उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग नऊ )
जे आर डीं ना गुणी माणसांची अचूक पारख होती. त्यांनी एकेक करून टाटामध्ये घेतलेल्या व्यक्तीने अक्षरशः डोंगराएवढे काम उभे केले आहे. पण त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या भागात पाहू.
आजच्या भागात जे आर डीं च्या लग्नाची मजेशीर हकीगत आपण पाहू. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भलेबुरे असे अपघात किंवा योगायोग येतात. असे भरपूर योगायोग जे आर डींच्या आयुष्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते जपानमधून बोटीने भारतात येताना बॉम्बहल्ल्यापासून सुदैवाने बचावले. वडिलांनी बोलावून घेतल्याने फ्रेंच सैनिकांचे मोरोक्कोत झालेल्या शिरकाणापासूनही ते बचावले. त्यांचे आयुष्य म्हणजे अशा बऱ्या वाईट घटनांनी भरलेली एक कथा आहे. पण डगमगून न जाता सगळ्या प्रसंगातून ते आपल्या धैर्याने, हुशारीने आणि प्रसंगावधानाने पार पडले. त्यांचे लग्न थेल्मा विकाजी नावाच्या तरुणीशी कसे झाले ही मात्र गमतीदार कथा आहे.
जे आर डीं ना विमाने, मोटारी इ ची अतिशय आवड होती. आपल्या वडिलांच्या मागे लागून त्यांनी त्यांना आपल्यासाठी महागडी बुगाटी कार घ्यायला लावली होती. ही गाडी अत्यंत वेगवान असलेली त्यांना अतिशय प्रिय होती. जन्मजात वेगाचे वेड असलेले जे आर डी आपल्या या गाडीने मुंबई ते पुणे हे अंतर त्या काळात रस्ते फारसे चांगले नसतानाही केवळ अडीच तासात पार करत असत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा जे आर डीं वर डोळा होता. त्यांना पकडण्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहत होते. एकदा जे आर डी आणि त्यांचे मित्र रुसा मेहता यांनी एक शर्यत लावली. जुहूवरुन दोघांनी संध्याकाळी आपापल्या गाडीने एकाच वेळी निघायचे आणि केम्स कॉर्नरला भेटायचे असे ठरले. जे आर डी वेगाने निघून केम्स कॉर्नरला पोहोचले पण तोपर्यंत तिथे रुसा मेहता आलेले नव्हते. रुसा मेहतांच्या गाडीला अपघात झालेला आहे असे जे आर डींना कळले. त्यांच्या भेटीसाठी जे आर डी आता सावकाश गाडी चालवीत निघाले. एका झाडावर मेहता यांची गाडी आदळली होती. बऱ्याच काळापासून जे आर डींच्या मागावर असलेल्या पोलिसांना ही आयतीच संधी चालून आली होती. त्यांनी जे आर डी व मेहता पेडर रोडवर भरधाव गाडी चालवत असल्यामुळेच हा अपघात झाला. त्यांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले आहे असा आरोप ठेवून जे आर डीं वर केस दाखल केली.
आता या केसपासून आणि पोलिसांच्या कटकटीपासून सुटायचे असेल तर चांगला वकील पाहिला पाहिजे म्हणून फौजदारी केस लढवणारा चांगला वकील ते शोधू लागले. सुदैवाने असा वकील त्यांना त्यांच्या ताजमहाल हॉटेलच्या पाठीमागेच मिळाला. ताज हॉटेलच्या पाठीशीच प्रसिद्ध फौजदारी वकील जॅक विकाजी यांचे घर होते. या जॅक विकाजींनी त्यांना या केसमधून निर्दोष सोडवले. ते पोलिसांच्या बेडीपासून वाचले पण लग्नाच्या बेडीत अडकले.
थेल्मा ही जॅक विकाजी यांची पुतणी होती. तिचे आईवडील लहानपणीच वारले होते. ती आपल्या बहिणीसोबतच काकांकडेच राहात होती. थेल्माला घरात सगळे थेली म्हणत. थेल्मा आणि तिच्या बहिणीसोबतच त्यांचा एक चुलतभाऊ सुद्धा जॅक विकाजी यांच्याकडे राहत होता. त्याचे नाव बॉबी होते. तो थेल्मापेक्षा लहान होता. जे आर डींचे आणि थेल्माचे एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यामुळे केस जिंकल्यानंतर देखील जे आर डींचे विकाजींच्या घरी जाणेयेणे होते. थेल्माचा भाऊ बॉबी त्यांच्यावर पाळत ठेवत असे. त्यामुळे त्याला काहीतरी आमिष दाखवावे लागे . लवकरच जे आर डी आणि थेल्मा विवाहबद्ध झाले. थेली आणि जे आर डी हे एकमेकांना अगदी अनुरूप जोडपे होते. जणू मेड फॉर इच ऑदर. पुढे आयुष्यभर जे आर डींकडे मोठे उद्योगपती, राजकारणी इ चे जाणेयेणे असे. त्यांना टाटा अँड सन्सचा प्रचंड व्यापही सांभाळावा लागत असे. पण या सगळ्या काळात घरची आघाडी आणि जे आर डींचा शिस्तप्रिय स्वभाव सांभाळण्याचे प्रचंड मोठे काम थेली करीत असे.
जे आर डींना वाचनाची आवड होती. त्यांच्या घरात पुस्तकांनी भरलेली कपाटे होती. तसे जे आर डींना इंग्रजी वाङ्मय फारसे परिचित नव्हते. त्यांचा संबंध फ्रेंच भाषा आणि फ्रेंच वांड्मयाशी आला होता. पण पीटरसन यांनी त्यांना व्यवस्थापनाचे धडे देता देता इंग्रजी वांड्मयाचेही धडे दिले. जे आर डी इंग्रजी वाङमय वाचू लागले. ओ हेनरी हा त्यांचा आवडता कथालेखक होता. तसेच जमशेटजी टाटा हे त्यांचा आदर्श होते. त्यामुळे या दोघांशी संबंधित पुस्तके मोठ्या प्रमाणावर होती. जे आर डींना मोटारी, विमाने यासोबतच गोल्फ खेळण्याची आवड होती. त्यांचे सगळे काम अत्यंत वक्तशीर होते. शिवाय प्रत्येक कामात त्यांचा आग्रह ते काम परिपूर्ण व्हावे असा असायचा. याचा संबंधितांना कधी कधी त्रासही व्हायचा. पण याच ' परफेक्शन ' च्या आग्रहामुळे टाटांनी आपली गुणवत्ता कायम राखली.
जे आर डी आणि थेली या जोडप्याचे वैशिष्ट्य असे होते की ते गर्भश्रीमंत असतानाही अत्यंत साधे राहत. त्यांचे वागणे बोलणे यात कमालीचा साधेपणा होता. त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असत. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्याला त्यांच्या वागण्यातला साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नसे. ' साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ' या तत्वाचा ते दोघेही मूर्तिमंत आदर्श होते. दुर्दैवाने जे आर डी आणि थेली यांच्या संसारवेलीवर अपत्यजन्माचे फुल उमलू शकले नाही. पण थेलीचा वेळ जे आर डींचे करण्यातच जायचा. तिने आपले जीवन त्यांच्याप्रती समर्पित केले होते. १५ डिसेंबर १९३० ला विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याचा तसा ५० वर्षेपर्यंत सुखाने झाला. पण सगळा व्याप सांभाळून थेली आता थकत चालली होती. १९८० मध्ये थेलीला हृदयविकाराचा झटका आला. पुढे आणखी १९८२ मध्ये तिला पक्षाघात झाला आणि उर्वरित दिवस परावलंबी अवस्थेत व्हीलचेअरवर बसून कंठावे लागले. पण जे आर डींना तिच्या कष्टाची, त्यागाची आणि प्रेमाची जाणीव होते. तिच्याकरिता ते आपले काम लवकर संपवून घरी येत. तिला वेळ देता यावा म्हणून त्यांनी आपले गोल्फ खेळणेही बंद केले होते.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२४/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा