उगवतीचे रंग
स्वदेशीची जादू - भाग दहा
समृद्ध प्राचीन भारत
श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश दोन दिवसांची सुटी सार्थकी लावून आले होते. श्यामरावांची आपल्या सोपान या बालमित्राशी भेट झाली होती. मुलांना खूप काही नवीन बघायला, शिकायला मिळाले होते. त्यामळे घरी परतल्यावर त्यांच्या मनात खूप आनंद आणि समाधानाची भावना होती. घरी आल्यानंतर पिंकी आणि राजेशने आपण काय काय नवीन पाहिले ते लिहून काढले. प्राणी आणि विविध वनस्पतींनी समृद्ध असलेले अभयारण्य, हेमाडपंती शिव मंदिर, सोपानरावांच्या गावातील बारा बलुतेदारांपैकी कुंभार, लोहार, सुतार आदींच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, कळण्याची भाकरी, सातूचे पीठ यासारखे स्वदेशी खाद्यपदार्थ, वड, पिंपळ, बेल आदी विविध वनस्पतींची माहिती त्यांनी लक्षात ठेवली होती. काही शंका असेल तर पुन्हा आपल्या आईबाबांना विचारून ते खात्री करून घेत होते.
देशी बियाणे आणि त्याचे राहीबाई पोपरे यांच्यासारख्या एका अशिक्षित महिलेने केलेले जतन याबद्दलची माहिती त्यांना खूप आवडली होती. त्याबद्दल पिंकी जेव्हा बाबांना म्हणाली, ' पिंकी अग, खूप मोठं काम आहे बरं का राहीबाईंचं. त्यांच्या या कामाची भारत सरकारने दखल घेतली आणि त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार दिला गेला. राहीबाईंच्या सीड बँकेत ५३ प्रकारच्या पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. आता नगरच्या अकोले तालुक्यासह चार तालुक्यातील पन्नास टक्के शेतकरी देशी वाणाची लागवड करतात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या वेळी आपण सीड मदर राहीबाईंची सीड बँक बघायला आणि त्यांना भेटायला अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोंभळणे गावी जाऊ या. '
' अरे वा, बाबा. मला आणि राजेशला पण त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आवडेल, ' पिंकी म्हणाली.
एवढ्यात दारावरची बेल वाजली. राजेशने पळतच दरवाजा उघडला. पाहतात तो काय, श्यामरावांचे मित्र भगवानराव आले होते. भगवानरावांचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि कोणावरही पटकन छाप पाडणारे होते. राहणी साधीच पण टापटिपीची होती. भगवानराव एका महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. ते एकदा बोलायला लागले की ऐकत राहावेसे वाटे. प्राचीन भारतीय संस्कृती हा त्यांचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय होता. बोलता बोलता ते छान गोष्टी, किस्से सांगायचे त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा कोणालाही कधीही कंटाळा येत नसे. ते आले की पिंकी आणि राजेशला प्रत्येक वेळी नवीन माहिती सांगायचे. त्यामुळे ते आल्याच्या आनंदात पिंकी आणि राजेशने टाळ्या वाजवल्या.
श्यामराव म्हणाले, ' अरे भगवान, किती दिवसांनी येतो आहेस ! मुलांना पण तुझी आठवण येते. परवाच मुलं म्हणाली की कधीचे भगवानकाका आले नाहीत म्हणून. '
' काय रे तुम्ही मला न सांगता कुठेतरी गेलात आणि वर मलाच म्हणतो आहेस की खूप दिवसांनी येतो आहेस म्हणून ! शनिवारी मला इकडच्या बाजूला काम होतं तेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो. पाहतो तर दरवाजाला कुलूप. शेजारी म्हणाले की ते सगळे कुठेतरी ट्रीपला गेलेत म्हणून. बरं तुझा फोनही नॉट रिचेबल होता. करायचं काय माणसानं ? ' भगवानराव जरा चिडलेच होते.
तेवढ्यात श्यामलाताई बाहेरून आल्या. ' अय्या, भावजी तुम्ही. किती दिवसांनी येताय ! '
भगवानराव हसले आणि म्हणाले, ' वहिनी, मी येऊन गेलो आणि या श्यामला फोन सुद्धा केला. तुम्हीच कुठेतरी गेला होतात.आता याचा दंड द्यावा लागेल. '
' हो रे बाबा, तू म्हणशील तो दंड देऊ आम्ही. अग, आधी या भगवानसाठी काही चहा पोहे वगैरे कर. त्याशिवाय काही हा भगवान प्रसन्न होणार नाही. ' श्यामराव हसत हसत श्यामलाताईंना म्हणाले.
तेवढ्यात भगवानरावांनी एका बाजूला टी पॉयवर ठेवलेली मातीची भांडी, लोखंडी तवा, विळा आदी वस्तू पाहिल्या.
' काय रे श्याम, हा खजिना कुठून आणलास ? '
' अरे मुलांना ट्रीप म्हणून जवळच्या अभयारण्यात गेलो. तेथून येताना आपला सोपान आहे ना, त्याच्या घरी मुक्काम केला. मग काय मुले खुश. गावात त्यांना कुंभार, लोहार आदींची कामे दाखवली. तेथूनच श्यामलाने ही भांडी वगैरे घेतली. ' ' वा, छानच ! भगवानराव म्हणाले. अरे मातीची आणि लोखंडाची भांडी आरोग्यदायी असतात. '
तेवढ्यात पिंकी आणि राजेश तिथे आले. राजेश म्हणाला, ' काका, आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे याबद्दल. तुमच्याकडे तर खूप वेगळ्या माहितीचा खजिना असतो. '
' बरं बरं, मला जे माहिती आहे ते सांगतो. लोखंडाच्या वस्तू बनवणे, मातीच्या वस्तू बनवणे, कापड तयार करणे यासारख्या अनेक गोष्टी आपल्या देशातील खेड्यात वर्षानुवर्षे कारागीर बनवत आले आहेत. पाश्चात्य देशातील लोकांना तर बऱ्याच गोष्टी नंतर माहिती झाल्या पण आपल्याकडे लोकांना हजारो वर्षांपासून या गोष्टींचे ज्ञान होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. '
' आपण असं समजतो की खाणीतून लोखंड मिळवणे, ते शुद्ध करणे या गोष्टी म्हणजे अलीकडील म्हणजे साधारण दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचा शोध आहे. पण आपल्याकडील लोकांना पूर्वापार याची माहिती होती बरं का ! लोखंड किंवा कुठलाही धातू वितळवणे, त्यापासून विविध वस्तू तयार करणे ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया. त्यासाठी शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता असते. त्याचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेला आपण मेटॅलर्जी म्हणतो म्हणजे धातुशास्त्र. पण याचे उत्तम ज्ञान आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून होते याचे पुरावे आहेत. '
' राजधानी दिल्लीत कुतुबमिनारसमोर एक लोहस्तंभ आहे. त्यावर पूर्वी गरुडाची प्रतिमा होतीअसे म्हटले जाते. त्याला विष्णूस्तंभ किंवा गरुडस्तंभ असेही म्हणतात. चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात तो बांधला गेला असे सांगितले जाते. हजारो वर्षे झाली पण तो आहे तसाच आहे. वादळ, वारा, पाऊस या सगळ्यांचा वर्षानुवर्षे मारा होऊनही तो गंजला नाही. आजही आपण गंजणार नाही असे लोखंड बनवू शकलो नाही. पण आपल्या पूर्वजांकडे हे ज्ञान होते असे यावरून दिसते. '
' खरंच काका, किती आश्चर्यकारक आहे ही गोष्ट ! आपले पूर्वज खरोखर किती प्रगत होते हे यावरून कळते. ' पिंकी म्हणाली.
एवढ्यात श्यामलाताई पोहे घेऊन आल्या. सगळ्यांनी छान गरमागरम कांदे पोह्यांचा आस्वाद घेतला. भगवानराव म्हणाले, ' बाळांनो, आणखी काही मनोरंजक गोष्टी मी पुढच्या वेळी सांगेन. ' ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा