मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तेरा )

 उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तेरा )

रोमारोमात देशभक्ती...

जे आर डी म्हणजे रोमारोमात देशभक्ती भिनलेला उद्योगपती. त्यांनी तयार केलेल्या मुंबई योजना किंवा बॉंबे प्लॅन बद्दल आपण भाग अकरा मध्ये डॉ जॉन मथाई यांची माहिती घेताना पाहिले आहे. देशातील आघाडीच्या उद्योगपतींना घेऊन तयार केलेल्या या योजनेत स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशाआकांक्षाचा विचार करून तरतुदी केलेल्या होत्या. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासाठी पंचवार्षिक योजनांचे नियोजन करण्यात आले, तेव्हा जे आर डींच्या सूचना गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. त्यानंतरही जे आर डींनी आत्यंतिक तळमळीने वेळोवेळी अनेक सूचना सरकारला केल्या. त्यातील बऱ्याचशा राज्यकर्त्यांना सोयीच्या नव्हत्या म्हणून त्या अमलात येऊ शकल्या नाहीत हे उघड आहे.

जे आर डी आणि तत्कालीन पंतप्रधान पं नेहरू यांची खास मैत्री होती. या दोघांचेही वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले. दोघेही युरोपात शिकलेले होते. दोघांचीही विचारसरणी त्यामुळे आधुनिक होती. जे आर डींचे बालपण, शिक्षण जरी फ्रान्समध्ये झाले होते तरी त्यांची नाळ भारताशी घनिष्टपणे जोडलेली होती. एक उद्योगपती असूनही त्यांचे विचार, निर्णय आधी भारताच्या हिताचे विचार करणारे असत. कोणताही उद्योग सुरु करताना देशाचा विचार आधी असायचा. १९५१ मध्ये विकास योजनांचा आराखडा बनवण्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे निमंत्रण देण्यात आले. या बैठकीत त्यांनी भारताच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम भारताची लोकसंख्या नियंत्रणात ठेवायला हवी असे प्रतिपादन त्यांनी केले. तसे केले नाहीतर आपण भारताच्या विकासासाठी जे काही शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार इ बाबत प्रयत्न करीत आहोत, ते सर्व वाढत्या लोकसंख्येमुळे फोल ठरतील. जनतेची जीवनपातळी उंचावायाची असेल तर लोकसंख्यावाढ रोखणे हा एकमेव उपाय आहे. जेव्हा लोकसंख्या दुप्पट होईल, तेव्हा दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्याही दुप्पट होईल असे आकडेवारीसहित प्रतिपादन जे आर डींनी केले. पण पं नेहरूंचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा होता. ते म्हणाले, ' लोकसंख्या ही माझी ताकद आहे. '

दुर्दैवाने जे आर डींचे भाकीत खरे ठरले. सुरुवातीला ४० कोटींच्या असलेल्या लोकसंख्येने फक्त पंधरा वर्षातच १०० कोटींचा आकडा ओलांडला. जवळपास निम्मी जनता आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगताना पाहायला मिळते. आज देशात घडणारा हिंसाचार, दहशतवाद, बेकारी, अस्वच्छता, रोगराई, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, बकाल शहरे आणि भकास खेडी यासारख्या अनेक समस्यांचे मूळ आपल्याला लोकसंख्यावाढीत पाहायला मिळते. लोकसंख्या ही शक्तीदेखील ठरू शकते पण रिकाम्या हाताला जेव्हा आपण काही रोजगार पुरवू शकू तेव्हा. अन्यथा हे रिकामे हात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी, दहशतवाद इ गोष्टींकडे वळल्याशिवाय राहत नाही.

पुढे १९५६ मध्ये जे आर डींनी युनोच्या सहकार्याने ' टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ' ची स्थापना केली. नंतर टाटांतर्फे ' फॅमिली प्लॅनिंग फाउंडेशन ' ची स्थापना करण्यात आली. लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणायची असेल तर स्त्रियांची साक्षरता वाढवणे गरजेचे आहे हे आकडेवारीनिशी टाटांच्या स्टॅटिस्टिक्स या विभागाने सिद्ध केले. स्त्री साक्षरतेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, कुटुंबनियोजनाचे प्रकल्प इ ना टाटांतर्फे अर्थसहाय्य पुरवण्यात आले. आजही जे आर डी आणि त्यांची पत्नी थेली यांच्या वैयक्तिक संपत्तीचा ट्रस्ट असे काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य पुरवत असतो.

स्वातंत्र्यानंतर सरकारने ऊर्जा, उद्योग, खाणी, रेल्वे, रस्ताबांधणी इ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची ठरवले. सरकार जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात उद्योग सुरु करणार होते तेव्हा या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांवर देखरेख करण्यासाठी खाजगी संचालकमंडळ ठेवावे आणि त्याकरवी या उद्योगांचे नियंत्रण व्हावे अशी आग्रहाची सूचना जे आर डींनी सरकारला केली होती. पण राजकीय फायद्यासाठी जे आर डींच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पैसा सरकारचा, काम करणारी माणसे सरकारी असे असताना खाजगी संचालक मंडळ नेमून त्यांना अधिकार का द्यायचे असा प्रश्न उपस्थित करून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग नोकरशहा आणि राजकारण्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की हे उद्योग लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, कामकाजातील ढिलाई इ अनेक गोष्टींमुळे एकामागून एक तोट्यात जायला सुरुवात झाली. हे उद्योग चालवणे म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी परिस्थिती निर्माण झाली. आज यातील बरेचसे उद्योग खाजगी क्षेत्राकडे सोपवावेत या निष्कर्षाकडे सरकार आले आहे.

देशावर आलेल्या संकटात जे आर डींनी सरकारशी असलेले आपले मतभेद विसरून सहकार्य केले आहे. भारताची फाळणी झाल्यानंतर जेव्हा निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले, तेव्हा त्यांना आपल्या देशात सामावून घेण्यासाठी मानवतावादी विचार करणे गरजेचे होते. कारण ही मंडळी आपले घर, देश , जमीनजुमला आदी सगळ्या गोष्टी सोडून भारतात येणारे होते. त्यांच्या हृदयात फाळणीची भळभळती जखम होती. हा सगळा विचार करून जे आर डींनी आपल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील तज्ज्ञ व्यक्ती या व्यवस्थेसाठी स्वयंस्फूर्तीने पाठवून दिल्या. या तज्ज्ञांच्या तुकडीने आपल्या अभ्यासपूर्ण नियोजनाच्या साहाय्याने या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना आखून दिल्या आणि म्हणूनच ही मंडळी भारतात स्थिरस्थावर होऊ शकली. पुढे या निर्वासितांच्या साहाय्यासाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना टाटांच्या ट्रस्टने निधी उपलब्ध करून दिला.

देशावर जेव्हा जेव्हा चीन आणि पाकिस्तानचे आक्रमण झाले, त्या त्या वेळी त्यांनी आपल्या जमशेटपूरच्या कारखान्यातील तज्ज्ञ अभियंत्यांची एक फळीच लष्कराच्या मदतीसाठी पाठवून दिली. केवळ एवढे करूनच ते थांबले नाहीत, तर आपल्या सर्व कंपन्यातील फायद्यातील एक विशिष्ट हिस्सा सरकारच्या संरक्षण फंडाला मदत म्हणून पाठवला. त्यांच्या उद्योगाच्या दृष्टीने सरकारपातळीवर काही गोष्टी प्रतिकूल घडत असताना देखील देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी आपली भूमिका निभावली. आपल्या देशातील लोकशाही इंग्लंडसारख्या राष्ट्राच्या धर्तीवर चालवण्याऐवजी फ्रान्सप्रमाणे राष्ट्राध्यक्ष हा देशाच्या प्रमुखपदी असायला हवा असे त्यांचे मत होते. त्यासाठी हवे तर देशाच्या घटनेत बदल करायला हवा असे ते म्हणत. देशाच्या विकासासाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे. सततच्या निवडणुका आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करणे या गोष्टी म्हणजे भ्रष्टाचाराला आणि गैरकारभाला नियंत्रण ठरेल हे त्यांचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे.

आपण ज्या शहरात राहतो, जेथे काम करतो तेथील वातावरण प्रसन्न वाटावे, सर्वानाच त्या चांगल्या वातावरणाचा फायदा मिळावा अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी मुंबई असो की पुणे किंवा जेथे जेथे टाटांचे प्रकल्प असतील त्या त्या ठिकाणचे सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला. मुंबईचे भूषण असणारे ताज हॉटेल, विविध उद्याने, सुशोभित केलेले चौक इ अनेक गोष्टी त्यांच्या या सौंदर्यदृष्टीची आणि सामाजिक जाणिवेची साक्ष देतात. राजकारण्यांनी केवळ मतपेट्यांसाठी केलेले लोकांचे लांगुलचालन त्यांना पसंत नव्हते.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०५/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...