मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग चार )

  उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग चार )

जमशेटजींच्या अथक प्रयत्नातून जमशेटपूरला पोलाद कारखाना उभा राहिला. १९१२ मध्ये या कारखान्यातून पोलादाची पहिली लड बाहेर पडली. जलविद्युत प्रकल्प उभे राहिले. शिवाय साखर उद्योग, इलेक्ट्रो-केमिकल्स, बांधकाम व्यवसाय इ अनेक उद्योगात टाटांनी आपले पाय भक्कमपणे रोवले. जमशेदपूरच्या कारखान्यातून पोलादाचे उत्पादन सुरु झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला. कामगारांनी जल्लोष केला. भारतातही टाटांच्या कारखान्यातून पोलाद निर्मिती झाली याचा आनंद व्यक्त होत होता. या निमित्ताने भारताची क्षमता जगाला दिसून आली. याच कालखंडामध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले होते. मेसोपोटेमियामध्ये वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशाना रेल्वेमार्गाचे जाळे उभारायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाची आवश्यकता होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे पोलादाची टंचाई होती. या आणीबाणीच्या काळात टाटांनी ब्रिटिशांना पोलाद पुरवले. केवळ दोन वर्षांची बाल्यावस्था असलेल्या या कारखान्याने ( टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स अर्थात तेव्हाचा टिस्को ) मेसोपोटेमिया, इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेसाठी तब्बल १५०० मैल भरतील एवढे रूळ निर्यात केले. ब्रिटिशांनी सुद्धा टाटांच्या या कामगिरीबद्दल तोंडात बोटे घातली. एवढेच नव्हे तर तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी ' साकची ' या गावाचे नाव जमशेटजींच्या या अद्वितीय योगदानाबद्दल ' जमशेटपूर ' होईल असे जाहीर केले. त्याशिवाय जवळच्याच ' कालिमती ' या रेल्वेस्टेशनचे नाव ' टाटानगर ' असे ठेवण्यात आले.

या सगळ्या घडामोडी सुरु असताना एक अप्रिय घटना घडली. जमशेटजींचे सुपुत्र आणि दोराबजींचे धाकटे बंधू रतन यांचा १९१८ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे नाव नवाजबाई होते. रतन यांच्या जागी या नवाजबाई टाटा अँड सन्स च्या स्थायी संचालक झाल्या. त्यांना कोणतेही अपत्य नसल्यामुळे त्यांनी जमशेटजींच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलाला दत्तक म्हणून घेतले. त्याचे नाव नवल होते. पुढे या नवल यांना जो मुलगा झाला, त्याचेही नाव रतन असे ठेवण्यात आले. अर्थात हा रतन म्हणजे जमशेटजींचा पणतू आणि त्यांच्या रतन या मुलाचा नातू. पुढे जे आर डीं नी जेव्हा निवृत्ती स्वीकारली तेव्हा हेच रतन ' टाटा उद्योगसमूहाचे ' प्रमुख झाले. त्यांनी सुद्धा टाटांच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून टाटांच्या नावलौकिकात भर घातली. टाटांचे कुटुंब म्हणजे अशा रतनांची खाणच !

जमशेटजींनी दोराबजी आणि आर डी यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले होते आणि तसे ते करीतही होते पण तरी दोराबजी आणि आर डी यांचे सूर जुळत नव्हते.आर डींचे लग्न एका पारशी मुलीशी झाले होते. पण ती लवकरच निवर्तली होती. त्यांना तिच्यापासून कोणतेही अपत्य नव्हते. त्यांनी पुनर्विवाह केला नव्हता. त्यामुळे आपण पॅरिसला जाऊन स्वतंत्र व्यवसाय करावा असे आर डींच्या मनाने घेतल्यावर त्यांच्या मागे बायको किंवा मुलांचा कोणताही पाश नव्हता. व्यापारासाठी फ्रान्सला गेल्यानंतर फ्रेंच भाषा शिकणे आवश्यक आहे असे त्यांना वाटले. त्यांना जमशेटजींनी त्यासाठी एका शिक्षिकेचे नाव सुचवले. तिच्याकडे ते फ्रेंच शिकण्यासाठी जाऊ लागले. इथेच त्यांना त्यांच्या भावी आयुष्याची जोडीदारीण भेटली. तिचे नाव सुझान. तीही शिकायला येत होती. सुझान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य ! निळ्या निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची परीच जणू काही ! दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न करायचे ठरवले. यावेळी आर डींचे वय होते ४५ वर्षे आणि सुझान होती केवळ वीस वर्षांची.

पारशी धर्मात धर्माबाहेर विवाहाला त्याकाळात अजिबात परवानगी नव्हती. त्यामुळे आपल्या लग्नाला परवानगी मिळेल का याची रास्त शंका आर डींच्या मनात होती. त्यांनी भीत भीतच ही गोष्ट जमशेटजींच्या कानावर घातली. क्षणभर जमशेटजीही गोंधळले पण नंतर त्यांनी मोठ्या मनाने या लग्नाला परवानगी दिली. जमशेटजींनी आपण केवळ रूढी परंपरावादी नसून नवीन गोष्टींचा देखील तेवढ्याच खुल्या मनाने स्वीकार करू शकतो हे यातून दाखवून दिले. जमशेटजी केवळ त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन थांबले नाहीत तर त्यांनी या दोघांच्या विवाहाप्रित्यर्थ इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या काठी असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये सर्वांसाठी मेजवानीचे आयोजन केले. या प्रसंगी इंग्लंडमधील प्रतिष्ठित लोक तसेच तेथे स्थायिक असलेल्या पारशी बांधवांनी हजेरी लावली. नंतर जमशेटजींनी या जोडप्याला मुंबईला नेऊन रीतसर धार्मिक पद्धतीने सुझानला पारशी धर्मात समाविष्ट करून घेतले. सुझान आता टाटांची सून झाली. या सुनेचे नाव 'सुनी ' असे ठेवण्यात आले. पारशी भाषेत सुनी म्हणजे सोनेरी केसांची. सुनीसुद्धा आपल्या पतीबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी भारतीय रीतिरिवाज आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होती.

१९०२ मध्ये सुनी आणि आर डींचा विवाह झाल्यानंतर सुनीला पहिली मुलगी झाली. तिचे नाव सिला ठेवण्यात आले. या मुलीच्या पाठीवर जहांगीरचा जन्म झाला. जहांगीर म्हणजेच जे आर डी. जहांगीर या नावाचा अर्थ होतो जग जिंकणारा. या जहांगीरने आपले नाव सार्थ केले. त्याने आपल्या वागणुकीने आणि कर्तृत्वाने खरोखरच जग जिंकले. त्याला लहानपणी घरात ' जेह ' म्हणून हाक मारत असत. जहांगीर नंतर सुनीला आणखी एक मुलगी झाली. तिचे नाव शेदाबेह. यानंतर आर डीं आणि सुनी यांना आणखी दोन मुले झाली, ती म्हणजे दाराब आणि जिमी. सुनी आता पाच अपत्यांची आई झाली होती.
जेहच्या बालपणातील बरीचशी वर्षे आपल्या आईसोबत आणि फ्रान्समध्ये गेली. त्यामुळे फ्रेंच ही त्याची मातृभाषा झाली. त्याला फ्रेंच भाषा, फ्रेंच वाङ्मय आवडायचे. मुंबईच्या शाळेतील इंग्रजी शिक्षण त्याला तितकेसे आवडत नसे. शिवाय इंग्रज लोक भारतात भारतीय इतिहास शिकवायचा सोडून त्यांचा इतिहास का शिकवतात याचाही त्याला राग येई. जेहचे वडील आर डी व्यापारानिमित्त सतत फिरतीवर असायचे त्यामुळे या पाचही मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी सुनीवर येऊन पडत होती. तिच्या नाजूक प्रकृतीला ही जबाबदारी पेलणे तसे कठीणच जात होते.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव

१२/०२/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...