उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग बारा )
डोंगराएवढी माणसे...
मी जसजसा जे आर डींच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो तसतसा जे आर डी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो. जे आर डीं नी टाटा मध्ये आणलेली एकेक माणसे पाहिल्यानंतर तर माझा आदर दुणावतच गेला. जे आर डींचे चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच...! जसजसे उत्खनन करावे, तसतशी एकेक रत्ने हाताला लागत गेली. आजच्या भागात अशाच काही रत्नांचा परिचय.
जे आर डीं नी जी गुणी आणि बुद्धिमान माणसे टाटा अँड सन्स मध्ये आणली, त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवले. त्यातील सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इंपिरियल कॉलेजमधून इंजिनिअर झालेले होते. सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केले. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामुग्री आयात परवानगी नव्हती. तेव्हा मुळगावकरांनी स्वतः यंत्रांचे आरेखन आणि उभारणी केली. टाटांच्या चार सिमेंट कारखान्यांचे रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण्यात आले. ए सी सी हा स्वदेशी यंत्रसामुग्रीच्या जोरावर सिमेंट निर्मिती करणारा कारखाना झाला. हा कारखाना सुरळीत चालू झाला. सुमंत मुळगावकरांसारख्या कर्तृत्वशाली व्यक्तीला केवळ तिथे अडकवून ठेवणे जे आर डींना योग्य वाटले नाही. त्यांनी मुळगावकरांना म्हटले, ' ते विटा पाडण्याचे काम कोणीही करील. तुमची दुसरीकडे जरुरी आहे. ' जे आर डींनी मुळगावकरांवर टेल्कोची जबाबदारी सोपवली.
सुरुवातीला जमशेटपूरमध्ये मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्सल भारतीय ट्र्क तयार होऊ लागले. या ट्रक्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होती. या ट्रक्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली. सुरुवातीला श्रीलंका या देशात आणि पुढे जर्मनीसह अनेक देशांना ट्रक निर्यात होऊ लागले. ब्रिटिशांनाही टाटांनी ट्रक पुरवले आणि नंतर भारतीय सैन्यात देशासाठी टाटांचे ट्रक मोलाची कामगिरी बजावू लागले. पुढे पुण्यामध्ये टेल्कोचे विस्तारीकरण करण्यात आले. या ठिकाणी संशोधन विभाग मुळगावकरांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली. सुरुवातील बरीच वर्षे या ठिकाणी कोणतीही निर्मिती झाली नाही. पण या ठिकाणी कामगारांचे प्रशिक्षण सुरु होते. जे आर डींचा सौम्य, मितभाषी असण्याऱ्या मुळगावकरांवर पूर्ण विश्वास होता. पुण्याचा हा कारखाना सुरुवातीची काही वर्षे तोट्यात चालला, पण ती पुढील व्यवसायवृद्धीची पायाभरणी होती. मुळगावकरांनी हा कारखाना इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला की टाटांचे कारखाने कसे असतात याचा नमुना म्हणून तो पाहुण्यांना दाखवता येत असे.
पुण्यातील टेल्कोची जमीन ओसाड आणि खडकाळ होती. मुळगावकरांनी या ठिकाणी एका कृत्रिम तलावाची निर्मिती केली. या योजनेला त्या काळात प्रचंड खर्च आला म्हणून इतर संचालक नाराज होते. पण या तलावाची निर्मिती झाली. मुळगावकरांनी हजारो वृक्ष लावून हा परिसर हिरवागार केला. या परिसराचे रूपच पालटले. आज या ठिकाणी हजारो पक्षी स्थलांतर करून येतात इतका हा परिसर नयनरम्य आहे आणि याचे श्रेय केवळ मुळगावकरांच्या दूरदृष्टीला जाते. पुढे मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली टाटांनी अनेक वाहनांची निर्मिती केली. आज आपण मेक इन इंडिया या मोहिमेबद्दल बोलतो पण त्याचा खऱ्या अर्थाने पाया घालणारा हा माणूस. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि प्रसिद्धी पराङ्मुखता. कधी कधी लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढे काम केले पण तुम्हाला फारसे कोणी ओळखत नाही. तेव्हा ते म्हणायचे की मला नाही ओळखले तरी चालेल, मी निर्माण केलेल्या वाहनांना लोकांनी ओळखावे एवढीच माझी इच्छा आहे.
आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे मुळगावकरांनी टेल्कोसाठी खर्च केली. टाटा समूहाचे नाव देशाबरोबर कसे जोडले जाईल आणि आदराने घेतले जाईल हाच एक विचार कायम त्यांच्या मनात असायचा. टिस्को आणि टेल्को या दोन कंपन्यांचे ते प्रमुख राहिले. जे आर डींनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर वयाच्या ८४ व्या वर्षी या धुरंधर शिलेदाराने आपली शस्त्रे रतन टाटांकडे सोपवली आणि एका वर्षाच्या आत शांतपणे आपली इहलोकीची यात्रा संपवली. टाटांच्या सुमो या गाडीला सुमंत मुळगावकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून Sumant Moolgaonkar ' या नावाची Sumo ही नावाची आद्याक्षरे ठेवण्यात आली आहेत. ' सुमो ' हे नाव जपानी पहिलवानाच्या नावावरून दिलेलं नाही.
मुळगावकरांबद्दल बोलताना जे आर डी एकदा म्हणाले होते, ' माझ्या आदर्शांजवळ जाणारा, द्रष्टेपणाची तुलना करता जमशेटजी यांच्याजवळ जाणारा माझा एकमेव सहकारी म्हणजे सुमंत मुळगावकर. मी चेअरमानपद स्वीकारल्यानंतर एवढी एकच नेमणूक केली असती, तरी मी त्या खुर्चीला न्याय दिला असता असे समजलो असतो. ' मुळगावकरांचा गौरव करणारे यापेक्षा अधिक सुंदर उद्गार दुसरे कोणते असू शकतील ! तर प्रख्यात कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी मुळगावकरांचे वर्णन ' नेशन बिल्डर ' म्हणजे राष्ट्रउभारणी करणारा या शब्दांत केले आहे. मुळगावकर म्हणजे काळाची पावले ओळखून वागणारे व्यक्तिमत्व. युरोपात विशेषतः जर्मनीत कारखाने आणि त्यांच्या जोडीला भोवतालचा हिरवागार निसर्ग अशी जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा भारतात मुळगावकरांनी अगोदरच त्याचा श्रीगणेशा केला होता. मुळगावकरांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांच्या पत्नी लीलाताई यांच्यासोबत त्यांनी आपल्या कार्याला समाजसेवेचीही जोड दिली. एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःवर घेणे, गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शाळा सुरु करणे आदी त्यांच्या कामांची यादी करायची झाली तर ती खूप मोठी होईल. एखादी व्यक्ती किती अष्टपैलू आणि अष्टावधानी असू शकते हे मुळगावकरांसारख्या व्यक्ती पाहिल्या म्हणजे कळते.
अशीच आणखी एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे दरबारी सेठ. १९३९ मध्ये सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर जे आर डींनी टाटा केमिकल्स या कारखान्याची उभारणी केली. त्या काळात उद्योगांसाठी लागणारी रसायने परदेशातून आयात करावी लागत. कापड, काच, साबण, सोडा ऍश, खते, कृत्रिम फरशा इ अनेक गोष्टींच्या निर्मितीसाठी ही रसायने आवश्यक असत. ही रसायने भारतातच निर्माण करावीत असा जे आर डींचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला. पण तेथे उपलब्ध असलेल्या मर्यादित नैसर्गितक स्रोतांमुळे हा कारखाना चालवणे कठीण होऊ लागले. कंपनीच्या इंजिनिअर्स आणि संचालकांच्या सभेत हा प्रकल्प बंद करावा अशी सूचना आली असताना दरबारी सेठ नावाच्या तरुण इंजिनिअरच्या बोलण्याने जे आर डींचे लक्ष वेधून घेतले. कामाची पद्धत बददल्यास उत्पादनात वाढ करता येईल हे त्यांनी पटवून दिले. इतर संचालकांचा विरोध असतानाही जे आर डींनी टाटा केमिकल्सची सूत्रे या तरुण इंजिनिअरकडे सोपवली.
या कारखान्यात रसायने निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज होती. या प्रदेशात तर शुद्ध पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य होते. दरबारी सेठ अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला. नवीन तरुणांना कामावर घेऊन, प्रशिक्षण देऊन तयार केले गेले. या कंपनीचे नियोजित उद्दिष्ट ४०० टनांच्या उत्पादन निर्मितीचे होते. दरबारी सेठ यांनी ५०० टन उत्पादन करून हा टप्पा ओलांडला. पुढे तर दुष्काळ पडला. जवळपास तीन ते चार वर्षे पाऊस अगदी नाममात्र झाला. पण दरबारी सेठ यांनी पाणी वापराचे इतके कुशल नियोजन केले होते की सुरुवातीला जेथे २२ लाख गॅलन पाणी लागत होते, तेथे केवळ पाच लाख गॅलन पाण्यावर गरज भागू लागली. रोजचे उत्पादन पाचशे टनांवरून २२०० टनांवर पोहोचले. पुढे दरबारी सेठ यांच्या दूरदृष्टीने मिठापूरपासून द्वारकेपर्यंतचा हा परिसर हिरवागार झाला. पुढे या कारखान्याचा देशात अनेक ठिकाणी विस्तार झाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती सुरु झाली. आजही हा प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पात गणला जातो.
असे म्हटले जाते दरबारी सेठ यांचा हात म्हणजे ' मिडास टच '. त्यांचा हात ज्या ज्या गोष्टींना लागला त्यांचे सोने झाले. पुढे तर असे झाले की कुठे काही अशा अडचणी उभ्या राहिल्या की जे आर डींनी हुकमी एक्का म्हणून दरबारी सेठ यांना बोलवावे. एकदा त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली की ते काम पूर्ण झालेच म्हणून समजा. प्रत्येक वेळी नवनवीन कल्पना शोधून ते अडचणींतून मार्ग काढत. पुढे त्यांच्यावर केरळमधील टाटा-फिनलेचे चहा-कॉफीचे मळे, आसाममधील कंपन्यांचे विस्तारीकरण, इन्स्टंट टी कॉफीची निर्यात या सगळ्यांची यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. दरबारी सेठ केवळ केमिकल इंजिनिअर नव्हते तर त्यांच्यामध्ये एक पर्यावरणप्रेमी सुद्धा दडलेला होता. केरळमधील मुन्नारजवळचे हत्तींसाठी आरक्षित असलेले जंगल, हजारो एक फुललेले चहाचे हिरवेगार मळे यासाठी दरबारी सेठ यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. दरबारी सेठ यांनी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची एवढी काळजी घेतली की त्यांच्यात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य होते.
टाटांसाठी असेच मोलाचे योगदान अजित केरकर ज्यांनी इंडियन हॉटेल्सची व्यवस्था सांभाळली. नुसती सांभाळलीच असे नाही तर ती वाढवून तिला नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी सूत्र हाती घेतली तेव्हा या कंपनीकडे एकमेव ताज हॉटेल होतं. आज या कंपनीची जगभर पसरलेली ३७ ख्यातनाम हॉटेल्स आहेत, ज्यांचे श्रेय केरकरांना जाते. अशाच कर्तृत्ववान व्यक्तींमध्ये नानी पालखीवाला हे अर्थतज्ज्ञ आणि निष्णात कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ द रा पेंडसे, रुसी मोदी, होमी मोदी, श्री पंडित इ चा समावेश होता. या सगळ्या व्यक्ती इतक्या कुशल आणि आपापल्या क्षेत्रात इतक्या निष्णात होत्या की प्रसंगी भारत सरकार देखील त्यांना आपल्या कामासाठी काही काळापुरते टाटांकडून मागून घेत असे.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०३/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
![]() |
| सुमंत मुळगावकर आणि जे आर डी |

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा