उगवतीचे रंग
स्वदेशीची जादू - भाग नऊ
देशी पारंपरिक बियाणे
हेमाडपंती मंदिराला भेट, त्यानंतर सोपानरावांकडे एक दिवस मुक्काम आणि त्या दरम्यान गावातील लोहार, कुंभार आदींना भेटणे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने राजेश आणि पिंकी खुशीत होते. त्यांना खूप नवनवीन माहिती पण मिळाली होती. लिंब, वड, पिंपळ या सारख्या झाडांचे महत्व, बेलाच्या पानांचे महत्व ही सगळी माहिती त्यांना नवीन होती. श्यामराव आणि श्यामलाताईंनी त्यांना सतत वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून असणाऱ्या बारा बलुतेदारांची माहितीही त्यांना मिळाली होती.
दुपारी जेवण घेतल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला. रस्त्याने हिरवीगार शेतं डोलत होती. सगळीकडे जणू हिरवाईची चादर आच्छादली होती. कुठे शेतात केळी तर कुठे ऊस, कुठे कपाशी, ज्वारी, बाजरी आदी पिके दिसू लागली. कुठे कुठे भाज्यांची लागवड केलेली दिसत होती. ते सगळे पाहिल्यानंतर पिंकीला सोपानकाकांकडच्या जेवणाची आठवण झाली. ती म्हणाली, ' आई, त्या काकांकडे भाकरी आणि इतर सर्वच पदार्थ किती चवदार होते नाही ? '
'अग पिंकी, सोपानकांकांकडे त्यांच्या शेतात निर्माण झालेलं धान्यच जेवणासाठी वापरतात. त्यांच्याकडे खास गावरान ज्वारी, बाजरीची लागवड ते त्यासाठी करतात. ' श्यामलाताई म्हणाल्या.
' आई, गावरान ज्वारी, बाजरी म्हणजे काय ग ? ती वेगळी असती का ? ' राजेशने विचारले.
' हो, राजेश. पण ते सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का ! ' श्यामलाताई म्हणाल्या. ' अरे वा, किती छान ! ' मुलं म्हणाली.
' ऐका तर. एक आटपाट गाव होतं. त्या गावातले बहुतेक सगळे लोक शेतकरी होते. सगळे खाऊनपिऊन सुखी होते. सगळं छान चाललं होतं. पण एकदा काय झालं माहिती आहे का ? त्या गावातील मुलं सतत आजारी पडायला लागली. त्यांचं पोषण होईना. कितीही खाल्लं तरी अंगानं भरत नव्हती. मोठी माणसं देखील निरनिराळ्या कारणांनी आजारी पडू लागली. डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्दी वाढायला लागली. पण वेगवेगळी औषधे घेऊनही लोकांना बरे वाटेना. कोणी म्हणालं की हा काहीतरी दैवी कोप आहे. कोणी काही म्हणालं तर कोणी आणखी काहीबाही.
त्या गावात एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीला वाटले हे सगळे म्हणतात ते काही खरे नाही. खरे कारण वेगळेच असावे. त्या गावातील लोक अनेक वर्षांपासून शेतीत पारंपरिक बियाण्याऐवजी संकरित किंवा हायब्रीड बियाणे वापरत होते. या बियाण्यांमुळे पीक तर भरपूर येत होते. पण त्यापासून तयार होण्याला अन्नाला, भाज्यांना फारशी चव नव्हती. मुलांना होणाऱ्या आजारांचे कारण बहुतेक हे संकरित धान्यच असावे अशी त्या व्यक्तीला शंका आली. मग त्या व्यक्तीने आपल्या देशी पारंपरिक वाणाची जोपासना करायला सुरुवात केली. त्याचीच लागवड केली. आणि मग त्याचे फायदे दिसू लागले. मुले, माणसांचे आजार कमी झाले. कोणतीही सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. तशी त्या व्यक्तीने केली. '
एवढे सांगून श्यामलाताई म्हणाल्या, ' आता मला सांगा ही व्यक्ती कोण असावी असं तुम्हाला वाटतं ? '
पिंकी म्हणाली, ' आई, ही त्या गावातील कोणीतरी उच्चशिक्षित व्यक्ती असावी. म्हणूनच त्यांनी अंधश्रद्धेला बळी न पडता असा विचार केला असावा. '
' नाही पिंकी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही व्यक्ती म्हणजे त्या गावातील एक बाई. त्यांचं नाव राहीबाई पोपरे आणि त्या शिकलेल्या नाहीत पण त्यांची दृष्टी आणि विचार एखाद्या उच्चशिक्षित माणसाला सुद्धा आश्चर्यचकित करणारे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. ' श्यामलाताई म्हणाल्या.
' अरे बापरे, आश्चर्यच आहे ! ' पिंकी आणि राजेश म्हणाले. ' खरं तर अशा प्रकारचा विचार सगळ्या सुशिक्षित माणसांनी करायला हवा, नाही का ?
' बरोबर आहे बाळांनो. पण राहीबाईंनी हे काम केलं आणि त्यांनी सगळ्यांना त्याचं महत्व देखील समजून सांगायला सुरुवात केली. त्यांनी असे अनेक प्रकारचे पारंपरिक बियाणे जपून ठेवायला सुरुवात केली. त्याची लागवड करून ते वाढवलं. एवढंच नाही तर लोकांनाही ते द्यायला सुरुवात केली. '
' पण आई, गावरान किंवा देशी पारंपरिक बियाणं म्हणजे ते हेच का ?' राजेशने विचारले.
' हो राजेश, बरोबर आहे. असं बियाणं म्हणजे शेतात स्वतः पिकवलेल्या धान्यातील काही भाग बाजूला काढून ठेवून ते पुढील वर्षासाठी वापरणे. पूर्वीच्या काळी शेतकरी असेच करत असत. त्यांच्या शेतात उत्पन्न होणाऱ्या पिकातील उत्तम भाग बियाण्यांच्या स्वरूपात ते राखून ठेवत असत. त्याचाच वापर पुढील वर्षासाठी करत असत. पण नंतर नवीन संशोधनात जास्त उत्पन्न देणाऱ्या संकरित बियाण्याचा शोध लागला. शेतकरी जास्त उत्पादनासाठी त्याचा वापर करू लागले. अन्नधान्याच्या बाबतीत त्यामुळं आपला देश स्वयंपूर्ण झाला. पण शेतजमिनीचा कस मात्र कमी होत गेला. या संकरित धान्यातील पोषणमूल्ये मात्र कमी झाली. शिवाय आजारांचे प्रमाण वाढले. लोकांची प्रतिक्रारशक्ती कमी झाली. '
' या राहीबाईंना बीजमाता असे म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नातूनच अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळणे गावी पहिल्या बीज बँकेची स्थापना झाली. आता या गावातील अनेक महिला या अभियानात सामील झाल्या आहेत. संकरित बियाण्यांविरुद्ध त्यांनी ' बीज स्वातंत्र्य ' नावाची मोहीम सुरु केली आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारच्या डाळी, तांदूळ, भाजीपाला, औषधी वनस्पती आणि अन्य पिकांचे सुमारे २०० पेक्षा अधिक प्रकारचे बियाणे जतन करीत आहेत. त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने या गावाला एक प्रकारची राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. ' श्यामलाताई म्हणाल्या.
पिंकी म्हणाली, ' असे प्रयत्न इतर ठिकाणी झाले नाहीत का ? खरे तर अशा प्रयत्नांना सगळ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. '
' बरोबर आहे पिंकी. असे प्रयत्न अन्य काही ठिकाणी झाले आणि होत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रयत्नात अशिक्षित लोकांचा सहभाग मोठा आहे. ते शिकलेले नसलेले तरी या गोष्टींची उपजतच जाण त्यांच्यामध्ये आहे. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील आदीवासी महिला अशा स्वदेशी पारंपरिक वाणाचे जतन करीत आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट, प. बंगालमधील झारग्राम तसेच राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात अशा प्रकारच्या बियाण्यांची साठवण काही व्यक्ती आणि कुटुंबियांकडून केली जाते. ' श्यामलाताई म्हणाल्या.
' बाबा, तुम्ही पण सांगा ना काहीतरी, ' राजेश म्हणाला.
श्यामराव हसले. ते म्हणाले, ' बाळांनो, आई अगदी बरोबर माहिती सांगते आहे तुम्हाला. त्यामुळे मी पण ती ऐकत होतो. आज आपण पर्यावरण संरक्षणाच्या गोष्टी करतो. पण या देशी बियाण्यांमुळे आपोआपच पर्यावरणाचे रक्षण होत होते. जमिनीचा कस टिकून राहत होता. तसेच रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी त्यामुळे पर्यावरणाला तसेच मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यातील विषारी घटक नष्ट होत नाहीत. अन्नधान्य, भाजीपाला इ. च्या माध्यमातून ती आपल्या शरीरात जातातच, त्यामुळे मधुमेह, कर्करोग यासारख्या अनेक आजारांना निमंत्रण मिळते. स्वदेशी पारंपरिक बियाणे पर्यावरण पूरक तर आहेच पण आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि अधिक पोषणमूल्ये असलेले आहे. त्याचा खर्चही कमी येतो. संकरित बियाण्यापेक्षा त्यांचे उत्पादन थोडे कमी येते हे खरे असले तरी अनेक उपायांद्वारे हे उत्पादन वाढवता येऊ शकते. त्यासाठी सेंद्रिय खते, नैसर्गिक कीटकनाशके इ. चा वापर करता येऊ शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची. '
' किती छान माहिती कळली बाबा आज तुमच्याकडुन आणि आईकडून. आपण खरोखरच पुन्हा अशी स्वदेशीची कास धरली तर आपला देश पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो, नाही का ? ' पिंकी म्हणाली.
' बरोबर आहे, पिंकी. आपण तसे होईल अशी आशा करू या. चला, आता आपले घर जवळ आले. ' ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/०८/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा