मुख्य सामग्रीवर वगळा

एक होती मणिबेन

उगवतीचे रंग
एक होती मणिबेन
कोण होती मणिबेन ? मी कशासाठी सांगतोय तिची गोष्ट ? मणिबेन आहे एका देशभक्त स्त्रीचं नाव. देशासाठी ती तुरुंगातही गेली, खूप खस्ता खाल्ल्या. नुकताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही साजरा केला. अशा वेळी ज्यांनी ज्यांनी देशासाठी योगदान दिलं आहे, त्यांचं स्मरण करायचं असतं. ते आपण करतोच पण भारतमातेच्या गळ्यातील देशभक्तरूपी जी मौक्तिकमाला आहे, त्यातील काही अमूल्य रत्ने अशीही असतात की ज्यांच्या त्याग आणि बलिदानाकडे कोणाचं फारसं लक्ष जात नाही. अशा मौक्तिकमालेतीलच एक तेजस्वी मणी म्हणजे मणिबेन !
मणिबेन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या. मणिबेनचा जन्म ३एप्रिल १९०३ रोजी झाला. मणिबेनचं दुर्दैव बघा. ती केवळ सात वर्षांची असतानाच तिचं मातृछत्र हरपलं. तिच्या पाठीवर तिला लहान भाऊ होता. त्याचंही संगोपन करण्याची आणि घर सांभाळण्याची जबाबदारी पोरवयातच तिच्यावर येऊन पडली. खरं तर तिचं खेळण्याचं वय. पण ती पडली सरदार पटेलांची लेक, तेवढीच खंबीर आणि परिस्थितीला धीरानं तोंड देणारी. आपल्या मुलांना सावत्र आईचा त्रास होऊ शकेल म्हणून सगळे म्हणत असतानाही आणि तरुण वय असतानाही सरदारांनी दुसरं लग्न केलं नाही. देशाचा संसार मात्र उत्तम सांभाळला. घरात लक्ष द्यायला त्यांना वेळ नसायचा. मणिबेननं ती जबाबदारी सांभाळली. मणिबेन सरदार पटेलांची लेक पण तिने त्यांची एखाद्या आईसारखी त्यांची काळजी घेतली. ती सदैव सावलीसारखी त्यांच्या सोबत राहिली. ती त्यांची व्यक्तिगत सचिवही बनली. त्यामुळे त्या काळातील काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते तिला ओळखत असत.
आपल्याला सरदार पटेलांचा देशासाठीचा त्याग माहिती असतो. त्यांनी सगळी ५६५ संस्थाने एकत्र करून स्वतंत्र भारतात सामील केली. त्यांची ही कामगिरी इतिहासात केवळ अजोड आहे. स्वतंत्र भारतावर हे त्यांचे मोठे उपकार आहेत. पटेलांनी आपल्या कारकिर्दीत जी जी आंदोलनं केली, सत्याग्रह केले, त्या त्या प्रत्येक प्रसंगात मणिबेन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. सत्याग्रहींना ज्या वेळी इंग्रज सरकारने तुरुंगात डांबलं, त्या वेळी त्यांच्यात मणिबेनही होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिनेही खस्ता खाल्ल्या. ती आजन्म अविवाहित राहिली. देशासाठी आपले आयुष्य तिने वाहिले होते. तिच्या तरुणपणातील बराचसा काळ हा अहमदाबादच्या महात्मा गांधींच्या आश्रमात गेला होता. त्यामुळे गांधीजींच्या शिकवणुकीचा प्रभाव तिच्यावर आयुष्यभर राहिला. त्या तत्वांचे तिने पालन केले. साधेपणा, निर्मळ चारित्र्य, सेवावृत्ती हे तिचे गुण सदैव अनुकरणीय असेच होते.
सरदार पटेल आपल्या आयुष्याच्या अखेरीस अतिशय आजारी होते. त्यावेळी अनेक नेते त्यांना भेटायला यायचे. त्यांचे स्वागत करणे, त्यांना आपल्या पित्याच्या आजारपणाची माहिती देणे ही जबाबदारी साहजिकच मणिबेनवर यायची. एकदा असेच काँग्रेसचे एक मोठे नेते महावीर त्यागी सरदार पटेलांना भेटायला आले. मणिबेनने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना पटेलांच्या तब्येतीची माहिती दिली. मणिबेनच्या वागण्याबोलण्यात साधेपणा, सच्चेपणा ठासून भरला होता. स्वाभिमानी आणि संस्कारी पित्याचे रक्त तिच्यात खेळत होते. मणिबेन जिथे जिथे जायची तिथे तिथे चरखा आपल्यासोबत घेऊन जायची. त्यावर स्वतः सूत कातायची. तेच खादीचे साधे वस्त्र ती परिधान करायची. वडिलांच्या आजारपणामुळे आपल्या वस्त्रांकडे लक्ष द्यायलाही तिच्याकडे वेळ नव्हता. तिची साडी साधी स्वच्छ पण ठिकठिकाणी ठिगळे असलेली अशी होती.
महावीर त्यागी तिला म्हणाले, ' तू सरदार पटेलांची मुलगी आहेस. सरदार पटेलांची या देशात वेगळी प्रतिमा आहे. सगळी संस्थाने एकत्र करून त्यांनी सम्राट अशोक किंवा अकबर यांच्यापेक्षाही मोठे असलेले राज्य देशाला केवळ वर्षभरात मिळवून दिले आहे. अशा पित्याची तू कन्या. तू अशी वस्त्रं परिधान करतेस. त्याची थोडीतरी लाज वाटू दे. जरा आपल्या पित्याचा विचार कर. '
यावर मणिबेनने जे तेजस्वी शब्द सगळ्यांना ऐकवले ते अक्षरशः सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे आहेत. ती म्हणाली, ' त्यात कसली आलीय लाज ? लाज तर त्यांना वाटली पाहिजे की जे लोक खोटं बोलतात, ढोंगी, लबाड आणि स्वार्थी आहेत, बढाया मारतात. माझ्या वडिलांची सरदार म्हणून देशात असलेली प्रतिमा ही त्यांच्या पैशामुळे नाही तर त्यांच्या कार्यामुळे आणि देशाप्रती असलेल्या निष्ठेमुळे आहे. माझ्या वडिलांनी मला नैतिक मूल्ये पाळून जीवन कसं जगता येतं ते शिकवलं आहे. त्यासाठी पैशांची आवश्यकता नसते. माणूस साधेपणानं सुद्धा आपलं जीवन जगू शकतो. त्यासाठी महागडी वस्त्रं वापरण्याची आवश्यकता नसते. आवश्यकता आहे ती सच्चेपणाची. आपण फक्त स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. ' मणिबेनचे हे बाणेदार तेजस्वी शब्द ऐकून महावीर त्यागी आणि त्यांच्यासोबत आलेले इतर काँग्रेस नेते कमालीचे ओशाळले आणि ते मणिबेनपुढे नतमस्तक झाले. सरदार पटेलांना जेव्हा ही घटना कळली, तेव्हा त्या आजारपणातही त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकले.
भारतातील गरीब शेतकऱ्यांबद्दल सरदार पटेलांच्या मनात नेहमीच सहानुभूतीची भावना असायची. त्यांना जिथे जिथे मदत करता येईल, तिथे तिथे ते आवर्जून करायचे. ज्यांनी दुग्धव्यवसायात क्रांती घडवून आणली असे धवलक्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन यांनी आपल्या ' I Too Had a Dream या पुस्तकात सरदार पटेल आणि मणिबेन यांच्याबद्दल फार महत्वाची माहिती दिली आहे. ज्यावेळी दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत होती अशा वेळी गुजरातमधील कैरा जिल्ह्यातील शेतकरी पटेलांना भेटले होते. त्यावेळी पटेलांनी मोरारजीभाई देसाई या सहकाऱ्यावर त्यात लक्ष घालण्याची जबाबदारी सोपवली होती. मोरारजीभाईंनी पुढे काँग्रेसचे एक नेते त्रिभुवनदास यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. यावेळी गुजरातमधील ' आणंद या ठिकाणी जी दुग्धव्यवसायाशी संबंधित संस्था होती, त्या संस्थेत मणिबेन नियमितपणे जातायेत असत. सरदार पटेलांचीच कन्या असल्याने तिलाही शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस होता. मात्र आपण एका मोठ्या नेत्याची कन्या आहोत असा रुबाब त्यांनी कधीही मिरवला नाही. वर्गीस कुरियन यांच्या घरातील तर त्या जणू एक सदस्य झाल्या होत्या. कुरियन यांची पत्नी मॉली हिच्यावर त्यांनी आईसारखी माया केली. त्या मॉलीला सांगायच्या, ' तू वर्गीस यांची दुसरी पत्नी आहेस. त्यांची पहिली पत्नी म्हणजे त्यांची डेअरी, त्यांचं काम. त्यात तू कधीही अडथळा आणू नकोस. '
वर्गीस कुरियन यांनी आपल्या पुस्तकात पुढे मणिबेनबद्दल जे लिहिले आहे, ते वाचून त्यांच्याबद्दल हळहळ वाटल्याशिवाय राहत नाही. मणिबेन सरदार पटेलांच्या कायम सोबत असायची. सरदार पटेल जेव्हा आजारी झाले आणि जेव्हा आपल्या जीवनाचा शेवट जवळ आला आहे अशी जाणीव त्यांना झाली, तेव्हा त्यांनी मणिबेनजवळ दोन वस्तू दिल्या. या दोन गोष्टी आपल्या मृत्यूनंतर तिने फक्त पं, नेहरूंनाच द्याव्यात असे त्यांनी सांगितले. त्या दोन वस्तू कोणत्या होत्या ? त्यातील एक वस्तू म्हणजे एक काँग्रेसची खातेवही होती. दुसरी वस्तू म्हणजे एक बॅग होती. त्या बॅगेत थोडीथोडके नव्हे तर चक्क ३५ लक्ष रुपये होते. तो काळ होता डिसेंबर १९५० चा. आजच्या घडीला त्या रकमेची किंमत कदाचित अनेक कोटी होईल.
सरदार पटेल यांचं १५ डिसेंबर १९५० ला निधन झालं. त्यानंतर त्या प्रामाणिक, देशभक्त पित्याची ही कन्या त्या दोन्ही वस्तू घेऊन पं नेहरूंच्या भेटीसाठी गेली. त्यावेळी नेहरूंनी त्या दोन्ही वस्तू ठेवून घेतल्या. त्यांनी मणिबेनला फक्त ' धन्यवाद ' म्हटले. मणिबेन त्या ठिकाणी बराच वेळ बसून होत्या. पण नंतर नेहरू काहीही न बोलल्यामुळे त्या तेथून परत निघाल्या. त्या वेळी देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असलेल्या पटेलांच्या या कन्येची आर्थिक स्थिती कमालीची खालावली होती. पटेलांच्या मृत्यूनंतर मणिबेन यांनी बिर्ला भवनमध्ये राहायला यावे अशी विनंती बिर्ला यांनी केली होती पण स्वाभिमानी मणिबेनने ती नाकारली. त्या अहमदाबाद येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेल्या. आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही ३५लक्ष रुपयातील एका पैशालाही हात न लावणारे सरदार पटेल आणि तेवढ्याच निरपेक्षतेने ते पैसे पं. नेहरूंना नेऊन देणारी त्यांची कन्या मणिबेन यांच्या त्याग आणि निरिच्छ वृत्तीबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात.
महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांच्या पाठीशी कठीण परिस्थितीत उभे राहून त्यांना सदैव साथ देणाऱ्या सरदार पटेलांच्या कन्येची आस्थेवाईकपणे साधी चौकशी करण्याचे सौजन्य सुद्धा त्यावेळी दाखवली गेले नाही. मदत करणे तर दूरचाच भाग ! सरदार पटेलांना सत्तेची हाव कधी नव्हतीच. देशासाठीच त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. काँग्रेस कमिटीने आणि पंधरापैकी बारा प्रदेश काँग्रेस कमिट्यानी पंतप्रधान म्हणून आपला भरभरून पाठिंबा पटेल यांच्या नावाला दर्शवला होता. पण नेहरूंसाठी गांधीजींच्या शब्दाखातर पटेलांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
आपल्या पश्चात आपल्या कन्येला अशी वागणूक मिळालेली पाहून स्वर्गात गेलेल्या सरदार पटेल यांच्या आत्म्यालाही ' हेचि फळ काय मम तपाला ' असे वाटले असेल. पण अर्थात काही मिळेल या आशेने काम करणारी ही मंडळी नव्हतीच. त्यांच्या त्यागाचा कोणताच मोबदला त्यांना नको होता.
पुढे त्रिभुवनदास यांच्या प्रयत्नातून मणिबेन लोकसभेवर निवडून आल्या. त्या तीन वेळा लोकसभा तर एकदा राज्यसभा सदस्य राहिल्या. संसद सदस्य म्हणून त्यांना प्रथम वर्गाचा रेल्वेचा पास मिळाला होता. पण गांधीवादाचे संस्कार अंगात भिनल्याने आणि साधेपणाची सवय असलेल्या मणिबेन यांनी नेहमीच तिसऱ्या वर्गाने प्रवास केला. वर्गीस कुरियन यांच्यासोबत त्या मोरारजी देसाई यांना भेटायला जात असत. पण ज्या सरदार पटेलांनी आपला अनुयायी म्हणून मोरारजींना महत्वाचे स्थान दिले, त्याच मोरारजींनी मणिबेन यांना तासनतास बसवून तिष्ठत ठेवले. त्यांची भेट घेणे किंवा त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलण्याचे औदार्य मोरारजींनी कधीच दाखवले नाही.
एका सच्च्या देशभक्ताची सच्ची देशभक्त असलेली ही कन्या आपल्या आयुष्याच्या अखेरीस अत्यंत विपन्नावस्थेत जीवन जगली. अहमदाबादच्या रस्त्यावरून ती एकटीच पायी फिरताना बऱ्याच वेळा आढळून येई. कधी कधी दृष्टी क्षीण झाल्यामुळे ती अडखळून पडत असे. कुणीतरी येणारा जाणारा तिला आधार देऊन उठवत असे.
२६ मार्च १९९० या दिवशी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले चिमणभाई पटेल यांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्यांनी एका छायाचित्रकाराला बोलावले आणि मणिबेनच्या शेजारी उभे राहून आपला फोटो काढून घेतला. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात हा फोटो झळकला. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या पित्याच्या भेटीसाठी ही तेवढीच देशभक्त असलेली कन्या निघून गेली. तिच्या त्याग आणि सेवेचा आदर्श मागे ठेवून !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...