मुख्य सामग्रीवर वगळा

स्वदेशीची जादू - भाग सात पौष्टिकता भारी - स्वदेशीची चव न्यारी

 उगवतीचे रंग 

स्वदेशीची जादू - भाग सात 

पौष्टिकता भारी - स्वदेशीची चव न्यारी 

श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश यांनी मग रात्री सोपानरावांकडेच रात्री मुक्काम केला. दिवसभरच्या प्रवासाने सगळेच थकले होते आणि फिरल्यामुळे आणि गावाकडील मोकळ्या हवेत भूकही छान लागली होती. निर्मलाताईंनी मग सगळ्यांसाठी कळण्याच्या पिठाच्या गरम गरम भाकरी, तांबड्या भोपळ्याची भाजी, वांग्याचे चवदार भरीत, नागलीचे पापड, लसूण कोथिंबीर घालून केलेला हिरव्या मिरच्यांचा ठेचा आदी फर्मास बेत केला होता. कळण्याची चवदार भाकरी तर मुलांना फारच आवडली. सगळे नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवले. श्यामलाताई निर्मलाताईंना म्हणाल्या, ' वहिनी, अहो घरी मुलं भाकरी म्हटली की तोंड वाकडं करतात आणि आज बघा इथे आवडीने खाताहेत. ' 

राजेश म्हणाला, ' आई, काकूंनी केलेल्या भाकरीना वेगळीच चव आहे. मला तर हे गरमगरम जेवण खूपच आवडले. ' 

सोपानराव म्हणाले, ' चला, आमचा खेड्यातील पाहुणचार तुम्हाला आवडला याचा आनंद झाला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा कधीही या. तुम्हाला आवडेल तो बेत करू या. काय निर्मलाबाई, बरोबर आहे का मी काय म्हणतो ते ? ' 

' व्हय व्हय, अगदी बरोबर आहे बघा. आवं आपली पोरं आता शहरात शिकायला गेलीत. आपल्याला बी एकटं वाटतं. ' असं म्हणून निर्मलाताई शामलाताईंना म्हणाल्या, ' तुम्हाला कधी बी वाटलं तर येत जावा हिकडं. तेवढीच हवापालट. ' 

पिंकी म्हणाली, ' आई, मघा काकू या कळण्याच्या भाकरी आहेत असं काहीतरी म्हणत होत्या. म्हणजे कसल्या ग आई ? मला तर ज्वारी आणि बाजरीच माहिती आहे.' 

श्यामलाताई म्हणाल्या, ' पिंकी, बरं झालं विचारलंस. कळण्याची भाकरी फार पौष्टिक असते बरं का ! ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ उडीद इ.  एकत्र दळून आणतात. त्याची भाकरी बनवली जाते. याचा फायदा म्हणजे आपल्या आहारातून आपल्या पोटात सगळ्या प्रकारची तृणधान्ये जातात. त्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटिन्स असतात. त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे फायबर्स, मॅग्नेशियम,फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स इ. गोष्टी मिळतात. ' 

श्यामराव हसत हसत म्हणाले, ' आमच्या श्यामल मधली विज्ञान शिक्षिका जागी झाली वाटतं. ' 

' बाबा, पण खरंच आई खूप छान माहिती सांगते. म्हणजे बघा ना, साधी तृणधान्ये वापरून आपण किती चविष्ट भाकरी बनवू शकतो. आपण हॉटेलमध्ये जाऊन मैद्याच्या पोळ्या खातो. घरी गव्हाच्या पोळ्या करतो. पण त्यापेक्षा ही भाकरी किती आरोग्यदायी आहे. ' पिंकी म्हणाली. 

' अगदी बरोबर. पिंकी, अजून एक गोष्ट सांगते. अग, गव्हाच्या पिठात ग्लूटेन नावाचा घटक असतो. तो शरीराला त्रासदायक असतो. त्यामुळे पोळी पचायला जड होते. भाकरीमुळे मेंदूचे आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहायला मदत होते. ' श्यामलाताईंनी खुलासा केला. 

राजेश म्हणाला, ' आई, हे सगळे ऐकल्यावर तर मला वाटायला लागले आहे की आपणही पोळीऐवजी कळण्याची भाकरीच खावी. ' 

श्यामराव सोपानरावांना म्हणाले, ' बघ, सोपान, घरी सांगितले तर ही मुले ऐकत नाहीत. पण आता इथे त्यांना भाकरीचे महत्व पटले हे किती छान झाले. ' 

'  श्यामभाऊ, तू एक काम कर. उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुटीत मुलांना इकडे पाठवत जा. त्यांची तब्येत कशी सुधारते तू बघशीलच. शिवाय त्यांना शेतावर घेऊन जात जाईन. खूप गोष्टींची माहिती होईल त्यांना. शहरात राहून खूप गोष्टी नाही कळत रे बाबा. ' सोपानराव मुलांकडे पाहून म्हणाले, ' का रे पोरांनो,आवडेल का इथे सुटीत यायला  ? ' 

राजेश आणि पिंकी एका सुरात हो म्हणाले. 

जेवण झाल्यानंतर श्यामराव आणि सोपानराव यांनी बाहेरच्या आवारात शतपावली केली. चालता चालता त्यांच्या गप्पाही झाल्या. इकडे निर्मलाताई आणि श्यामलाताई यांची स्वयंपाकघरात आवराआवर सुरु होती. बाहेरच्या ओट्यावर पिंकी आणि राजेश यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. तेवढ्यात सोपानराव आणि श्यामराव तिथे आले. सोपानराव म्हणाले, ' पोरांनो, चला आता आराम करा. या शेजारच्या खोलीत तुमची झोपण्याची व्यवस्था केली आहे. अजून काही लागले तर सांगा. ' 

' हो काका, असं म्हणत मुलं झोपायला गेली. थोड्या वेळाने श्यामराव, श्यामलाताई पण गेल्या. दिवसभराच्या श्रमामुळे, फिरण्यामुळे त्यांना छान झोप लागली. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्यांना आपोआप जाग आली. गोठ्यातून गाईंचं हंबरण ऐकू येत होतं. सोपानरावांनी गाईचं दूध काढून आणलं होतंच. निर्मलाताईंनी सगळ्यांना गरमागरम दूध दिलं. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. आता श्यामराव आणि मुलांची घरी परतण्याची तयारी झाली होती. तेवढ्यात निर्मलाताईंनी सगळ्यांसाठी नाश्त्याचे आणले. काचेच्या बाऊलमध्ये कुठला तरी पदार्थ त्यांनी सगळ्यांना दिला. मुलांनी एक दोन चमचे खाताच त्यांना ती चव अतिशय आवडली. पिंकी म्हणाली, ' काकू हे काय बनवले आहे ? ' 

निर्मलाताई, ' हे होय ? काही नाही साधाच पदार्थ आहे. याला सातूचे पीठ म्हणतात. बऱ्याच वेळेला आम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळी भूक लागली हे करतो. यात तिखट मीठ  घालूनही हे खाता येते. ' 

' अरे वा, किती छान ! आई, तुला माहिती आहे का ग हे  ? ' पिंकी म्हणाली. 

श्यामराव म्हणाले, ' अरे पोरांनो, आमच्या लहानपणी आई आम्हाला हेच द्यायची. आता तुमची आई सांगेलच तुम्हाला त्याबद्दल. ' 

' बाळांनो, हा पदार्थ आता  जो तुम्ही खाल्ला, त्याला सातू किंवा सत्तू म्हणतात. गहू, हरभरा डाळ किंवा दाळवा त्यापासून हे बनवतात. त्यात जिरे, सुंठ इ. घालतात. या सातूच्या पिठात गूळ किंवा साखर घालून ते खाता येते. ते थोडेसे पातळ बनवतात म्हणजे खायला छान वाटते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात तर अजूनही तेथील लोक हे खाऊन बाहेर पडतात. पूर्वी प्रवास करताना आपले पूर्वज याच सातूच्या पिठाचा नाश्ता करून बाहेर पडत असत. ' श्यामलाताई म्हणाल्या. 

' आई, पण या सातूच्या पिठाचे नक्कीच काही फायदे असतील ना ? ' राजेशने विचारले. 

' हो तर. राजेश. अरे हे पीठ फार पौष्टिक बरं का ! त्यात भरपूर प्रोटिन्स असतात. हे पीठ पचायला आणि पोटासाठीही छान असते. रक्तातील साखर सुद्धा त्यामुळे नियंत्रणात राहते, वजन कमी व्हायला मदत होते. पोटाला थंडावा मिळतो. मुख्य म्हणजे हे उत्साह आणि शक्ती देणारे आहे. आजकाल तुम्ही टीव्ही वर ज्या हॉर्लिक्स, कॉम्प्लान यासारख्या जाहिराती पाहता ना, त्यात दुसरे काय असते ? फक्त त्याला चॉकलेटची चव दिलेली असल्याने ते तुम्हाला आवडते इतकेच ! मॅगी, कुरकुरे या सारखे बाजारू पदार्थ खाण्यापेक्षा हे सातूचे पीठ शतपटीने चांगले असते बरं का बाळांनो. आणि यासाठी काही फार पैसे लागत नाहीत. हे सगळे पदार्थ सर्वसामान्यांच्या घरात सहज उपलब्ध असतात. ' 

' आई, आपल्याकडे पण कर ना हे सातूचे पीठ. आम्ही पण अधूनमधून खात जाऊ. '  पिंकी म्हणाली. 

एवढ्यात निर्मलाताई दोन पिशव्या घेऊन आल्या. ' हे बरोबर घेऊन जा. ' त्या श्यामलाताईंना म्हणाल्या. 

' वहिनी, अहो हे काय आणलंत ? 

' काही विशेष नाही. अहो, थोडं कळण्याचं पीठ आणि सातूचं पीठ दिलं आहे. मुलांना करून देत जा घरी. ' निर्मलाताई म्हणाल्या. 

' वा वा. खूप छान. मी देईन मुलांना करून. आणि आता तुम्ही आणि भावजी दोघेही या आमच्याकडे दोन दिवस राहायला. ' श्यामलाताई म्हणाल्या. 

' नक्की येऊ. अहो, वहिनी, श्यामकडे तर आम्ही हक्काने येणार. आपलंच घर आहे. ' सोपानराव म्हणाले. 

सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. श्यामलाताई आणि मुले गाडीत बसली. श्यामरावांनी स्टिअरिंगचा ताबा घेतला आणि गाडी मार्गस्थ झाली. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०२/०८/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...