उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग दोन
आईवडील आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकांव्यतिरिक्त कलामांच्या बालपणीच्या जीवनावर प्रभाव
टाकणारी आणखी दोन व्यक्तिमत्वे होती. एक म्हणजे त्यांचा चुलतभाऊ शमसुद्दीन आणि
दुसरे म्हणजे त्यांच्या बहिणेचे पती अहमद जुलालुद्दिन. हे दोघेही त्यांचे नातेवाईक
तर होतेच पण त्याहून जास्त त्यांचे मित्र होते. जुलालुद्दिन कलामांच्या वडिलांना
नावा दुरुस्तीच्या आणि बांधणीच्या कामात मदत करीत असे. त्या काळात त्या गावात
इंग्रजी जाणणारी जुलालुद्दिन ही एकाच व्यक्ती होती. तो गावातील लोकांना त्यांची
पत्रे वाचून दाखवत असे. तो कलामांना आपल्याबरोबर फिरायला नेई. त्यांना आधुनिक
विज्ञानातील शोध, घटना आणि इतर
आश्चर्यकारक गोष्टी सांगे. तो त्यांच्याशी
देव आणि त्याची शक्ती याबद्दल बोलत असे. शमसुद्दीनचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय
होता. त्यावेळी गावात तो एकच वर्तमानपत्र विक्रेता होता. तो कलामांना
वर्तमानपत्रात आलेल्या गोष्टी सांगत असे.
१९३९ च्या सुमारास दुसरे महायुद्ध सुरु झाले. त्यावेळी वर्तमानपत्रे ज्या
गाडीने येत ती गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. तेव्हा धावत्या गाडीतून
वर्तमानपत्रांचे गठ्ठे खाली फेकले जात. कलाम तेव्हा फक्त आठ वर्षांचे होते. ते हे
गठ्ठे गोळा करीत आणि गावात त्यांचे वाटप करण्यास शमसुद्दीनला मदत करीत. यातून
त्यांना काही पैसेही मिळत. ही त्यांची पहिली कमाई होती आणि त्याचा त्यांना
अभिमानही होता. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला आपण थोडीफार का होईना पण मदत करू शकतो
ही आनंदाची भावना होती. भारताच्या माजी राष्ट्रपतींनी आपल्या लहानपणी वर्तमानपत्र
टाकण्याचे काम केले होते ही गोष्ट आज सांगूनही खरी वाटणार नाही. यापुढील आयुष्यात
सुद्धा अशा अनेक कठीण प्रसंगातून त्यांना जावे लागले. पण जसा अग्नीत सोने तावून
सुलाखून निघते, तसाच कठीण परिस्थितीत माणसाचा
सुद्धा कस लागतो. त्यातूनच माणूस घडत जातो. संकटांना तोंड देण्याची जिद्द निर्माण
होते. आपली सावली निर्माण करायची इच्छा असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
कलाम असे घडत होते. त्यांच्या बालमनावर
योग्य संस्कारांचे बीजारोपण होत होते. त्यातच त्यांच्या संस्कारक्षम मनाला समृद्ध
करणारे आणखी एक खाद्य मिळाले. रामेश्वरममध्ये एस टी आर मणिकम यांचे एक वाचनालय
होते. कलामांच्या नवनवीन गोष्टी ग्रहण करण्याच्या वृत्तीला या वाचनालयाने मोठा
हातभार लावला. ते तासनतास या वाचनालयात बसलेले असत. या वाचनामुळे त्यांचे विचार
अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांनी जे काही लेखन
केले,
जी काही उत्कृष्ट भाषणे दिली त्याचा पाया असा तयार झाला
होता.
लवकरच त्यांना पुढील रामनाथपुरम येथील
श्वार्झ हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील शिक्षण पूर्ण करून ते त्रिची येथील
सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. इथूनच खरी सुरुवात त्यांच्या विज्ञान
क्षेत्रातील कारकीर्दीला झाली. याच कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी
प्राप्त केली. येथे त्यांच्या लक्षात आले की पदार्थविज्ञान हा काही आपल्या आवडीचा
विषय नाही. त्यांचे स्वप्न तर अभियांत्रिकीचा अभ्यास करून वैमानिक होणे किंवा
एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून पुढे त्या क्षेत्रात काम करणे हे होते.
त्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी प्रवेश घायचे ठरवले. पण
इथे पुन्हा घरची परिस्थिती आड आली. यावेळी प्रवेश घेण्यासाठी एक हजार रुपयांची गरज
होती. त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या वडिलांजवळ एवढी रक्कम नव्हती. या वेळी त्यांची
बहिण जोहरा हिने आपले सारे दागिने विकून आपल्या भावाच्या शिक्षणासाठी पैसे दिले.
प्रवेश तर घेतला. पण पुढील शिक्षणासाठी पैसे लागणार होते. ते कुठून उभे करणार ? त्यासाठी शिष्यवृत्ती मिळवणे आवश्यक होते. ज्याच्याजवळ
जिद्द असते, पुढे जाण्याचे ध्येय असते, त्याला कोणत्याही अडचणी अडवू शकत नाही. उंच पर्वतावरून खाली
झेप घेणारा पाण्याचा गतिमान प्रवाह आपल्या मार्गातील सारे खडक, मोठमोठे दगड आदी सगळे अडथळे पार करून पुढे जातो. वाटेत अडचण
आली म्हणून तो थांबत नाही किंवा पुढे जाण्याचे सोडून देत नाही. अगदी अशीच होती
कलमांची वृत्ती ! त्यांनी पुढील शिक्षणासाठी लागणारी ही शिष्यवृत्ती मिळवली.
कलामांनी आपल्या पुढील आयुष्यात शास्त्रज्ञ
म्हणून जे काही मौलिक संशोधन केले त्याचा पाया येथील तीन वर्षांच्या शिक्षणात
घातला गेला. त्यांचे येथील मार्गदर्शक होते प्रा. स्पॉन्डर, प्रा. पंडलाई आणि प्रा. नरसिंगराव. या त्रिमूर्तींनी
त्यांच्या पुढील भविष्याचा पाया घातला. या प्राध्यापकांनी त्यांना अनुक्रमे
एअरोडायनामिक्स, विमान आराखडा आणि पृथक्करण आणि
तात्विक वायुगतीशास्त्र शिकवले. या सर्व प्राध्यापकांनी कलामांमध्ये वैज्ञानिक
विचारपद्धती रुजवली. आपल्या विषयाची आवड निर्माण केली.
या कॉलेजमध्ये त्यांना एक प्रकल्प देण्यात
आला. त्यांच्यासोबत इतर चार मित्र होते. त्या सगळ्यांना मिळून अगदी खालच्या
अंतरावर हल्ला करणाऱ्या विमानाचा आराखडा तयार करावयाचा होता. कलामांनी मेहनत घेऊन
एक आराखडा तयार केला. पण हे त्याचं डिझाईन पसंत पडले नाही. एम आय टी चे संचालक
श्रीनिवासन यांनी कलाम यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. आणि ते डिझाईन पुन्हा
बनवण्यास सांगितले. आणि ते बनवण्यासाठी मुदत दिली ती फक्त तीन दिवसांची. आणि
त्यांना सांगितले तीन दिवसात काम केलेस तर ठीक नाहीतर स्कॉलरशिप काढून घेईन. इथे
कलामांच्या जागी दुसरा कोणी असता तर तो निराश झाला असता. पण कलाम आणि त्यांच्या
मित्रांनी हे आव्हान स्वीकारले. दिवसरात्र मेहनत करून त्यांनी हा विमानाचा आराखडा
वेळेत पूर्ण केला. त्यांचे आपल्या कामाप्रती असलेले हे समर्पण पाहून श्रीनिवास खुश
झाले. यातून कलामांना खूप काही शिकायला मिळाले. आव्हान स्वीकारणे, ते पूर्ण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणे, सोबत कामाचा दर्जा उत्तम प्रतीचा राखणे, हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करणे, संकटांशी मुकाबला करण्यासाठीची मानसिक आणि शारीरिक तयारी
ठेवणे या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. ( क्रमशः - पुढील भाग बुधवारी )
०१/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा