मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे - भाग एक

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे - भाग एक                    

     संध्याकाळची वेळ. अंधार पडत आलेला. आकाशात ढगांची दाटी झालेली. कोणत्याही क्षणाला आता पाऊस कोसळेल अशी स्थिती. अशा स्थितीत एक गृहस्थ आपल्या पाठीवर एक पायली धान्याचे पीठ आणि हातात भाजी आणि किराणा सामानाची पिशवी असे ओझे घेऊन चाललेला. रस्त्यात चिखल, दगडांचे साम्राज्य. तरी देखील तरुणाच्या उत्साहाने ती व्यक्ती भराभर चालत निघाली होती. पाच सहा मैलांची पायपीट करून त्या व्यक्तीला पुण्याजवळ असलेल्या हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमात पोहचायचे होते. त्या बालिकाश्रमात काही अनाथ, विधवा मुली, स्त्रिया त्यांची आतुरतेने वाट पहात होत्या. ती व्यक्ती होती अण्णासाहेब धोंडो केशव कर्वे. ज्यांनी आपल्या आयुष्यात विधवा स्त्रियांसाठी, मुलींसाठी स्त्री शिक्षणाचे भरीव कार्य केले. विधवांना सन्मान मिळवून दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले ते महर्षी धोंडो केशव कर्वे. अण्णांनी आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केले पण अनाथ, विधवा स्त्रिया, बालविधवा झालेल्या कुमारिका यांचा संसार स्वतःच्या खांद्यावर घेतला.

     तो काळच तसा होता. स्त्रियांचा सर्व बाजूनी कोंडमारा होत होता. बालविवाह, बालविधवा, केशवपन, पुनर्विवाहास बंदी, शिक्षणास बंदी आदी अनेक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांवर लादली होती. विवाहित स्त्रियांची परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नव्हती. चूल आणि मूल या बंधनातच ती अडकली होती. नव्हे तिला अडकवले गेले होते. घरात कष्टाची कामे करायची, थोरामोठ्यांची सेवा करायची, स्वयंपाक करायचा, सर्वांना जेवायला वाढायचे आणि सर्वात शेवटी उरलेसुरले तिने जेवायचे. तिला काही बोलण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. तिची इच्छा असो वा नसो, मातृत्व तिच्यावर लादले जायचे. तिच्या आरोग्याची घरात कोणाला फारशी पर्वा नव्हती.

     अकाली विधवा झालेल्या मुलींना तर याहून प्रचंड कष्ट आणि वेदनादायी जीवन जगावे लागत होते. त्यांनी केशवपन करायचे. जणू त्यांचे पूर्वजन्मीचे काही पापच ! एखाद्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचे. घरातील कार्यक्रमात, समारंभात सहभागी व्हायचे नाही. घरात पडेल ते काम करायचे, सगळ्यांची सेवा करायची. एकंदरीत एखाद्या आश्रित मोलकरणीपेक्षा त्यांची अवस्था  फारशी वेगळी नव्हती. अशा परिस्थितीत बहुधा कोणीतरी नात्यातलीच किंवा परिचितातली एखादी व्यक्ती त्यांच्यावर मातृत्व लादत असे. असे मातृत्व लादणारा पुरुष मात्र वेळ आल्यावर नामानिराळा होई. त्या बिचारीलाच बदफैली, वाईट चालीची,  चारित्र्यहीन म्हणून बदनामी सहन करावी लागे. अशी अत्यंत भयानक आणि दयनीय अशी स्त्रियांची अवस्था होती. महर्षी कर्वे यांच्या संवेदनशील मनाला स्त्रियांची ही अवस्था पाहवत नव्हती. त्यांनी आपल्या लहानपणापासून हे वातावरण पाहिले होते असे नव्हे तर अनुभवले होते. घरात त्यांची  स्वतःची बहिणच बालविधवा झाली होती. या अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम न होता तरच नवल !

      केसोपंत उर्फ केशवराव कर्वे आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याला एकूण सहा मुले झाली. त्यातील तीन अपत्ये अल्पवयातच मरण पावली. भिकाजीपंत उर्फ भिकू हा सर्वात मोठा मुलगा. धोंडूचा क्रमांक दुसरा आणि सर्वात लहान बहीण होती. तिचे नाव अंबा. एके काळी गर्भश्रीमंत असणाऱ्या कर्वे घराण्याची स्थिती या मुलांच्या जन्माच्या वेळी अत्यंत हलाखीची होती. मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा हाताशी नव्हता. पण या दाम्पत्याने मुलांना संस्कारांची श्रीमंती दिली. कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदाने आणि स्वाभिमानाने कसे राहावे याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या मुलांना घालून दिला होता. कोकणातील दापोलीजवळ असलेले मुरुड हे त्यांचे मूळ गाव. याच गावी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

     धोंडू सुरुवातीला फारसा हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध नव्हता. त्या काळातील मराठी चौथीची परीक्षा तो अनुत्तीर्ण झाला. खरे तर त्या काळातील बरेचसे शिक्षक हे कडक शिस्तीचे आणि मुलांना कठोर शारीरिक शिक्षा करणारे होते. पण धोंडूच्या नशिबाने सोमणगुरुजी या नावाचे एक अतिशय प्रेमळ शिक्षक त्याला तेथे भाग्याने लाभले. त्याला समजून घेणारे, अभ्यासाला उत्तेजन देणारे असे हे सोमण गुरुजी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धोंडू पुढच्या वर्षी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाला. लवकरच सहावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्या काळात गावात एकाच  व्यक्तीकडे वर्तमानपत्रे येत असत. सोमण गुरुजींच्या सांगण्यानुसार धोंडू गावातील लोकांना ही वर्तमानपत्रे वाचून दाखवण्याचे काम करीत असे. या कामामुळे धोंडूचे वर्तमानपत्रांचे वाचन आपोआप होऊन त्याच्या ज्ञानात भर पडू लागली. जगात आणि देशात काय सुरु आहे याचे ज्ञान त्याला या वाचनामुळे प्राप्त होऊ लागले. 

सोमण गुरुजी प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षक होते. त्यांनी एक सहकारी भांडार स्थापन करण्यासाठी गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. गावातील लोकांकडून प्रत्येकी पाच रुपये गोळा करून एक सहकारी भांडार सुरु केले. या दुकानाचा कारभार पाहणे आणि हिशेब ठेवण्याचे काम त्यांनी आपला प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थी असलेल्या धोंडूकडे सोपवले. धोंडू हे काम अत्यंत चोख करीत असे. त्याबद्दल त्याला तीन रु. महिना मिळत असे. पण नंतर काही कारणाने हे सहकारी भांडार बंद करण्याची पाळी आली. सोमण गुरुजींनी लोकांकडून जे पैसे घेतले होते, ते त्यांना आता परत करणे भाग होते. त्यातील काही पैसे त्यांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून लोकांना परत केले.  पण आपल्या प्रेमळ आणि बेताचीच मिळकत असणाऱ्या सोमण गुरुजींवर  जास्त भर पडू नये म्हणून धोंडूने एका गृहस्थांना पंचवीस  रु. ची प्रॉमिसरी नोट लिहून दिली आणि पुढे शिक्षणासाठी तो जेव्हा मुंबईला गेला, तेव्हा त्याने शिकवण्या घेऊन हे पैसे फेडले. जणू हीच त्याची सोमण गुरुजींना गुरुदक्षिणा होती. यातून त्याची गुरुवरची निष्ठा, आदर, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा यासारखे गुण दिसून येतात.

( पुढील भाग बुधवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१८/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...