उगवतीचे रंग
एक सांज डोळ्यात साठवलेली
कालचीच गोष्ट. जळगावहून चाळीसगावला येताना बसने प्रवास करत होतो. तसा यावर्षी पाऊस खूपच कमी आहे. पण तरी धरित्रीनं ' हिरवं स्वप्न ' पाहिलं आणि त्याच्या खुणा तिच्या अंगाखांद्यावर ती मिरवत होती. नुकतेच ना धों महानोर आपल्यातून गेले पण त्यांची कविता मागे ठेवून गेले. त्यांच्या कवितेच्या ओळी अशा सांजवेळी आणि धरती पावसाची प्रतीक्षा करीत असताना आठवल्या नाहीत तरच नवल ! ते म्हणतात
ह्या नभाने भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.
आकाशात काही काही ठिकाणी काळे मेघ अस्ताव्यस्त शाईचे मोठे ठिपके पसरावे तसे पसरले होते. याच मेघांना तर महाकवी महानोरांपासून तर बांधावरच्या गरीब फाटक्या शेतकऱ्यापर्यंत आणि कवी लेखकांपासून तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळेच प्रार्थना करतो ना ! फक्त महानोरांना ते फार सुंदर शब्दात वरुणराजाकडे मागता आले. शेती आणि काव्य दोन्हीही महानोरांच्या व्यक्तिमत्वात एकरूप झाले. निसर्गाचं रूप, रस, गंध घेऊन महानोरांची कविता प्रकटली. ' हिरवी बोली ' अशी सहजासहजी कुणाला समजते ? महानोर तिचा शब्द झाले. रानातल्या कविता प्रकटल्या.
खान्देशची मातीच बहुप्रसवा ! ती जशी अन्नधान्य पिकवते, तशीच तिच्या भूमिपुत्रांना प्रतिभेचं लेणं पण लेवविते. अजिंठा, वेरूळची लेणी शिल्पात कोरलेली. पण या मातीतून जिवंत लेणी घडली. या माणसांनी ' अक्षरशिल्पे ' निर्माण केली. सुप्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई खान्देशाच्याच ! त्यांच्या कवितांबद्दल काय बोलावं ! त्यांची कविता केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर त्यांच्या रूपाने खान्देशची बोली देशविदेशात पोहोचली. शाळाकॉलेजात कधी न गेलेल्या बहिणाबाईंच्या कवितांचा अभ्यास विद्यापीठे करू लागली. कारण बहिणाबाई हेच एक मोठं विद्यापीठ होतं. आयुष्याच्या शाळेत या बाईने एवढे धडे गिरवले की बुद्धांना जसं तपश्चर्येअंती ज्ञानप्राप्ती झाली, तशी हिला आयुष्याच्या पाठशाळेत झाली आणि तिने जे शहाणपणाचे धडे आपल्या कवितांतून दिले, ते वाचता वाचता भल्याभल्यानी तोंडात बोटे घातली.
याच खान्देशच्या मातीतून ' बालकवींसारखं ' प्रतिभेचं लेणं लाभलेलं व्यक्तिमत्व याच मातीचा गंध घेऊन प्रकटलं . ' श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..' निर्झरास, औदुंबर, फुलराणी आदी कवितांनी रसिकांच्या मनावर गारुड केले. केशवसुतही काही काळ इथे राहून गेले. साने गुरुजींच्या वास्तव्याने खान्देश आणि अमळनेर पावन झाले. कदाचित पर्जन्यमानाच्या दृष्टीने आम्ही इतरांच्या तुलनेत मागे असू, पण कर्तृत्वाची, सेवेची आणि साहित्याची पर्जन्यवर्षा या भागात भरभरून झाली. आणि महानोर तर काय ' हिरव्या बोलीचा शब्द ' झाले. कवितेच्या रूपानं आपली ' चांदण गोंदणी ' आपल्यासाठी मागे ठेऊन गेले.
मला वाटतं निसर्गाला माणसाला साध्या सोप्या भाषेत शहाणपण शिकवायचं असतं, तेव्हा तो बहिणाबाईंचं रूप घेऊन प्रकटतो आणि ' माणसा माणसा कधी होशील माणूस ' असं म्हणत आमच्या डोळ्यात अंजन घालतो. त्याला जेव्हा त्याचं मोहक रूप एखाद्या चित्रासारखं माणसासमोर ठेवायचं असतं, तेव्हा तो बालकवींची कविता होतो आणि ' हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ' आमच्यासमोर ठेवतो. श्रावण मासातला हर्ष होतो, तर कधी पाय टाकून जळात बसलेला औदुंबर होतो आणि सगळीकडे ' आनंदी आनंद गडे ' असं करून टाकतो.
बसमधून प्रवास करताना ही सगळी मंडळी माझ्या डोळ्यासमोर प्रकटत होती. शरीर बसमध्ये होतं, नजर म्हणायला बाहेरच्या निसर्गाचा वेध घेत होती. पण अंतरंगात एखाद्या कॅलिडोस्कोप सारखी बालकवी, बहिणाबाई आणि महानोर यांची गाणी आणि कविता फिरून फिरून मला त्यांच्या निसर्गप्रतिमा दाखवीत होती.
पाऊस कमी असला तरी जमिनीतून हिरवे कोंब प्रकटले होते. पावसाळ्यात धरतीची ही हिरवी समृद्धी डोळ्यांना खूप सुखावते. तशी मी ती हिरवाई डोळ्यात भरून घेत होतो. रानाचा गंध घेऊन येणारा सुखद गार वारा श्वासात भरून घेत होतो. निसर्ग देताना भरभरून देतो. आपल्याला ते घेता आलं पाहिजे. ' देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ' असं व्हायला नको. मग मी हे निसर्गाचं दान भरभरून घेतो. मला ते एक नवी ऊर्जा प्रदान करतं.
सूर्यदेव आता मावळतीकडे झुकले होते. आकाशातले काही कृष्णमेघ त्यांचं तेज झाकण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्या तेजाचे सामर्थ्य एवढे प्रचंड होते की ढगाआडून चमकताना त्याला जास्तच झळाळी प्राप्त होत होती. त्याला अडवू पाहणाऱ्या त्या कृष्णमेघांनाच त्याने आपल्या रंगात रंगवून टाकलं होतं. त्या तेजाचं सुवर्णरूप मी डोळ्यात साठवून घेत होतो. सकाळ असो की संध्याकाळ, मला या सूर्यनारायणाचं रूप नेहमीच बघायला आवडतं. सूर्यनारायणाची किमया अशी असते की आकाशाचा पटच नव्हे तर भोवतीचं चराचर तो बदलून टाकतो. प्रत्येक वेळी निराळे रंग, निराळे चित्र.
त्या सूर्यास्ताच्या समयी मला दिसलं एक छान हिरवंगार शेत. बिल्लास दोन बिल्लास रोपं त्या शेतात उगवली होती. त्या रोपांनी काळ्या मातीचं रुपडंच पालटून टाकलं होतं. आणि त्याच रोपांच्या वर अगदी थोड्या अंतरावरून एक अगदी पांढराशुभ्र बगळा उडत चालला होता. त्या हिरव्या पार्श्वभूमीवर तो धवलशुभ्र रंग अगदी खुलून दिसत होता. कुठे बरं चालला असेल हा असा एकटा ? कारण साधारणपणे बगळे थव्याने उडत जातात. कदाचित आपल्या सोबत्यांपासून वाट चुकला असेल, मागे पडला असेल. पण माझ्या मनात मात्र त्याने घर केले. लगेच महानोरांचे शब्द ओठांवर आले.
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातया आभाळ '
अशा दिमाखात ते वेल्हाळ पाखरू विहार करीत होतं. नेहमी दिसणारी बगळ्यांची माळ मात्र दिसली नाही. बगळ्यांचा विचार डोक्यात आला अन मला वसंतराव देशपांडे यांनी गायिलेले ' बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात ' हे गाणं मनात रुंजी घालू लागलं. हे गाणं मनात आशेची एक सुखद पहाट जागवून जाते.
आता माझ्या दृष्टीसमोर ' मावळत्या दिनकराची ' वेगवेगळी मोहक रूपे प्रकट होत होती. त्याच्या भोवतालच्या काळ्या मेघांनी त्याला झाकण्याचा प्रयत्न केल्याने त्याची वेगवेगळी रूपे प्रकटत होती. जणू त्यांचा लपंडाव चालला होता. एकदा तर त्या मेघांनी त्याची सगळी गोलाईच झाकून टाकली आणि आकाशात जणू एक फूटभर तेजाची रेखा प्रकट झाली. एखाद्या स्त्रीने जणू आपल्या भाळी प्रकाशरूपी कुंकवाची रेघ रेखावी तसा भास झाला. परत आकाशातील पश्चिम क्षितिजावरचं दृश्य बदललं. आता एखाद्या खोलीतील खिडकीतून प्रकाशाची प्रभा बाहेर यावी, तशीच सहस्ररश्मीची सुवर्ण किरणे आकाशाच्या खिडकीतून बाहेर डोकावत होती. आता तर या दृश्यानं आणखी वेगळं रूप धारण केलं. सूर्याचं बिंब अगदी लहान झालं. भाळावरचा टिळा जणू ! त्याच्या भोवताली असणाऱ्या कृष्णमेघांनी जणू सावळ्या विठ्ठलाचं रूप धारण केलं. त्या विठ्ठलाच्या भाळावर हा सुवर्णतिलक काही क्षण झळाळून गेला. कॅनव्हासवर रंगणारा हा अनोखा रंगसोहळा मी नेत्रात साठवून घेत होतो.
हळूहळू सूर्यदेव दृष्टीआड होऊ लागले. या ' मावळत्या दिनकराला ' मी मनोमन प्रणाम केला. महानोरांचे शब्द पुन्हा आठवले.
देवा सूर्यनारायणा नित्यनेमानं उगवा
मह्या कपाळीचं कुकू साता जन्मात टिकवा .
सूर्यदेवानं सृष्टीचा निरोप घेताच हळूहळू काळोख साऱ्या सृष्टीला आपल्या कवेत घेऊ लागला. काही काळानं तर सगळीकडेच अंधाराचं साम्राज्य पसरलं. जी झाडं, शेतं मला आतापर्यंत डोळ्यांना सुखावत होती, त्यांनी अंधाराचं पांघरूण ओढून जणू निद्रादेवीला आवाहन केलं होतं. भोवतालचं सगळं चराचर शांत झालं होतं. कुठेकुठे रातकिड्यांचा आवाज येत होता. अंधाराचं साम्राज्य पसरलं असलं तरी जाता जाता सूर्यनारायण या सृष्टीला आश्वस्त करून गेले होते.महानोरांच्या कवितेतल्या बाईला जणू ते सांगत होते, ' काळजी करू नकोस. मी येणार आहे. उद्या पहाट होईलच. बगळ्यांची माळ पुन्हा अंबरात फ़ुलणारच आहे. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
७/८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा