उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे - भाग दोन
( महर्षी कर्वे यांच्या लहानपणीच्या घटना सांगताना सुरुवातीला त्यांचा सोयीसाठी धोंडू म्हणून उल्लेख केला आहे )
धोंडूचा सहावी पर्यंतचा अभ्यास तर तयार झाला होता. आता सहावीची परीक्षा देणे फक्त बाकी होते. त्या काळी सहावी पास
झालेल्यांना शिक्षक म्हणून काम करता येई. पण तेव्हा परीक्षा देणे आजच्या सारखे सहज
सुलभ नव्हते. परीक्षा देण्यासाठी त्यांना केवढे दिव्य करावे लागले ते आपल्याला
पुढील हकीकत वाचून लक्षात येऊ शकेल. तेव्हा सहावीच्या परीक्षेची दोनच केंद्रे
धोंडूसाठी उपलब्ध होती. मुंबई आणि सातारा. त्या वेळी पावसाळा असल्याने मुंबईला
जाण्यासाठी समुद्रमार्गे जायला जहाजे तयार नव्हती. धोंडू आणि त्याच्या मित्रांनी
साताऱ्याला जाण्याचे ठरवले. मुरुड ते सातारा हे अंतर एकशे पन्नास मैलाचे होते. हातात, पाठीवर सामान. रस्ते आधीच खराब. त्यात पावसाळ्यामुळे
सर्वत्र चिखल झालेला. अशा परिस्थितीत हे सगळे एकशे पन्नास मैलांचे अंतर कापून मजल दरमजल करीत कसेबसे साताऱ्याला
येऊन पोहचले.
त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला तरी सुदैवाने त्या परीक्षेसाठी परीक्षार्थी जास्त असल्याने
नावनोंदणी सुरु होती. सुरुवातीला धोंडू आणि त्याच्या मित्रांची मुलाखत झाली. धोंडूचे शरीर तसे
कृश आणि अशक्त वाटावे असे होते. त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे वय सतरा वर्षे
असण्याची आवश्यकता होती. परीक्षाप्रमुखांनी धोंडूकडे पाहून सांगितले की तू सतरा
वर्षांचा वाटत नाहीस. त्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही. धोंडूचा स्वभाव
संकोची व भिडस्त होता. त्याच्यासोबत त्याच्या शिक्षकांनी दिलेला वयाचा दाखला होता.
पण तरीही तो परीक्षेपासून वंचित राहिला एवढे खरे ! पण धोंडू निराश झाला नाही.
पुढील वर्षी त्याने कोल्हापूरहून ही परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्णही झाला.
त्या काळी बालविवाहाची प्रथा होती. त्यानुसार धोंडूचा विवाह वयाच्या पंधराव्या
वर्षीच राधाबाई नावाच्या मुलीशी झाला होता.
या पुढील इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी धोंडू
काही काळ रत्नागिरीला राहिला. पण तेथे आजारी पडल्याने तो मुरुडला परत आला. काही
काळाने आपल्या मित्रांच्या आग्रहाने तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला आला. धोंडू
मुंबईकर झाला. येथे त्याला अनेक मित्र भेटले. त्यातील नरहर जोशी या मित्राशी
त्याचा विशेष स्नेह जुळला. नरहर आणि धोंडू या दोघांच्या स्वभावात मोठा फरक होता.
नरहर बोलका आणि स्वभावाने धीट होता, तर धोंडू अबोल आणि संकोची. पण नरहरसोबत राहिल्याने धोंडूला बरेच शिकायला
मिळाले. वसतिगृहाचे संचालक रे.अली किंवा प्राचार्य कार्स यांच्याकडे जाऊन ते दोघे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करीत. यामुळे धोंडूच्या विचारात बराच सकारात्मक बदल
झाला.
धोंडू मुंबईला येऊन काही महिने झाले असतानाच त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. पण धोंडूच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याच्या मोठ्या भावाने ही बातमी त्याला लवकर कळवली नाही. पण जेव्हा धोंडूला आपल्या वडिलांच्या निधनाची ही वार्ता कळली तेव्हा तो प्रचंड दुःखी झाला. पण आलेल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते. ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते, तो परिस्थितीला भीक घालत नाही. धोंडू सुद्धा अशा हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो मुंबईत अत्यंत काटकसरीने राहू लागला. शिकवण्या आणि मिळणारी शिष्यवृत्ती यावर तो आपला खर्च भागवून शिक्षण करीत असे. एवढे सगळे करून मॅट्रिकच्या परीक्षेत त्याने चांगले यश मिळवले.
पुढे कर्व्यांनी मुंबईच्या विल्सन
कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. गणित हा त्यांचा अतिशय आवडता विषय होता. गणित विषय
घेऊनच ते पुढे बी ए झाले. दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा रघुनाथ याचा जन्म झाला.
पण मुंबईतील जागेच्या समस्येमुळे कर्व्यांनी आपल्या पत्नीचा आणि मुलाचा वियोग सहन करावा लागला. पत्नी राधाबाई आणि मुलगा रघुनाथ या काळात मुरुड्लाच राहत होते. मुंबईला
कर्व्यांनी एल्फिन्स्टन स्कूल, कॅथेड्रल गर्ल्स
स्कूल,
अलेक्झांड़्रा गर्ल्स स्कूल, मराठा हायस्कूल आदी अनेक शाळांमधून शिक्षक म्हणून कार्य केले. या काळातील
त्यांचे जीवन अत्यंत धावपळीचे आणि कष्टाचे होते. पण कर्वे ध्येयवादी होते.
निष्ठेने ते आपले काम करीत असत. चिकाटी आणि मेहनत हे दोन मोठे गुण त्यांच्या ठायी
वसत होते.
जेव्हा मुंबईत राहण्याची सोय झाली तेव्हा
कर्व्यांनी राधाबाई आणि रघुनाथला मुंबईला बोलावून घेतले. आपल्या पत्नीला लिहितावाचता आले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या पत्नीला त्यांनी लिहिणेवाचणे शिकवले आणि तिला साक्षर केले. शिक्षणाचे, विद्येचे महत्व तिला पटवून दिले. कर्वे नुसते कोरडे तत्वज्ञान सांगणारे पंडित नव्हते. आपल्या गावातील मुलांनी शिकावे, प्रगती करावी असे त्यांना वाटे. म्हणूनआपल्या मुरुड गावातील तीनचार विद्यार्थ्यांना मुंबईला
शिक्षणासाठी बोलावून घेतले आणि आपल्या घरी ठेवून घेतले. आजच्या काळात एवढा त्याग कोणी जवळचे नातेवाइक सुद्धा करायला तयार होत नाहीत. या सगळ्यांचा स्वयंपाक आणि इतर कामे राधाबाई न
कंटाळता करीत असत. या मुलांमधील रघुनाथ परांजपे हा मुलगा पुढे हुशार विद्यार्थी
म्हणून चमकला आणि त्याने अण्णांच्या कष्टाचे चीज केले. राधाबाई मात्र सततच्या
कष्टाने आजारी पडू लागल्या. त्यांना विश्रांतीसाठी म्हणून मुरुडला पाठवण्यात आले.
पण दुखण्यातून राधाबाई उठल्या नाहीत. त्यांचे दुःखद निधन झाले. आपल्या पत्नीच्या
निधनाची बातमी देखील अण्णांना आपल्या वडिलांच्या निधनाच्या बातमीसारखी उशीरच कळली.
पण नियतीने अशा माणसांना काही विशिष्ट उद्देशाने घडवले असते. अण्णा हे दुःख पचवून
जसे काही घडलेच नाही अशा निर्धाराने पुन्हा आपल्या कामाला लागले. ( क्रमशः ) पुढील भाग शुक्रवारी
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा