगिरीने याच विश्वाचा आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून वेध घेत आहेत. भारतातील प्राचीन ज्ञानसृष्टी आणि अर्वाचीन विज्ञानसृष्टी यांचा सुरेख मेळ भारताला आणि जगाला निश्चितपणे प्रगतीपथावर नेईल. ज्या देशाला साप, नाग आणि गारुड्यांचा देश म्हणून परकीयांकडून आतापर्यंत हिणवले जात होते, त्याच देशाने केलेली ही नेत्रदीपक प्रगती आहे हे सांगताना मला प्रचंड अभिमान वाटतो. आजही या मोहिमेच्या यशासाठी काही ठिकाणी पूजापाठ, होमहवन, प्रार्थना करण्यात आल्या. त्यामागील लोकांची सद्भावना आणि देशप्रेम आपण समजून घेतले पाहिजे. अर्थात विज्ञानातील कोणतेही यश हे वैज्ञानिक कसोट्यांचे संपूर्ण पालन केल्यानंतरच मिळत असते हेही आपण त्याबरोबर लक्षात ठेवले पाहिजे.
या मोहिमेच्या यशाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्याला आपल्या ' विक्रमाची ' कल्पना येईल. सुमारे सहा हजार किमी इतक्या प्रचंड वेगात आपली परिक्रमा करणाऱ्या यानाचा वेग फक्त १० किमी प्रति तास इतका कमी करणे आणि आडवे धावणाऱ्या यानास अचानक उभे करून पृष्ठभागावर उतरवणे ही गोष्ट कल्पनाही करता येणार नाही इतक्या गुंतागुंतीची आहे. म्हणूनच हे यश महत्वाचे ठरते. गेल्या ७० वर्षात विविध देशांनी जवळपास १११ चांद्रमोहिमा हाती घेतल्या. त्यातील फक्त आठ यशस्वी ठरल्या. त्यातील आजची नववी. म्हणूनही हे यश अभूतपूर्व आहे.
मित्रहो, कोणतेही यश एकाएकी मिळत नाही. पहिल्या चांद्रयान मोहिमेनंतर ११ वर्षांनी आपली दुसरी चांद्रयान-२ मोहीम अयशस्वी ठरली तरी आपल्या वैज्ञानिकांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नाही. सतत शिकणे, अपयशी होणे, अपयशातून शिकणे, नवनवीन प्रयोग करीत राहणे हे त्यांनी सुरूच ठेवले. त्याच प्रयत्नातून मिळालेले हे यश आहे. ऑगस्ट महिना हा आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि याच ऑगस्ट महिन्याच्या २३ तारखेला २०२३ मध्ये आपण यशस्वीपणे चंद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. यापुढे २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
भारतीय आणि चंद्राचे खूप जुने प्रेमळ नाते आहे. हा चांदोबा, चांदोमामा आता आपल्या जवळ आला आहे. खऱ्या अर्थाने ' मामाच्या गावाला जाऊ या ' असे आपल्याला आता म्हणता येणार आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. चंद्र आहे साथीला आणि साक्षीला सुद्धा ! ' या शब्दात डॉ रावांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डॉ राव यांचे आभार मानले. श्यामराव, श्यामलाताईंनी डॉ राव यांना भेटून राजेश आणि पिंकीची ओळख करून दिली. या हुशार आणि चुणचुणीत मुलांचे डॉ राव यांनी अतिशय कौतुक केले. त्यामुळे राजेश आणि पिंकी खूपच आनंद झाला.घरी गेल्यावर राजेश आणि पिंकीने चंद्रयान मोहिमेची आणि इस्त्रोची माहिती एका वहीत सचित्र लिहून डॉ राव यांना दाखवण्याचे ठरवले. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२६/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
अँटी सॅटेलाईट मिसाईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा