उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग आठ )
जे आर डीं च्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्याआधी जमशेटजींचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराबजी जे आधी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, त्यांचे योगदान जाणून घेणे महत्वाचे आहे, नाहीतर दोराबजींवर अन्याय केल्यासारखे होईल. जे आर डींचे वडील आर डी आणि दोराबजी यांनी मिळून टाटा अँड सन्सची भरभराट केली. दोराबजी जरी थकले होते, तरी त्यांनी अखेरपर्यंत काम करून टाटांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. १९२० व १९२४ मध्ये ऑलिम्पिक मध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला होता. त्यांची पत्नी मेहेरबाई यांनी बॉंबे वूमन प्रेसिडेन्सी कौन्सिल स्थापन करून भारतीय महिलांना इंटरनॅशनल वूमेन्स कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवून दिला. टाटांच्या तीन कापडमिल, पोलाद कारखाना, तीन विद्युत प्रकल्प, टाटा केमिकल्स या उद्योगांची पायाभरणी आणि विस्तार दोराबजींच्याच काळात झाला. दोराबजींना भारतात रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना करायची इच्छा होती. त्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी ते जर्मनीत गेले असताना दुर्दैवाने तेथेच त्यांचे निधन झाले.
आपल्या मृत्यूची चाहूल कदाचित त्यांना लागली असावी म्हणून युरोप दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी एक विश्वस्त संस्था स्थापन केली होती आणि आपल्याकडील सर्व वस्तू या ट्रस्टकडे सोपवल्या. या ट्रस्टने दोराबजींच्या मृत्यूनंतर अनेक कल्याणकारी आणि संशोधनात्मक संस्थांची स्थापना करून टाटांच्या नावलौकिकात भर घातली. त्यात टाटा मेमोरियल कँसर हॉस्पिटल ज्यात देश विदेशातून कॅन्सरचे रुग्ण येतात. अत्यंत महागडे असलेले कॅन्सरचे उपचार इतर देशांच्या तुलनेत या ठिकाणी अत्यंत कमी दरात केले जातात. इतर संस्थांमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थांचा समावेश आहे. जे आर डीं चा समावेश आपोआपच या ट्रस्टमध्ये देखील विश्वस्त म्हणून झाला.
सर दोराबजी यांच्या मृत्यूनंतर नवरोजी सकलातवाला हे टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख झाले. पण त्यांच्या काळात भारतात आर्थिक मंदी होती. त्यामुळे फारसे नवीन उद्योग सुरु न करण्याचा निर्णय घेतला. सकलातवाला हे टाटा अँड सन्सचे आधी ज्येष्ठ संचालक होते आणि जमशेटजींची बहिणेचे सुपुत्र होते. पण त्यांना फारसा अवधी आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी मिळाला नाही. ते युरोपच्या दौऱ्यावर असताना १९३८ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा अँड सन्सचे अध्यक्षपद रिकामे झाले. या वेळी सर्व संचालकांनी एकत्रितपणे विचारविनिमय करून जे आर डीं ना चेअरमनपदी बसवण्याचा निर्णय घेतला. या वेळी जे आर डी होते अवघे ३४ वर्षांचे. अर्देशीर दलाल हे संचालक वगळता सर्व संचालकांनी जे आर डीं वर विश्वास टाकला. अर्देशीर दलाल यांच्या मते स्पोर्ट्स कार, विमाने यांच्यात रस असलेली ही पोरसवदा व्यक्ती टाटांसारख्या बड्या उद्योगसमूहाचे चेअरमनपद कसे काय सांभाळू शकेल हा प्रश्न होता. पण लवकरच जे आर डींनी आपल्या कर्तृत्वाने त्यांची निवड अगदी यथार्थ होती हे सिद्ध केले.
टाटांच्या उद्योगसमूहाचे अध्यक्षपद सुयोग्य व्यक्तीकडेच दिले जावे, मग भलेही ती व्यक्ती टाटांच्या घरात जन्मलेली असो वा नसो ही जमशेटजींनी सुरु केलेली परंपरा टाटा अँड सन्सने पुढे चालवली. त्याच परंपरेने जे आर डी हे अध्यक्ष म्हणून आरूढ झाले. पुढे त्यांनी आपली निवड सार्थ होती हे दाखवून दिले.
एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या महत्वाच्या पदावर येते तेव्हा, तिला त्यावेळी जी परिस्थिती असेल ती स्वीकारून तिला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. जे आर डी अध्यक्ष झाले तो काळ आर्थिक मंदीचा होता. दुसरे महायुद्ध संपत आले होते. भारतात स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला होता. जे जे महापुरुष होऊन गेले किंवा ज्या ज्या व्यक्तींनी काही विशेष कर्तृत्व गाजवले, त्या त्या व्यक्तींच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेली आपल्याला आढळते. मग ती श्रीराम, श्रीकृष्णासारखी अवतारी व्यक्तिमत्वे असोत की शिवरायांसारखे महापुरुष. अशी माणसे परिस्थितीपुढे झुकत नाहीत तर परिस्थितीवर स्वार होतात. स्वतःला बदलावण्यापेक्षा ते परिस्थिती बदलण्याची हिंमत ठेवतात. जे आर डीं ची अध्यक्ष म्हणून एंट्री अशाच वातावरणात झालेली होती. सर्व संचालक मंडळ गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यांनी जे आर डींना अध्यक्ष म्हणून तर बसवले, आता पुढची जबाबदारी जे आर डीं ची होती.
जे आर डीं नी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली नव्हती. त्यांच्याजवळ तांत्रिक ज्ञानाचा अभाव होता. अर्थात जे आर डीं ना ही उणीव आयुष्यभर जाणवत राहिली. पण ही उणीव त्यांनी वाचनाने भरून काढली. वाचन ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला शाळा कॉलेजात न जाता प्रगल्भ बनवत जाते. फक्त शिकण्याची इच्छा हवी. जे आर डी अशा प्रकारची व्यक्ती होते. त्यामुळे ते नेहमीच इतर संचालकांच्या दोन पावले पुढे असत. ज्या गोष्टी त्यांना समजत नसत, त्या गोष्टी ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांच्याकडून समजून घेत असत. त्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. आपले अध्यक्षपद त्यांनी कधीच त्या आड येऊ दिले नाही. जे आर डी तसे मिश्किलही होते. कधी कधी ते डोळे मिचकावीत म्हणत की संचालकांनी मला सामान्य सैनिकावरून एकदम जनरलपदी नेऊन बसवले आहे. पण ती त्यांची योग्यताच होती.
इतर कंपन्यांनी आदर्श घ्यावा असे काम जे आर डीं नी त्या काळात उभे केले. जे आर डीं नी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि बुद्धिमान माणसे निवडून त्यांना टाटामध्ये आणले. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी केलेला हा उद्योग इतरांच्या चेष्टेचा विषय झाला होता. इतर कंपन्या जेव्हा आपल्याकडे गरज लागेल तेव्हा तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करीत असत. जे आर डींनी त्याच्या उलट केले. त्यांनी आधी अशा गुणी माणसांना आपल्याकडे सामावून घेतले आणि नंतर त्यांच्यासाठी पद निर्माण केले. अशा अनेक गुणी आणि बुद्धिमान माणसांनी टाटांसाठी मग अफाट योगदान दिले. जे आर डींनी कायमच नैतिकतेला आणि सचोटीला प्राधान्य दिले. टाटांच्या भरभराटीचे रहस्य यातच होते.
जे आर डीं ना माणसांची उत्तम पारख होती. माणसे शक्यतो प्रामाणिकच असतात यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते आपल्या माणसांवर संपूर्ण विश्वास टाकत असत. प्रत्येक बुद्धिमान माणसाची काम करण्याची स्वतःची एक पद्धत असते. जे आर डीं नी त्यांना आपल्या पद्धतीने काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले. ते त्यांच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करीत असत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एखादा दुसरा अपवाद वगळता कोणाला कामावरून काढले अशी वेळ आली नाही. त्यामुळे टाटामध्ये काम करणारी माणसे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तर मोठी झालीच पण टाटांच्या नावलौकिकाला साजेसे काम त्यांच्या हातून झाले. आपण नोकर नसून टाटांची ही कंपनी आपलीच कंपनी आहे, आपण करीत असलेले काम फक्त त्यांचे नसून आपलेही आहे ही आपलेपणाची भावना या लोकांमध्ये निर्माण करण्यात जे आर डी यशस्वी ठरले. अर्थतज्ज्ञ दिनशॉ, वकील जे डी चोक्सी, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला, होमी मोदी, कर्नल सहानी, रुसी मोदी, डॉ जॉन मथाई, ए डी श्रॉफ, सुमंत मुळगावकर, श्री दलाल, तळावलीकर, अजित केरकर, पेंडसे इ नामवंतांची ही मोठी यादी आहे ज्यांना हेरून जे आर डीं नी टाटा समूहात सामावून घेतले. या सगळ्या बुद्धिमान मंडळींना सांभाळण्यात आणि त्यांच्यामध्ये आपण जे काही करीत आहोत, त्यामुळे देशसेवेसाठी आपला हातभार लागतो आहे ही भावना निर्माण करण्यात जे आर डी कमालीचे यशस्वी ठरले.
कुठलेही काम सुयोग्य पद्धतीने करायचे असेल तर त्याचा सर्व बाजुंनी अभ्यास करायला हवा. त्यासंबंधीचे सर्व तपशील, आकडेवारीसकट गोळा करायला हवेत यावर जे आर डीं चा भर असायचा. त्यामुळे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याची सवय लावली. ' साधारण ', ' अंदाजे ' यासारखे शब्द त्यांना आवडत नसत. जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरु करायचा असे, तेव्हा अशा सर्व प्रकारची आकडेवारी त्यांना हवी असे. त्यामुळे त्या संदर्भातील पुढील निर्णय घेणे त्यांना सोपे होत असे. अशा प्रकारची आकडेवारी गोळा करण्यासाठी त्यांनी स्टॅटिस्टिक्स हा स्वतंत्र विभागाचं सुरु केला. तेव्हा अशा प्रकारचा विभाग कुठल्याही उद्योगात अस्तिस्त्वात नव्हता. सरकार सुद्धा आपल्याला लागणारी आकडेवारी मागील काही वर्षे जुन्या अहवालांवरून करीत असे. त्यावेळी टाटांकडे उपलब्ध असणारी आकडेवारी आणि तपशील एवढे अद्ययावत असायचे की सरकारी अधिकारी सुद्धा टाटांकडून आकडेवारी आणि डिटेल्स घेत असत. स्टॅटिस्टिक्स विभाग सुरु करताना जे आर डीं नी त्यावेळी मुंबई सरकारमध्ये काम करणाऱ्या वाय एस पंडित या अधिकाऱ्यांना बोलावून घेतली आणि त्यांची स्टॅटिस्टिक्स विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक केली. याच वाय एस पंडितांनी पुढे २८ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करून टाटांच्या प्रगतीला हातभार लावला आणि जे आर डीं ची निवड सार्थ ठरवली. पुढे याच स्टॅटिस्टिक्स विभागाला जोडून जे आर डीं नी अर्थविभाग अर्थात इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरु केले. डॉ जॉन मथाई यांनी या विभागाचे प्रमुखपद सांभाळले.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा