मुख्य सामग्रीवर वगळा

द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग अकरा )

 उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग अकरा )

डोंगराएवढी माणसे...

एक चिनी म्हण आहे. ' तुम्हाला एका वर्षाची विकासयोजना राबवायची असेल तर, मका पेरा. पंचवीस वर्षे पुढची योजना राबवायची असेल तर, झाडांच्या बिया पेरा. शंभर वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा. ' जे आर डींनी नेमके हेच केले. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची पारख होती. या रत्नपारख्याने निरनिराळ्या ठिकाणाहून अशी नानाविध रत्ने गोळा करून टाटांच्या उद्योगसमूहाला प्रगतीपथावर नेले. जे आर डींनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी अक्षरशः डोंगराएवढे काम केले. नुसते कामच केले असे नाही तर जे आर डींनी त्यांना टाटांसोबत वाढण्याची देखील संधी दिली. त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचे नाव तर मोठे केलेच पण वैयक्तिक जीवनातही आदराचे मोठे स्थान प्राप्त केले.

एखादी कर्तृत्वान आणि गुणी व्यक्ती जे आर डींच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचे आमंत्रण देत. त्यासाठी त्यांच्या मागण्याही ते मान्य करत. कंपनीत त्यांच्यासाठी सुयोग्य पद नसले तर ते कालांतराने निर्माण करत पण अशा गुणी आणि बुद्धिमान माणसांचा गोतावळा आपल्याभोवती गोळा करीत. या गुणी आणि बुद्धिमान लोकांना घेतल्यानंतर जे आर डींनी त्यांच्याशी मनमोकळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत. त्यांना पगारवाढ, बढती तसेच हव्या असणाऱ्या जादा सुविधा देखील पुरवल्या जात. साहजिकच ही माणसे मनापासून काम करत. बऱ्याच वेळा एकापेक्षा अनेक बुद्धिमान माणसांना सांभाळणे खूप कठीण असते पण जे आर डीं जवळ ही कला होती. केवळ व्यवसाय करून नफा कमावणे एवढे मर्यादित उद्दिष्ट टाटांचे कधीच नव्हते. त्यांच्या उद्योगव्यवसायाला देशभक्तीचाही एक अनोखा पदर होता. जे आर डीं च्या सहवासात आलेली माणसे देखील या देशभक्तीच्या भावनेने भारली जात. त्यामुळेच त्यांच्यापैकी बहुतेक मंडळींनी आपली सेवा देताना नेशन बिल्डरची भूमिका देखील बजावली. आज आपण अशाच काही व्यक्तींचे योगदान पाहणार आहोत.

जे आर डींनी आपल्याकडे घेतलेल्या अशा व्यक्तींमध्ये जे डी चोक्सी हे एक निष्णात वकील होते. पुढे ते टाटा इलेक्ट्रिकल्सचे चेअरमन बनले. ते जे आर डींचे वैयक्तिक आणि कायदेशीर सल्लागारही होते. चोक्सी प्रचंड बुद्धिमान होते. त्यांना जे आर डींनी त्यांचा पद्धतीने काम करण्याची मोकळीक दिली. चोक्सीनी मग कायदा, इलेक्ट्रिकल्स आणि टाटांच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचे योगदान दिले. मात्र हे सगळे करत असताना चोक्सी यांनी सचोटी, नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची कास कधीही सोडली नाही. टाटा अँड सन्समध्ये अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर चोक्सी वयानुसार निवृत्त झाले. आता वृद्धापकाळामुळे त्यांना त्यांची स्मृती साथ देत नव्हती. चोक्सी जवळच्या माणसांनाही ओळखेनासे झाले. त्यामुळे अनेक मित्रांनी आणि नातेवाईकांनी चोक्सी यांच्याशी संबंध ठेवणे टाळले. पण अशाही काळात त्यांचा एकच मित्र त्यांची चौकशी करीत होता, त्यांच्या भेटीसाठी जात होता. हा मित्र म्हणजेच जे आर डी !

जे आर डींनी टाटा समूहात सामावून घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉ जॉन मथाई होते. ते अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक होते. जे आर डींनी टाटा समूहातील अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी डॉ जॉन मथाईंवर सोपवली. बॉंबे प्लॅन ही टाटांची देशासाठी असलेली महत्वपूर्ण योजना आखण्यात डॉ मथाईंचा मोलाचा वाटा होता. ही योजना काय होती ते आपण थोडक्यात समजावून घेऊ. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. दूरदृष्टी असलेल्या जे आर डींनी स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक आणि आर्थिक प्रगती या भारताच्या गरजा असतील हे ओळखले. स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा व गरजा काय असतील याचाही विचार त्यांनी केला. त्यावर भविष्यात काही योजना आखण्यासाठी त्या वेळेच्या आघाडीच्या उद्योगपतींना त्यांनी एकत्र आणले. त्या उद्योगपतींमध्ये घनःश्यामदास बिर्ला, अहमदाबाद कापड गिरणीचे मालक कस्तुरभाई लालभाई, सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि सर श्रीराम यांचा समावेश होता. याशिवाय टाटा उद्योगाशी संबंधित असणारे अर्देशीर दलाल, डॉ जॉन मथाई आणि ए डी श्रॉफ हे ही होते.

या आठही अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांचे उद्दिष्ट एकच होते. ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणे. या योजनेला मुंबई योजना, बॉंबे प्लॅन किंवा टाटा बिर्ला प्लॅन या नावांनीही ओळखले जाते. या योजनेचे वैशिष्ट्य असे की भांडवलशहा समजल्या जाणाऱ्या देशातील आघाडीच्या उद्योजकांनी एकत्र येऊन आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही योजना होती. अशा प्रकारची योजना अन्यत्र कोणत्याही देशात कधीही झाली नाही.

जॉन मथाई हे भारत सरकारमध्ये रेल्वेमंत्री आणि नंतर अर्थमंत्री देखील होते. पण त्यांनी नंतर राजीनामा देऊन पुन्हा टाटा समूहात सामील होण्यात आनंद मानला. डॉ जॉन मथाई यांनी आपल्या कार्यकाळात आणखी दोन महत्वाच्या संस्थांची निर्मिती केली. त्यात इंडियन इन्स्टिट्यूशन फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि टाटा अग्रीकल्चरल अँड रूरल ट्रेनिंग सेंटर फॉर द ब्लाईंड या संस्थांचा समावेश होता. ते टाटा समूहाच्या टिस्को, टेल्को, इंडियन हॉटेल्स, ए सी सी या सारख्या टाटा अँड सन्समधील कंपन्यांमध्ये कधी चेअरमन तर कधी संचालक म्हणून राहिले. सर दोराब ट्रस्टचे ते चेअरमन होते. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष देखील होते. १९५९ मध्ये भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या टाटा अँड सन्समधील कार्यकाळाबद्दल बोलताना ते म्हणतात, ' टाटामधील माझा हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. टाटांचा कारभार अतिशय उच्च दर्जाचा होता. या कालावधीत मला कोणतीच गोष्ट अशी करावी लागली नाही की ज्यामुळे मला किंवा टाटांना खाली पाहण्याची वेळ येईल. ' त्यांचे हे विधान टाटांबद्दल पुरेसे बोलके आहे.

आणखी काही अशाच गुणी आणि बुद्धिमान माणसांची माहिती आपण पुढील भागात पाहू.

( क्रमशः पुढील भाग बुधवारी )

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


जे आर डी टाटा 

डॉ जॉन मथाई 
































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...