उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री -भाग पाच
याच सुमारास
चीनने विश्वासघात करून भारतावर आक्रमण केले. या युद्धाला तोंड देण्यास त्यावेळी
भारत सज्ज नव्हता. पण तरीही भारताने प्रचंड धैर्याने या आक्रमणाचा सामना केला.
यावेळी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. परंतु राष्ट्रानेत्यांच्या पाठीशी सर्व
जनता खंबीरपणे उभी राहिली. यावेळी देशातील सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्री या
नात्याने आपसूकच शाश्त्रीजींवर आली. त्यांनी अगदी खंबीरपणे हा प्रश्न हाताळला.
वृत्तपत्रे आणि राजकीय पक्ष यांना त्यांनी स्वातंत्र्य दिले पण चीनची बाजू
घेणाऱ्यांना कडक दम भरला. काही देशद्रोही विचार करण्याऱ्या कम्युनिस्टांना सरळ
तुरुंगात डांबले. शेवटी भारतीयांच्या खंबीर धोरणापुढे आणि झुंजीसमोर चीनला हार
मानावी लागली. युद्ध थांबले.
१९६३मध्ये भारत नेपाळ संबंधात फूट पडेल अशी
चिन्हे दिसू लागली. पाकिस्तान वा चीन यापैकी कोणत्यातरी देशाने नेपाळला
भारताविरुद्ध चिथावणी देऊन शेवटी नेपाळचा भाग आपल्या घशात घालण्याचा डाव रचला. हा
डाव यशस्वी झाला तर भारताची चिंता वाढणार होती. अशा वेळी शास्त्रीजींनी वेळ न
घालवता तडक नेपाळ गाठले. यावेळी भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांचे व्हावे तसे
स्वागत झाले नाही. पण त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. नेपाळचे राजे महेंद्र, मंत्रिमंडळाचे अध्यक्ष
तुलसी गिरी आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री विश्वबंधू थापा यांच्याशी बोलणी केली.
भारताची भूमिका त्यांना समजावून सांगितली आणि त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाले.
नंतर नेपाळने आपला गैरसमज दूर झाल्याचे मान्य केले आणि शाश्त्रीजी मोठ्या
समाधानाने भारतात परतले.
या दरम्यान
काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला उतरती कळा लागली होती. यासाठी तामिळनाडूचे
मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते के कामराज यांनी एक योजना कॉंग्रेसच्या
कार्यकारीणीपुढे ठेवली. त्यानुसार पक्षाला बळ देण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ
नेत्यांनी वाहून घ्यावे असे आवाहन केले. यात केंद्रातील सहा कॅबिनेट मंत्री आणि
सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्ष बांधणीच्या कामाला वाहून
घ्यावे असे ठरले. त्या यादीत सुरुवातीला लाल बहादूर शाश्त्रींचे नाव नव्हते. पण
स्वतः शास्त्रीजींनीच पुढाकार घेऊन आपले पद सोडले. पण त्यांना जास्त काळ या
पदावरून अलिप्त राहता आले नाही. कारण पं. नेहरुंना त्यांची सरकार चालवताना भासणारी
उणीव. आपल्या कामामुळे ते नेहरूंच्या अधिक निकट आले आणि त्यांना प्रिय झाले. पुढे
नेहरूंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपली सर्व कामे शास्त्रीजींकडे सोपवली
आणि ते बिनखात्याचे मंत्री बनले.
या काळात
शाश्त्रींची कसोटी पाहणारा आणखी एक प्रश्न उभा राहिला. श्रीनगर येथील हजरतबल
मशिदीतून प्रेषित महंमद पैगंबराचा पवित्र केस चोरीला गेला होता. या परिस्थितीचा
फायदा घेऊन काही लोक काश्मीरमध्ये दंगल घडवण्याच्या प्रयत्नात होते. पाकिस्तानला
सुद्धा हे हवेच होते. या काळात शास्त्रींनी गुप्तचर खात्याची मदत घेऊन जलद तपास
करवला आणि आठ दिवसातच केस परत मिळाला. पण पुन्हा एक मोठा प्रश्न उभा राहिला. हा
केस खरा आहे की बनावट याबद्दल आम्हाला खात्री करू द्यावी अशी मागणी काही मुस्लीम
मौलवी करू लागले.
पण अशी पाहणी करू देण्याच्या विरुद्ध त्यावेळी गृहखाते आणि प्रधान सचिव होते. या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवला जाईल असे त्यांचे म्हणणे होते. शास्त्रींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मुल्ला मौलवींशी सुद्धा चर्चा केली आणि ते अशा निष्कर्षाप्रत आले की या परिस्थितीचा फायदा ते उठवण्याची शक्यता कमी आहे. शिवाय केस खरा ठरण्याचीच शक्यता जास्त होती. पं नेहरूंनी शास्त्रींना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यावेळी काश्मीरमध्ये खूप थंडी होते. म्हणून नेहरूंनी शास्त्रींना आपला ओवरकोट घालण्यासाठी दिला. जी व्यक्ती भविष्यात पंतप्रधान होण्याची शक्यता होती अशा व्यक्तीकडे थंडीत घालण्यासाठी ओव्हरकोट देखील नव्हता. असे उदाहरण राजकारणात अभावानेच आढळेल. शिवाय यात नेहरूंचे शास्त्रींवरील प्रेमही दिसून येते.
शास्त्रीजींनी मौलवी साहेब आणि कृती समितीला त्या केसाची पाहणी करण्याची परवानगी दिली. आणि त्यांची अटकळ खरी ठरली. मुल्ला मौलवी आणि कृती समितीने एकमुखाने तो केस खरा असल्याचा निर्वाळा दिला. काश्मीरमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले. त्या दिवशी शास्त्रीजी अक्षरशः हिरो ठरले. पुढे लवकरच काश्मीरमधील जनतेची नाराजी असलेले शमसुद्दीन यांचे सरकार बदलण्याचा निर्णय शास्त्रीजींनी घेतला. आणि जनतेची नाराजी दूर केली. तसेच काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुला यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी पं नेहरूंचे मन वळवण्यात शास्त्रीजींना यश आले. लवकरच त्यांची सुटका झाली. या शास्त्रीजींच्या कौशल्यामुळे त्यांचे राजकीय वर्तुळात वजन वाढले. पं नेहरूंचे राजकीय वारस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. हजरतबल प्रकरणाच्या यशस्वी हाताळणीमुळे आणि शेख अब्दुल्लांच्या सुटकेमुळे शास्त्रीजींना वाढती लोकप्रियता प्राप्त झाली. शास्त्रीजींनी हजरतबलच्या शोधासाठी जी गुप्त तपासणी पद्धत वापरली त्यामुळे एक नवीन तपासणी पद्धत त्यांच्या दृष्टीपथात आली. देशातील लाचलुचपतीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेच्या हितासाठी तसेच एखाद्या प्रकरणाचा जलद गतीने तपास करण्यासाठी त्यांनी सी बी आय या गुप्त तपासणी संस्थेची स्थापना केली. त्यांची ही कल्पना प्रचंड यशस्वी ठरली. सी बी आय म्हणजे सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन. आजही ही संस्था अनेक गुन्ह्यांच्या शोधात महत्वाची भूमिका बजावीत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शास्त्रीजींचे नाव सर्वतोमुखी झाले.
( क्रमशः ) पुढील भाग बुधवारी
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव११/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा