उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग दहा )
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...
भारतात पहिली एअरमेल सेवा सुरु करण्याचे श्रेय जे आर डींच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. जे आर डी हे भारतात विमान चालवण्याचा परवाना मिळवलेले पहिले वैमानिक होते. इंग्लंडच्या रॉयल एरो क्लबने वैमानिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. त्यात जो वैमानिक एकट्याने सहा आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड असा प्रवास पूर्ण करेल, त्याला पाचशे पौंडाचे बक्षीस जाहीर केले होते. मुळातच साहसाची आवड असलेल्या जे आर डींनी या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. या स्पर्धेत त्यावेळी तीनच वैमानिक सहभागी झाले. एक म्हणजे मनमोहनसिंग, दुसरी व्यक्ती म्हणजे केवळ १८ वर्षांचा असलेला आस्पी इंजिनिअर या नावाचा मुलगा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वतः जे आर डी. जे आर डी त्यावेळी साधारणपणे २७/२८ वर्षांचे होते. उत्तम वैमानिक होण्यासाठी जे काही गुण लागतात, ते जे आर डीं मध्ये पुरेपूर भरलेले होते. वैमानिकाला कोणत्याही कठीण प्रसंगी आपले डोके शांत ठेवता यायला हवे. बरेचदा एकापेक्षा एक कठीण निर्णय त्वरित घ्यावे लागतात. त्यासाठी प्रसंगावधान, साहस आणि निर्णयक्षमता या गुणांची जरुरी असते. त्याचप्रमाणे दिशांचे ज्ञान, विमानाची आकाशातील उंची, हवेचा दाब, वातावरण आदी गोष्टींचेही भान असावे लागते. या गोष्टी जे आर डीं जवळ होत्या. याच गुणांची मदत त्यांना पुढे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी झाली.
या तिघांपैकी मनमोहनसिंग यांचे विमान धुक्यामुळे रस्ता हरवून पुन्हा त्याच जागी परत आले. आस्पी इंग्लंडहून निघून भारतात आधी पोहोचला आणि जे आर डी हे कराचीहून निघून इंग्लंडला पोहोचले. या धाडसी कृत्यामुळे जे आर डींचे नाव भारतात गाजले. त्यांचे भारतात जंगी स्वागत झाले. यानंतर लगेचच त्यांचे थेल्मा म्हणजेच थेलीशी १९३० मध्ये लग्न झाले. तेव्हा थेलीने आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की माझे लग्न भारतातील एका प्रसिद्ध वैमानिकाशी होणार आहे.
याच सुमारास इंग्लंडच्या आर्मीमधील एक देखणा तरुण नेव्हिल व्हिन्सेंट हा भारतात आपले विमान घेऊन सफरीवर दाखल झाला. तो एक हौशी आणि धाडसी वैमानिक होता. भारतात फिरल्यानंतर भारतात हवाई टपालसेवा सुरु करावी असे त्याच्या मनात आले. त्यासाठी मदत आणि सहकार्याचे आवाहन करण्यासाठी तो जे आर डींकडे आला. यावेळी सर दोराबजी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते. मात्र वृद्धत्वामुळे ते थकले होते. टाटांच्या कंपनीतर्फे अशा प्रकारची हवाई टपालसेवा सुरु करायला ते परवानगी देतील याची शक्यता नव्हती. शिवाय त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी आणि धोकेदायक ठरू शकत होता. अशा वेळी जॉन पीटरसन ज्यांनी जे आर डींना सुरुवातीला व्यवस्थापनाचे धडे दिले होते, ते मदतीला धावून आले. त्यांनी अशा प्रकारची हवाई टपालसेवा सुरु करण्यासाठी सर दोराबजींचे मन वळवले. टाटांच्या उद्योगांच्या इतिहासात एक नवा अध्याय या निमित्ताने जोडला गेला.
बऱ्याच खटपटीनंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारने टाटांच्या हवाई टपालसेवेला मान्यता दिली. १९३२ मध्ये या करारावर सह्या झाल्या. सरकार आणि जे आर डी यांच्यात दहा वर्षांचा करार होऊन टाटा एअरमेल अस्तित्वात आली. पुढे जे आर डींनी इंग्लंडला जाऊन आणखी दोन विमाने खरेदी केली. त्या काळात मुंबईला विमानतळ देखील नव्हता. जुहूला एका मैदानावर विमाने उतरवावी लागत.या प्रसंगीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. या विमानांच्या खरेदीसाठी जे आर डी आपली पत्नी थेलीसोबत इंग्लंडला गेले होते. घेतलेल्या दोन विमानांपैकी एक विमान स्वतः जे आर डी येताना चालवत होते. मध्येच त्यांना नेपल्सला थांबावे लागले. त्या ठिकाणी जे आर डींना ताप भरला. आता विमान घेऊन पुढे जाणे अशक्य होते. जे आर डींनी ते विमान स्वतःचे खाजगी सामान म्हणून ते विमान बोटीने मुंबईला आणले. मुंबईच्या बेलार्ड पिअर इथून ते विमान ते चक्क बैलगाडीत ठेवून जुहूला आणले. अर्थात या विमानाचे पंख वेगळे केल्यानंतर ते बैलगाडीतून नेता येऊ शकत होते. पण या सगळ्या गोष्टींवरून जे आर डींच्या जिद्दीची कल्पना येईल. १५ ऑक्टोबर १९३२ ला त्यांनी टपाल घेऊन पहिले उड्डाण केले. गगनाला गवसणी घातली. मनामध्ये काही करण्याची जिद्द आणि आकांक्षा असेल तर यांच्यापुढे आकाश देखील ठेंगणे वाटू लागते याचा प्रत्यय जे आर डीं ना आला.
जे आर डींची ही एअरमेल सर्व्हिस स्वतःच्या हट्टासाठी नव्हती. देशहिताच्या दृष्टीने व्यापक विचार करून घेतलेला हा निर्णय होता. विमानाची उड्डाणे यशस्वी झाली तरी जे आर डींनी कोणतेही श्रेय स्वतःकडे घेतले नाही. त्यांच्या मनात सतत आपल्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातांचा विचार असायचा. केवळ नफ्यातोट्याचा विचार करणारा हा उद्योजक नव्हता. इंग्लंडहून आलेल्या नेव्हिल व्हिन्सेंटसोबत करार करून जे आर डींनी ही एअरमेल सेवा सुरु केली होती. नेव्हिलला आपल्या नफ्यातील तिसरा हिस्सा देण्याचे त्यांनी ठरवले होते.
टाटांची ही एअरमेल सेवा इतकी वक्तशीर होती की त्यावेळच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने तिचा आपल्या वार्षिक अहवालात गौरव केला. त्यावेळी इंग्लंडहून सुरु असणारी आंतरराष्ट्रीय इंपिरियल एअरवेजची विमाने देखील बऱ्याच वेळा उशिरा येत असत. या इंपिरियल एअरवेजने टाटांच्या हवाई सेवेचा आदर्श घ्यावा असेही या अहवालात सुचवले होते. या अहवालातील हा उल्लेख म्हणजे जे आर डीं च्या कार्यक्षमतेचा आणि सेवेचा मोठाच गौरव होता. त्या काळात विमानसेवा म्हणजे टपाल वाहतुकीच्या सेवेसाठीच उपयोगी आहे अशी सर्वसामान्यांची कल्पना असताना जे आर डी काळाच्या पुढे जाऊन विचार करत होते. आपल्या हाताशी असणाऱ्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते प्रवासी वाहतुकीचे स्वप्न पहात होते. याच त्यांच्या स्वप्नाने भविष्यातील एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या टाटांच्या हवाई प्रवासी वाहतुकीच्या सेवेचा पाया रचला.
जे आर डींच्या लहान भावाचे नाव जिमी होते. हा जिमी त्यांच्यासारखाच साहसी वैमानिक होता. त्याच्यावर जे आर डींचे अतिशय प्रेम होते. आपली टाटा एअरमेल तो सांभाळेल असे त्यांना वाटत असतानाच त्याचे एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जे आर डींची भिस्त आता नेव्हीलवरच होती. सुरुवातीला अल्प नफ्यात असणारी टाटांची ही एअरलाईन्स नंतर भरपूर नफ्यात आली. नेव्हिल यांना नफ्यातील तिसरा हिस्सा देण्याचे ठरवल्यामुळे आता नेव्हिल यांना अक्षरशः लाखो रुपये कराराप्रमाणे द्यावे लागणार होते. या गोष्टीला टाटांच्या इतर संचालकांनी विरोध केला. नेव्हिल मात्र आपल्या तिसऱ्या हिश्यावर ठाम होते. अन्यथा त्यांनी काम सोडण्याची तयारी दाखवली होती. अशा वेळी जे आर डींनी आपल्या संचालकांना सांगितले की टाटांचे प्राधान्य नेहमीच नैतिकतेला राहिले आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत झालेला करार पाळू या. यातून आपल्याला जे आर डींची नैतिकता, केवळ नफ्यातोट्याचा विचार न करता कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती हे गुण दिसून येतात. याच गुणांमुळे त्यांना टाटा उद्योगसमूहाला आपल्या कारकिर्दीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
भारतात विमान निर्मिती करायची जे आर डींची खूप इच्छा होती पण तत्कालीन ब्रिटिश सरकारने टाटांनी विमान निर्मिती केली तर ते आपल्याशी स्पर्धा करतील म्ह्णून त्यांना विमान बनवायची परवानगी नाकारली आणि साधे ग्लायडर बनवण्यासाठी त्यांना परवानगी दिली. पण हे मात्र जे आर डींनी नाकारले. त्यांचे विमान निर्मितीचे स्वप्न अपूर्णच राहिले, नाहीतर त्याचवेळी स्वदेशी विमाने भारतात तयार झाली असती. पुढे १९४८ मध्ये एअर इंडियाची रीतसर स्थापना झाली. टाटांतर्फे अधिकृत प्रवासी वाहतूक सुरु झाली. पुढे एअर इंडिया ही आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी तर इंडियन एअरलाईन्स ही देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी असे विभाजन झाले. या दरम्यान एअर इंडियाचे मानचिन्ह असलेला महाराजा भारतीय आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून मान्यता पावला. कमरेत वाकलेला, झुपकेदार मिशा असलेला आणि लाल रंगाची शेरवानी परिधान केलेल्या या महाराजाची प्रतिमा एअर इंडियाशी संलग्न झाली.
एअर इंडियाची उड्डाणे आपल्या वक्तशीरपणाबद्दल अतिशय प्रसिद्ध होती. जे आर डींचे सगळ्या गोष्टींकडे वैयक्तिक लक्ष असायचे. ते स्वतः त्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करायचे. हातात नोटपॅड कायम असे. काही त्रुटी आढळल्या तर त्यांची लगेच नोंद घेऊन त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना सूचना देत. विमानातील अगदी स्वच्छतागृहापासून ते पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत आणि अंतर्गत सजावटीपासून ते खिडक्यांच्या पडद्यांपर्यंत सर्व गोष्टींकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असायचे. भारतीय हवाईसुंदरी साडीमध्येच छान दिसतात म्हणून आपल्या हवाई सुन्दरींनी साडी परिधान करावी असा त्यांचा आग्रह असे.
पुढे पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारशी काही मुद्यांवर त्यांचे मतभेद होत गेले. पुढे सरकारने विमानसेवेचे राष्ट्रीयीकरण करून ही सेवा स्वतःच्या ताब्यात घेतली. असे असले तरी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या दोन्ही कंपन्यांचे अध्यक्षपद जे आर डिंनीच भूषवावे असा पं नेहरूंचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाखातर एअर इंडियाचे अध्यक्षपद जे आर डींनी स्वीकारले आणि कोणतेही मानधन न घेता सलग ४६ वर्षे अध्यक्ष म्हणून काम करून एअर इंडिया नावारूपाला आणली. हे त्यांचे देशासाठी केवढे मोठे योगदान होते !
१५ ऑक्टोबर १९८२ मध्ये जे आर डींनी सुरु केलेल्या हवाईसेवेचा सुवर्णमहोत्सव होता. हा सुवर्णक्षण जे आर डींनी आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला. आपल्या सुरुवातीला घेतलेल्या पस मॉथ या विमानाने कराची ते मुंबई असा विमानप्रवास करून त्यांनी तो साजरा केला. ते मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांचे वय किती असेल ? जे आर डी होते तब्ब्ल ७८ वर्षांचे. आणि तेथे जमलेल्या लोकांपैकी फारच थोड्या लोकांना माहिती होते की नुकतीच काही आठवड्यांपूर्वी जे आर डींना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. त्यांना जेव्हा या साहसाबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ' गेली पन्नास वर्षे मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी झटलो. या माझ्या कामात माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला मनापासून सहकार्य दिले. त्यांच्याशिवाय हे शक्यच झालेच नसते. त्यांच्या या सेवेला, त्यागाला अभिवादन म्हणून हे उड्डाण मी त्यांना समर्पित करतो. "
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा