उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा
१९६४ मध्ये कॉंग्रेसच्या भुवनेश्वर
अधिवेशनाच्या वेळी पं नेहरूंची प्रकृती ठीक नव्हती. साहजिकच या अधिवेशनातील ठराव
मांडण्याची जबाबदारी शास्त्रीजींवर आली. शास्त्रीजींनी ती नेहमीप्रमाणे यशस्वीपणे
पार पाडली. दुर्दैवाने २७ मे रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले. या वेळी मंत्रिमंडळात
ज्येष्ठ असलेले श्री गुलझारीलाल नंदा यांची यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड
करण्यात आली. परंतु कामराज यांना ही निवड पसंत नव्हती. त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व
नेत्यांबरोबर बैठकी घेतल्या. इतर काही नावे समोर आली तरी बहुतेक सर्वांचा कल
शास्त्रीजींच्या नावाकडेच राहिला. शेवटी सर्वानुमते शास्त्रीजींची पंतप्रधान पदी
निवड झाली.
देशाला
स्वातंत्र्य मिळून आता सोळा वर्षे झाली होती. या कालावधीत पंडित नेहरूंच्या देशाने
बरीच प्रगती केली होती. विशेषतः औद्योगिक व वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने पावले
पुढे पडली होती. पण तरीही देश दुष्काळाच्या छायेत होता. अन्नधान्याचे विशेष
उत्पादन नव्हते. शेतकरी हताश झाला होता. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये
अस्वस्थता होती. शास्त्रीजींनी पदावर आल्याआल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या
कामाचा झपाटा प्रचंड होता. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रसंगी चार शब्द
सुनावून आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मंत्र्यांना आचारसंहिता ठरवून दिली.
त्यांची तळमळ पाहून सर्व मंत्र्यांनी सुद्धा त्यांना मनापासून साथ दिली.
भारतातील
अन्नधान्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी त्यांनी परदेशातून धान्याची आयात केली.
यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. पण ते याबाबतीत समाधानी नव्हते.
त्यांना देशाचा विकास करून देशाला संरक्षण आघाडीवर स्वयंपूर्ण करायचे होते. त्यांनी
यासाठी देशातील जनतेला ‘ जय जवान, जय किसान ‘ असा नारा देऊन सहकार्याचे
आवाहन केले. धान्याच्या खरेदीसाठी त्यांनी ‘ खरेदी विक्री संघ ‘ स्थापन केला. यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव
मिळणार होता. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कालवे बांधून पाणी उपलब्ध करून
दिले. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
शेतीच्या वाढीव
उत्पन्नासाठी रासायनिक खतांची गरज होती. त्यांनी यासाठी अमेरिकेची मदत घेऊन
रासायनिक कारखाने सुरु केले. यात शेतीला खत उपलब्ध होण्याबरोबरच तरुणांना रोजगारही
उपलब्ध झाला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी तरुणांना सहकार्याचे आवाहन केले.
तरुणांनी सुद्धा त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. शेतकरी, सैनिक, बेरोजगार तरुण इ. साठी
त्यांनी केलेले प्रयत्न भावी काळात देशाला प्रगतीपथावर नेणारे ठरले. कारखान्यांनी
औद्योगिक क्षेत्रात भारताला पुढे नेले. देशाच्या संरक्षण सिद्धतेत त्यांनी कोणतीही
कसर ठेवली नाही. सर्व दृष्टीने देशाला स्वयंपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
आपल्या पंतप्रधान पदाच्या कालखंडात त्यांनी इतर देशांशी सलोख्याचे व दृढ संबंध करण्यावर भर दिला. अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेहून परतताना त्यांनी मुद्दाम पाकिस्तानचे नेते अयुबखान यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत शस्त्रबंदी करार केला. पण पाकिस्तानने विश्वासघात केला. हजारो घुसखोर सैनिक पाकिस्तानने काश्मीरमध्ये पाठवले. पाकिस्तानच्या या कृतीमुळे शास्त्रीजी प्रक्षुब्ध झाले. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी मंत्रिमंडळ आणि सेनाप्रमुखांच्या बैठकी घेतल्या. जनतेलाही विश्वासात घेतले आणि युद्धाची जय्यत तयारी केली. पाकिस्तानला यावेळी अमेरिकेने रणगाडे पुरवून युद्धात मदत केली. पण शास्त्रीजींच्या आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावले होते. त्यामुळे भारताने या युद्धात पाकिस्तानला लक्षात राहिला असा जबरदस्त तडाखा दिला. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेल्या अभेद्य अशा पॅटन रणगाड्यांचा देखील भारतीय सैन्याने धुव्वा उडवला. नेहरूंच्या मृत्युनंतर भारत कमकुवत झाला असा पाकिस्तानचा समज झाला होता. तो या युद्धाने खोटा ठरवला.
( पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
पाकिस्तानचा समज झाला होता. तो या युद्धाने खोटा ठरवला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा