मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सहा )

 उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सहा )

सुनी गेली तेव्हा ती फक्त ४३ वर्षांची होती. जेहने नुकतेच तारुण्यात पाऊल ठेवले होते. तो साधारण १९/२० वर्षांचा असेल त्यावेळी. आर डीं ना सुनीचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही. ते आठ दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे होते. जेहच्या मनात देखील केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनिअर होण्याची इच्छा होती. आर डी परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते, ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाली होती.

आर डी आणि मुले आता एकत्र राहू लागली. आर डी म्हणजे अनेक गुणांनी विभूषित झालेले व्यक्तिमत्व होते. वक्तशीरपणा, शिस्त याबाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सर्व कामे वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असे. आर डींच्या स्वभावात एक दोष मात्र होता. ते लवकर संतापत आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडत. त्यांची ही सगळीच स्वभाववैशिष्ट्ये जेहने जशीच्या तशी उचलली होती. आर डीं चे देखणे व्यक्तिमत्व, रुबाबदारपणा हे देखील जेहमध्ये उतरले होते. जेहचेआजोबा म्हणजे सुनीचे वडील यांचेही काही गुण जेहमध्ये आले होते. सुनीचे वडील सतत हसतमुख असत. त्यांच्यात हजरजबाबीपणा कमालीचा होता. आपल्या आजोबांची आनंदी वृत्ती, खेळकरपणा, हजरजबाबीपणा जेहने उचलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू त्याला पुढील आयुष्यात फार उपयोगाचे ठरले. आर डी सुटीमध्ये मुलांना पॅरिसमध्ये आजीकडे पाठवत असत. या मुलांची आजी म्हणजे सुनीची आई यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

जमशेटजी गेल्यानंतर आर डींनी त्यांना दिलेला शब्द कसोशीने पाळला. दोराबजींबरोबर त्यांनी टाटांच्या सगळ्या व्यवसायात बरोबरीने योगदान दिले. पहिले महायुद्ध संपले होते. या काळात ब्रिटिशांना रेल्वेसाठी पोलादी रूळ पुरवणाऱ्या टाटांच्या कारखान्यात आता अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कामगारांचे पगार करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत दोराबजींनी आणि आर डींनी इंपिरियल बँकेकडे कर्जाच्या रूपात मदत मागितली. दोराबजींनी आपली मालमत्ता आणि पत्नीचे दागिनेसुद्धा त्यासाठी गहाण ठेवले. पुढे सरकारने टाटांना सहकार्य करण्याचे ठरवले. या काळात काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी टाटा कुटुंबियांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. आर डी आणि मोतिलालजी नेहरू यांची चांगली मैत्री जमली होती. मोतीलाल नेहरू आर डींच्या ' सुनीता ' बंगल्यात राहूनही गेले होते.

१९२३ ला जेहला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. तो क्रॅमर या संस्थेत केम्ब्रिजच्या प्रवेशाची पूर्वतयारी करण्यासाठी दाखल झाला. केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेऊन त्याला इंजिनिअर व्हायचे होते. त्याचा क्रॅमरमधील अभ्यासक्रम संपून केम्ब्रिजमध्ये प्रवेशाची वेळ आली तेव्हा जेहच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने एक नवीन कायदा केला होता. या कायद्यानुसार फ्रान्समधील प्रत्येक कुटुंबातील वीस वर्षे वयाच्या मुलांना सैन्यात दोन वर्षांसाठी भरती होऊन लष्कराचे प्रशिक्षण घ्यावे लागणार होते. कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलासाठी ही अट एक वर्षाने शिथिल करण्यात आली होती. जेहकडे फ्रान्सचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते. फक्त तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने त्याला एक वर्षाची सूट मिळणार होती. त्याचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न मात्र लांबणीवर पडले होते.

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...