मुख्य सामग्रीवर वगळा

स्वदेशीची जादू - भाग अकरा समृद्ध प्राचीन भारत

 उगवतीचे रंग 

स्वदेशीची जादू - भाग अकरा 

समृद्ध प्राचीन भारत 


श्यामराव, श्यामलाताई आणि भगवानराव यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा पिंकी आणि राजेश यांना आपल्या शाळेत माहिती सांगताना खूप उपयोग झाला. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पिंकीने स्वदेशी खाद्यपदार्थ आणि वृक्ष आदींच्या उपयोगितेवर सर्वांसमोर एक छोटेसे भाषण केले. तिच्या भाषणाची शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि प्रमुख अतिथींनी खूप तारीफ केली. शाळेतर्फे तिला क्रांतिवीरांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. राजेशने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनात हेमाडपंती शिव मंदिर, वृक्षांची चित्रे, त्यांची माहिती आणि उपयोग या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेली सुंदर चित्रे काढली. ही वेगळ्या विषयावरील चित्रे सर्वांची लक्ष वेधून घेत होती. शाळेने त्याची चित्रे शाळेच्या मासिकात घेण्याचे ठरवले. 


आईबाबांनी पिंकी आणि राजेशला या सगळ्या गोष्टींबद्दल खूप शाबासकी दिली. मुलांना या सगळ्या गोष्टी भगवानकाकांना केव्हा सांगतो असे झाले होते. योगायोगाने दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयाला पारशी नववर्षाची सुटी होती. श्यामरावांनी भगवानरावांना फोन करून बोलावून घेतले. येताना भगवानराव सोबत भार्गवी वहिनी आणि त्यांचा मुलगा चैतन्य यांनाही सोबत घेऊन आले. आज सगळ्यांचे जेवण श्यामरावांकडेच होणार होते. सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या. पिंकी आणि राजेशने आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टी भार्गवीकाकूंना आणि चैतन्यला सांगितल्या. ते म्हणाले आपण सगळे एकत्रच पुढील वेळी अशा सहलीला जाऊ. 


आता मुले भगवानरावांच्या भोवती जमली. पिंकी म्हणाली, ' काका, मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता की आणखी छान माहिती, गोष्टी तुम्हाला सांगेन म्हणून. आता आपल्याला वेळ आहे तर सांगा ना ! ' राजेशने पण ' हो काका, सांगा ना...' असे म्हणत पिंकीला साथ दिली. तर चैतन्य सुद्धा ' हो बाबा, आता तुम्हाला काहीतरी सांगावेच लागेल, ' म्हणाला. 


भगवानराव हसत हसत श्यामरावांना म्हणाले, ' हे चांगले आहे बाबा. तुझ्याकडे आलो की चांगलेच काम लागते ! कॉलेजात मला शिकवण्याचा पगार मिळतो बरं का ! इथे मात्र काही नाही. ' 


श्यामराव म्हणाले, ' अरे भगवान, आज सगळ्यांना मस्त फर्मास जेवण आहे ना माझ्याकडून ! शिवाय मुलांना तुझं सांगणं आवडतं त्याला मी काय करणार ! ' 


' अरे श्याम, मी गमतीनं म्हटलं. मला काही नको. राजेश आणि पिंकी माझी पण आवडती मुलं आहेत. त्यांना काही सांगण्यात मला आनंदच आहे. माझ्या कॉलेजमधील विद्यार्थी सुद्धा एवढ्या उत्सुकतेनं ऐकत नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीची त्यांना आपण जी ओळख करून देतो आहोत, ती उद्याची पायाभरणी आहे. जी मुलं पुढे चालून भारताची भावी नागरिक होणार आहेत, त्यांना आपला प्राचीन समृद्ध वारसा माहित असायलाच हवा. मोठी झाल्यावर ही मुलं आपल्या संस्कृतीचा अभिमान तर बाळगतीलच पण तो जोपासतील आणि वाढवतील ' भगवानराव म्हणाले. 

' अगदी बरोबर आहे भगवान, ' श्यामराव म्हणाले.


भगवानराव मुलांकडे वळून म्हणाले, ' बाळांनो, मागील वेळी भारतीयांना धातुशास्त्राची किती प्राचीन काळापासून माहिती होती ते मी सांगितलं होतं. दिल्लीतील मेहरौली येथील गरुडस्तंभाची पण मी माहिती दिली होती. ' 


' भारत प्राचीन काळापासून किती स्वयंपूर्ण होता याची माहिती केवळ मी सांगतो आहे म्हणून खरी मानू नका. भारतात इंग्रजांची सत्ता स्थिरस्थावर होण्याच्या सुमारास असताना काही इंग्रज, फ्रेंच, स्कॉटिश इतिहासकार भारतात येऊन गेले. काही इंग्रज अधिकारी भारतात राहिले. त्या सगळ्यांनी जे काही आपल्या देशाबद्दल सांगितले आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरे म्हणजे ही माहिती शाळा कॉलेजच्या पुस्तकांमधून सांगितली गेली पाहिजे. पण आजवर या महत्वाच्या गोष्टीकडे तसे दुर्लक्षच होत आले आहे. पण सध्याची परिस्थिती मात्र मला जरा आशादायक वाटते. काही वर्षांनी हे चित्र नक्कीच बदलेल. काय श्याम, तुला काय वाटते ? ' 


' अरे अगदी बरोबर आहे. शैक्षणिक धोरणात बदल होत आहे. आणि पुढील काळात या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकात यायला हरकत नाहीत असं मलाही वाटतं, ' श्यामराव म्हणाले. 


' तर बाळांनो, भगवानराव म्हणाले, आपण भारतात दीर्घकाळ राहिलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्यापासून सुरुवात करू. हा अधिकारी भारतात अनेक वर्षे राहिला. त्याने आपल्या येथील वास्तव्यात जवळपास आपला सगळा देश फिरून पालथा घातला. आणि त्याला ज्या काही गोष्टी कळल्या, त्या त्याने लिहून ठेवल्या एवढेच नव्हे तर तो जेव्हा इंग्लंडला परत गेला, तेव्हा त्याने तेथील पार्लमेंटसमोर भारतासंबंधी ज्या काही गोष्टी मांडल्या, त्या आपल्याला अभिमान वाटावा अशाच आहेत. २ फेब्रुवारी १८३५ या दिवशी त्याने हे भाषण दिले. ' 


' अहो काका, पण तो इंग्रज अधिकारी कोण होता ? त्याचं नाव तरी सांगा ना ! पिंकी म्हणाली. 


' अरे हो, त्याचं नाव सांगायचं राहिलंच. त्याचं नाव होतं थॉमस मेकॉले. हा मी कॉलेज विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ होता. त्याने इंग्लंडच्या पार्लमेंटसमोर सांगितलं की मी सारा भारत फिरलो पण मला कुठेही एकही व्यक्ती चोर, गरीब किंवा बेरोजगार आढळली नाही. भारत हा व्यापारी, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आपल्यापेक्षा प्रगत देश आहे. भारतात प्रचंड श्रीमंती मी पाहिलेली आहे. आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला गुलाम बनवणे कठीण असते. भारतीयांना गुलाम बनवणे, इंग्रजी सत्तेचे अंकित बनवणे म्हणूनच कठीण आहे. ' भगवानराव म्हणाले. 


' काय आश्चर्य आहे काका, भारत खरंच एवढा श्रीमंत देश होता आणि तिथे एकही व्यक्ती गरीब किंवा भिकारी नव्हती ? ' राजेश म्हणाला. 


' हो, राजेश. मेकॉले म्हणतो, मी ज्या ज्या घरी गेलो, त्या त्या ठिकाणी भरपूर श्रीमंती आणि समृद्धी पाहिली. एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जसा गहू, हरभऱ्याची रास असावी असावी, तसा सोन्याच्या नाण्यांचा ढीग मी पाहिला आहे. मी त्या माणसांना विचारले की ही किती नाणी आहेत ? तर ती माणसे म्हणायची की आम्ही ती मोजत नाही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यावेळी सोने हे विनिमयाचे साधन होते. आणि लोक तराजूच्या साहाय्याने किलोने सोने मोजत. ' 


' बापरे, एवढे सोने होते भारतात ! ' पिंकी म्हणाली. 


' हो, म्हणून तर इंग्रज भारताला ' सोने की चिडिया ' म्हणत. भारतात मंदिरे सुद्धा सोन्याची होती. मंदिरातील देवदेवांच्या मूर्ती,दरवाजे, कळस यासारख्या सगळ्या गोष्टी सोन्याचांदीच्या होत्या. मूर्तींच्या मुकुटात आणि अंगावर असलेल्या दागिन्यांमध्ये मौल्यवान रत्ने आणि जडजवाहिर होते. भारतात सोन्याचा धूर निघत होता असे आपण म्हणतो ही गोष्ट अक्षरशः खरी होती. तुम्हाला माहितीच असेल की गझनीच्या महम्मदाला सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यासाठी १७ वर्षे लागली होती. भारत केवळ कृषीच नव्हे तर व्यापारी आणि औद्योगिक दृष्ट्याही प्रगत होता. ' 


पिंकी म्हणाली, ' काका, किती वैभवशाली होता आपला प्राचीन भारत नाही ? ' 

' अहो मुलांशी बोलतच बसणार आहात की जेवायला पण येणार आहात ? जेवायची तयारी झाली आहे, ' आतून श्यामलाताईंनी आवाज दिला.

' हो हो आलोच. भगवानराव, आता जरा ब्रेक घ्या. आपण सगळे जेऊन घेऊया. श्यामराव हसत हसत म्हणाले.


' हो बाळांनो, आणखी काही माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन बरं का, ' भगवानराव म्हणाले. मग सगळ्यांची पाऊले स्वयंपाक घराकडे वळली.  ( क्रमशः ) 


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१८/०८/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...