उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पाच )
मुलांच्या शिक्षणासाठी सुनीला वारंवार घर बदलावे लागे. तिची खूप धावपळ होत असे म्हणून सुनीच्या आणि मुलांच्या सोयीसाठी आर डी नी फ्रान्समध्ये हार्डलॉट येथे स्वतःचे घर विकत घेतले. हे घर फ्रान्समधील प्रसिद्ध वैमानिक लुई ब्लेरिओ याच्या घराजवळच होते. १९०९ मध्ये आपल्या विमानाने इंग्लिश खाडी पार करणारा लुई हा पहिला वैमानिक होता. जेहला मुळातच मोटारी आणि विमाने यांची आवड होती. एका प्रसिद्ध वैमानिकाच्या घराजवळ राहायाला मिळणे ही जेहसाठी सुवर्णसंधीच होती. लुईच्या विमानांची उड्डाणे आणि लँडिंग जेह मोठ्या उत्सुकतेने बघत असायचा.
१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अनेक सैनिक जखमी होत होते. या कठीण प्रसंगी देशाची सेवा करता यावी या उदात्त भावनेतून सुनीने पॅरिसमधीलच एका अमेरिकन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्या कामात व्यत्यय येऊ नये तसेच मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिने आपल्या मुलांना तिच्या आईकडे पाठवले. हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली. सुनीला देखील कामाचा ताण वाढू लागला. तिच्या नाजूक प्रकृतीला हा ताण झेपत नव्हता. तशातच तिला क्षयाची बाधा झाली आणि तिची प्रकृती ढासळत गेली.
तशातच महायुद्धामुळे पॅरिसमधील परिस्थिती धोकादायक झाली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरवर बॉम्बहल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते. तशातच खाण्यापिण्याची सुद्धा आबाळ होत होती. हे आर डीं ना कळल्याबरोबर त्यांनी तातडीने सुनी आणि मुलांना मुंबईत आणण्याची व्यवस्था केली. त्या वेळी समुद्रप्रवासाला पर्याय नव्हता. महायुद्धामुळे समुद्रप्रवासही धोक्याचा बनला होता. पाणबुडी आणि जहाजांवर हल्ले होत होते. पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने सुनी आणि मुले सुखरूप भारतात आले. दरवेळी सुनी भारतात आली की आर डी भाड्याने नवीन घर घेत. पण आता तिची प्रकृती नाजूक झाली होती. तिला ताण नको म्हणून आर डींनी सुनी आणि मुलांची व्यवस्था मुंबईच्या ताज हॉटेलमध्येच केली. आता पॅरिसपेक्षा जेवण चांगले मिळू लागले पण मुंबईची दमट हवा सुनीच्या प्रकृतीला मानवत नव्हती. त्यामुळे आर डींनी तिला समशीतोष्ण हवामान असलेल्या जपानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. व्यापारानिमित्ताने जपानमध्ये आर डींचे संबंध होतेच.
जपानमध्ये सुनी आणि मुलांनी साधारण दीड वर्ष वास्तव्य केले. या काळात मुलांच्या शिक्षणाची जरा आबाळच झाली. महायुद्धाचे ढग जसे विरळ होऊ लागले तसे सुनीने मुलांसह भारतात परतण्याचे ठरवले. यावेळी जेह साधारण १४ वर्षांचा झाला होता. येताना परतीच्या प्रवासात जेहला टायपिंग शिकण्याची संधी मिळाली. त्या जहाजावर एक जुने रेमिंग्टनचे टायपिंग मशीन होते. नवीन गोष्टी शिकण्याची आवड असलेल्या जेहने तेवढ्या काळात टायपिंगचे ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान त्याला पुढे अत्यंत उपयोगी पडले. या ज्ञानाचा त्याला कसा उपयोग झाला ते पुढे येईलच. या जहाजाने मुले आणि सुनीला भारतात सोडले आणि ते पुढे इंग्लंडकडे रवाना झाले. पण पुढील प्रवासात हे जहाज सुरुंगस्फोटाने उध्वस्त होऊन समुद्रात बुडाले व त्यावरील सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली. सुदैवाने टाटा कुटुंबियांवरील हे गंडांतर टळले.
मुंबईत काही काळ राहून सुनी आणि मुले पुन्हा फ्रान्सला रवाना झाली. त्यांचे साधारणपणे पाच वर्षे तेथे वास्तव्य झाले. हा काळ बऱ्यापैकी शांततेचा गेला. जेहचे शिक्षणही तेथे Janson De Sailly या नावाच्या शाळेत उत्तम प्रकारे झाले. ही शाळा जेहला अतिशय आवडली. या काळात आर डी आपल्या कुटुंबापासून दुरावले होते त्यामुळे १९२२ मध्ये त्यांनी सुनी आणि मुलांना भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे होते. आर डींचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होते. आता तिच्यासाठी भाड्याचे घर घ्यावे लागू नये म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणि मुलांसाठी मलबार हिलच्या निसर्गरम्य परिसरात आलिशान बंगला बांधण्याचे ठरवले. ते हा बंगला सुनीला परके वाटू नये म्हणून फ्रेंच पद्धतीची डिझाईन, फर्निचर असलेला तयार करत होते. सुनीलाही आपल्या या नवीन घराबद्दल उत्सुकता होती. तिच्या डोळ्यात आपल्या नव्या घरात आपण आपल्या पती आणि मुलांसह राहण्याची स्वप्ने तरळत होती. या बंगल्यासाठी तिने स्वतः पॅरिसमध्ये फिरून वस्तू गोळ्या केल्या होत्या.
पण दैवाच्या मनात दुसरेच काही असावे. सुनीचे पाय या घराला लागायचे नव्हते. तिची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. इकडे टाटा स्टील आणि टाटा इंडस्ट्रियल बँक हे टाटांचे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. आर डी त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यात मग्न होते. त्यांच्या मनात आपल्या प्रिय पत्नीला भेटायला जाण्याची तीव्र इच्छा होती. मुलांनाही भेटण्यासाठी पित्याचे हृदय तळमळत होते. शेवटी त्यांनी तिच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला. पण निघण्यापूर्वीच त्यांच्या हातात सुनी गेल्याची दुःखद बातमी तारेद्वारा येऊन पडली. जड अंतःकरणाने ते फ्रान्सला गेले. सुनीची आणि त्यांची अंतिम भेट ( अंत्यदर्शन ) देखील होऊ शकले नाही. मुलांना घेऊन ते मुंबईला परतले. यथावकाश त्यांच्या बंगल्याचे काम पूर्ण झाले पण जिच्यासाठी एवढा सुंदर बंगला बांधला, तीच आता या जगात नव्हती. सुनी वाचून घर सुने होते. तिची आठवण म्हणून आर डी नीं घराला ' सुनीता ' हे नाव दिले.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा