मुख्य सामग्रीवर वगळा

निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग पाच - अंतिम )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे,चाळीसगाव 

भारतरत्नावली 

निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे (  भाग पाच - अंतिम ) 

    परदेशातून मिळालेल्या या सगळ्या निधीचा चोख हिशेब अण्णांनी ठेवला. अण्णा केवळ मदत घेणाऱ्यातले नव्हते. अण्णांची वृत्ती देणाऱ्याची होती. विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या संस्थाना तर मदत केलीच पण कोठेही चांगले काम दिसले की अण्णांचा हात देण्यासाठी पुढे असायचा. आता अण्णांचे वय झाले होते ७८ वर्षांचे. आपल्या संस्थांचे कौतुक पहात, आपली स्तुती ऐकण्यात आणि आराम करण्यात घालवावे असे हे वय. पण स्वस्थ बसणे हा अण्णांचा स्वभाव नव्हता. या वयात शिक्षण प्रसाराचा एक नवीन उपक्रम अण्णांनी हाती घेतली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार व्हावा, मुलांनी शिकावे म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ नावाची संस्था काढली. खेडी शिक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावीत. खेड्यातील लोकांनीच पैसे जमवून शाळा बांधावी, शिक्षकांचा पगार द्यावा अशी त्यांची कल्पना होती. त्यानुसार ज्या गावात शाळा नसेल तेथे शाळा काढण्यास त्यांच्या या संस्थेने मदत केली. पण पुढे सरकारनेच या शाळांना मदत करण्याचे ठरविल्यामुळे अशा मंडळांची गरज राहिली नाही. समाजात जातीभेद, वर्णभेद आदी भिंती नसाव्यात. समाजात एकोपा नांदावा, समता राहावी म्हणून त्यांनी समता संघाची स्थापना केली. तसेच या संघातर्फे मानवी समता नावाचे वर्तमानपत्र सुरु केले.

      अशा या समाजासाठी चंदनासारखे झिजणाऱ्या अण्णांना १०४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. या काळात आपण सुरु केलेल्या संस्था बहरलेल्या पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांनी लावलेल्या इवलेसे रोपाचा वेलू आता गगनावरी गेला होता. त्यांच्या एक्काहात्तरीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. तो आज कर्वे रोड म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा ९१ वा वाढदिवस डॉ जयकरांच्या अध्यक्षतेखाली पुणेकरांनी मोठ्या थाटात साजरा केला. पूर्वी त्यांच्यावर कधी काळी टीकेचा वर्षाव करणारे आता त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू लागले होते. या सगळ्यात त्यांची पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची अनमोल साथ त्यांना लाभली. त्यांची ही सहधर्मचारिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या काळात त्यांनाही अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले,अवहेलना वाट्याला आली पण त्यांनी कमालीच्या सोशिकपणे सगळे सहन करून अण्णांना साथ दिली.त्यांनी माझे पुराण या आपल्या आत्मचरित्रात आपले सगळे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. त्यांनी केवळ आश्रमाकडे लक्ष दिले असे नाही तर आपल्या मुलांनाही उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन घडवले. अण्णांचे मोठे चिरंजीव आणि प्रथम पत्नीचा पुत्र प्रा रघुनाथ कर्वे यांनी अण्णांचा वारसा पुढे चालवून संततिनियमनाचा प्रसार आणि प्रचार केला. या कामात त्यांनाही प्रचंड कष्ट, यातना आणि मानहानी सोसावी लागली. पण तेही अविचल निष्ठेने अण्णांप्रमाणे कार्यरत राहिले. अण्णांचे दुसरे चिरंजीव हे डॉक्टर असून ते आफ्रिकेत स्थायिक झाले होते. तिसरे चि. डॉ दिनकरराव कर्वे हे अत्यंत विद्वान प्राध्यापक होते. ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या पत्नी डॉ इरावती कर्वे या प्रसिद्ध लेखिका आणि संशोधक होत्या. अण्णांचे चौथे चिरंजीव भास्करराव आणि त्यांची पत्नी कावेरीबाई यांनी अण्णांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या संस्था सांभाळल्या.

     अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डी लिट पदवी बहाल केली. डॉ राजेन्द्रप्रसाद, पंडित नेहरू, म गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वा. सावरकर या सारख्या थोर व्यक्तींनी त्यांच्या आश्रमाला भेटी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. महर्षींचा शंभरावा वाढदिवस तर संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. हा सोहळा ब्रेबोर्न स्टेडियम वर झाला. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले एक पोष्टाचे तिकीट जारी करण्यात आले. या वेळी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले.

     सेवेचा अखंड तेवणारा हा नंदादीप ७ नोव्हेंबर १९६२ रोजी केवळ पोटदुखीचे निमित्त होऊन शांत झाला. अण्णा कधी कोणाला कटू बोलले नाहीत. कोणाबद्दल अपशब्द उच्चारले नाहीत. सतत एखाद्या योग्यासारखे कार्यरत राहिले. स्वतः जळत राहून अनेकांची आयुष्ये त्यांनी प्रकाशमान केली. स्त्रीशिक्षणाचे डोंगराएवढे महान कार्य केले. पण कुठेही याचा गर्व नव्हता. करून सवरून नामानिराळे ! मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा लाजवेल असे हे वागणे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला प्रणाम ! तेथे कर माझे जुळती !

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२८/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...