उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सात )
सैन्यात भरती होण्यापूर्वीचा काही काळ जेहने आपल्या वडील आणि भावंडांसोबत घालवला. त्यांचा निरोप घेऊन तो फ्रान्सला सैन्यात भरती होण्यासाठी परतला. या ठिकाणी त्याला विविध भागातून आलेल्या सैनिकांबरोबर प्रशिक्षण घ्यायचे होते. काही तरुण मोरोक्को तर काही अल्जेरियातून आलेले होते. मात्र त्यातील बहुसंख्य अशिक्षित आणि नागरी चालीरीतींची माहिती नसणारे असे होते. ते कित्येक दिवस विना अंघोळीचे राहत. शिवाय त्यांच्या प्रशिक्षणाचे ठिकाण हे उजाड आणि भकास वातावरण असलेले होते. या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणे जेहला कठीण गेले.
त्या काळात घोड्यावर ऐटीत बसून दौड करणारे सैनिक त्याला आवडायचे. म्हणून त्याने घोडदळात प्रवेश घेतला. पण इथे त्याला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले. राहण्याखाण्याची व्यवस्था नीट नव्हती. शिवाय घोड्यावर बसण्याची सवय नसल्याने त्याच्या पार्श्वभागाला सूज येऊन फोड आले. अशातच एक चांगली संधी त्याच्यासाठी चालून आली. त्याला टायपिंग येते हे कुणाकडून तरी कॅप्टनला कळले. त्याने त्याला आपल्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून ठेवून घेतले. पुढे एका कर्नलसाहेबांच्या प्रशस्त ऑफिसमध्ये बसून त्याला काम करण्याची संधी मिळाली. आता त्याला राहण्यासाठी पलंग वगैरे सुविधा असलेली स्वतंत्र खोली मिळाली. रोजचा परेडचा खडतर त्रास कमी झाला. फ्रान्समधील लष्करी अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज तो टाईप करू लागला. कोणतीही शिकलेली गोष्ट वाया जात नाही हे जेहला या प्रसंगाने शिकवले. त्याने त्यावेळी जहाजावर शिकून घेतलेली टायपिंगची कला अशा रीतीने त्याला उपयोगात आली होती.
आता जेहचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण होत आले होते. पुढील प्रशिक्षण ऐच्छिक होते. ते घ्यावे असे त्याला वाटत होते. कारण ते घेणाऱ्यांना फ्रान्समधील प्रसिद्ध असलेल्या सेमूरच्या अश्वशाळेत प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार होते. पण तत्पूर्वी त्याला आपल्या वडिलांचा सल्ला घ्यावा असे वाटले. त्याने आपल्या वडिलांकडे तशी परवानगी मागितली. आर डी त्याला म्हणाले, ' तुझे एक वर्षाचे आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे ना ? मग आता ताबडतोब भारतात परत ये. ' जेह थोडा नाराज झाला पण त्याने वडिलांची आज्ञा पाळली. पण वडिलांचे ऐकल्याचा त्याला फायदाच झाला. पुढे असे कळले की जेह ज्या तुकडीत भरती होणार होता, त्या तुकडीला मोरोक्कोत बंड मोडून काढण्यासाठी पाठवण्यात आले. पण त्या तुकडीचे दुर्दैव असे की युद्धात त्या तुकडीतील एकूण एक सैनिक कापला गेला. सुदैवाने आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकल्यामुळे जेहचे प्राण वाचले होते.
नियतीला पुढे जेहच्या हातून मोठे कार्य घडवून आणायचे होते. त्यामुळे नियती जेहला प्रत्येक जीवावरच्या प्रसंगातून वाचवत होती. मग ते जपानहून बोटीने भारतात परताना मिळालेले जीवदान असो की योगायोगाने फ्रेंच सैन्याच्या मोरोक्कोतील झालेल्या शिरकाणापासून मिळालेले जीवदान असो. जेह म्हणजे एक हिरा होता. या हिऱ्याला काळाच्या ओघात पैलू पाडले जाणार होते. तेच काम नियती आर डीं च्या माध्यमातून करीत होती. म्हणून तर आर डीं नी जेहला भारतात बोलावून घेतले होते. १९२४ मध्ये जेह भारतात आला. आणि लगेचच त्याच्या येथील अनौपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली. हे शिक्षण किंवा प्रशिक्षण त्याच्या पुढील जीवनाची पायाभरणी म्हणून उपयोगात आले.
टाटांचा कारभार मुंबईतील बॉंबे हाऊस नावाच्या इमारतीतून चालत असे. याच बॉंबे हाऊसच्या शेजारी जॉन पीटरसन या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची खोली होती. हे जॉन पीटरसन इंग्रज सरकारमध्ये आय ए एस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
टाटांनी युद्धकाळात ब्रिटिशांना रेल्वे रुळांचा पुरवठा केला होता, त्यामुळे पीटरसन आणि टाटांचे संबंध चांगले होते. पीटरसन हे इतर इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा भारतीयांशी खरोखरीच प्रेम आणि जिव्हाळ्याने व्यवहार करीत. टाटांना चांगल्या माणसांची पारख असल्याने त्यांनी पीटरसन यांना टाटा अँड सन्स मध्ये संचालक म्हणून काम करण्याची विनंती केली. पीटरसन यांनीही ती आनंदाने मान्य करून आपल्या आय ए एस नोकरीचा राजीनामा दिला. बिटिशांची नोकरी सोडून भारतीयांच्या सेवेत रुजू होणारा असा इंग्रज अधिकारी विरळाच. टाटा अँड सन्स मध्ये ते संचालक म्हणून रुजू झाले.
आर डी जेहला पीटरसन यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना म्हणाले, ' जॉन, हा माझा थोरला मुलगा जेह उर्फ जहांगीर. याला आजपासून तुमच्या हवाली करतो आहे. याला सगळं शिकवा. ' पीटरसन यांनी ती विनंती आनंदाने मान्य केली आणि लगेच आपल्या ऑफिसमध्ये जेहसाठी एका टेबल खुर्चीची व्यवस्था केली. पीटरसन त्यावेळी टाटा स्टीलचा कारभार पाहत. आता पीटरसन यांच्या टेबलावरून जाणारा प्रत्येक कागद जेहच्या टेबलावरून जाऊ लागला. पीटरसन यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी त्या कागदांवर मारलेले शेरे इ चा अभ्यास जेह करू लागला. एका निष्णात आय ए एस अधिकाऱ्याच्या हाताखाली तो तयार होत होता. काही महिन्यातच त्याने टाटा स्टीलचा संपूर्ण कारभार आत्मसात केला.
यानंतर आर डीं नी जेहला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी जमशेटपूरला पाठवले. जमशेटपूरला जाण्यापूर्वी जेहने जमशेटजी टाटा यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता. त्यांचे चरित्र वाचून तो भारावून गेला होता. जमशेटपूरला गेल्यावर तेथील प्रत्येक गोष्टीचा जेहने बारकाईने अभ्यास केला. जेह जमशेटपूरला असताना त्याची भावंडे फ्रान्सला आपल्या आजीकडे गेली होती. आर डी त्यांना भेटण्यासाठी फ्रान्सला गेले. फ्रान्समधील हार्डलॉट येथे काही दिवस त्यांनी आपल्या मुलांसमवेत मजेत घालवले. पण तेथेच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ही बातमी जेहला कळल्यावर त्याला धक्काच बसला. आर डीं ची प्रकृती खरे तर इतक्या लवकर जाण्यासारखी नव्हती. पण कदाचित आपल्या प्रिय पत्नीच्या निधनाने ते आतल्या आत खचले असावेत. आपला आता काही भरवसा नाही हे जाणूनच त्यांनी जेहला शिक्षण सोडून आपल्याजवळ बोलावून घेतले असावे.
आर डीं ना श्रद्धांजली वाहताना प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमनालाल बजाज यांनी म्हटले की आर डीं च्या निम्म्याने जरी सर्व व्यावसायिक भारतावर प्रेम करतील तरी आपल्या देशाची भरभराट होईल. '
आता जेहच्या खांद्यावर जबाबदारी आली. तो कुटुंबप्रमुख तर बनलाच पण टाटांच्या उद्योगांचीही जबाबदारी त्याला पेलावी लागणार होती. वयाच्या २२ व्या वर्षीच जेहकडे टाटा अँड सन्सचे संचालकपद चालून आले. दरमहा ७५० रु वर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. जमशेटजींचे ज्येष्ठ पुत्र दोराबजी आता थकले होते. आता जेह उर्फ जहांगीर रतनजी उर्फ जे आर डी टाटा यांच्या कार्यक्षमतेचा, कणखरपणाचा कस लागणार होता. नियती घेत असलेल्या परीक्षेसाठी ते सज्ज झाले होते.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा