उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
उज्ज्वल
भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग एक
रामेश्वरम. समुद्रकिनारी असलेले निसर्गरम्य
गाव. सतत समुद्राची भरती आणि ओहोटी येणारे. समुद्राची गाज सतत कानावर पडणारे. उंचच
उंच नारळी पोफळीची झाडे. विविध पक्ष्यांचे मधुर कूजन कानी पडणारे गाव. विशाल
फेसाळता नि खळाळता दर्या. तितकेच विशाल हृदय असणारी पण साधी आणि संस्कारसंपन्न
माणसे. अशा या गावात श्री शंकराचे प्रसिद्ध मंदिर. देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी
येणारे. अत्यंत पवित्र ठिकाण. गावात या मंदिराच्या बरोबर मशीद आणि चर्च सुद्धा.
जणू हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या धर्मांचा
त्रिवेणी संगम. गावातील लोक वेगवेगळ्या धर्माचे असले तरी समंजस आणि आपापल्या
धर्माचे आपल्या पद्धतीने पालन करणारे. दुर्मिळ असा गावकऱ्यातील एकोपा. काही प्रश्न
आलाच तर तो एकत्र बसून चर्चेने आणि शांततेने सोडवणार !
अशा या गावात वडील जैनुलाब्दीन आणि आई
अशिअम्मा या धार्मिक दाम्पत्याच्या पोटी १५ ऑक्टोबर १९३१ रोजी कलामांचा जन्म झाला.
त्यांचे पूर्ण नाव होते आवूल पाकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम. त्यांचे वडील
जैनुलाब्दीन हे मशिदीचे इमाम होते. ते नावाड्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा
उदरनिर्वाह करीत. पण त्यांचा अध्यात्मिक अधिकार मोठा होता त्यामुळे आणि त्यांचा
गावातील लोक आदर करीत. त्यांची आई एका संस्कारसंपन्न उच्च कुटुंबातून आली होती.
कलामांना दोन भाऊ आणि एक बहीण होती. घराची परिस्थिती तशी सामान्य होती. पण खाऊन
पिऊन सुखी कुटुंब होते. संस्कारांची मात्र श्रीमंती होती. कलमांची आई सुगरण होती.
साधाच पण चवदार स्वयंपाक करीत असे. त्यांच्याकडे कायम येणारा जाणारा असे. जेवणाला
घरातील लोकांबरोबरच बाहेरील लोक नेहमी असत. पण त्यांच्या आईने कधी कंटाळा केला
नाही.
कलामांचे वडील त्यांना संध्याकाळी मशिदीत
घेऊन जात. वडिलांनी त्यांना प्रार्थनेचे महत्व अगदी सोप्या शब्दात समजावून
सांगितले होते. ते म्हणायचे, “ आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा या देहापासून दूर जातो. बाहेरील विश्वाचा आपण एक भाग होतो. आणि या अनंत
विश्वाला जातपात, भेदभाव काहीही
ठावूक नाही. ते त्यापासून अलिप्त आहे. म्हणून आपणही प्रार्थना करताना सगळे भेदभाव
विसरून त्या शक्तिमान परमेश्वराला शरण जावे. “ वडिलांनी कलामांना संयम, शिस्त, सचोटी शिकवली. तर आईने त्यांच्यावर
इतरांवर प्रेम करणे, त्यांच्याप्रती
सहानुभूती ठेवणे आणि विश्वास ठेवणे या गुणांचे संस्कार केले. संस्कारांची ही
आईवडिलांकडून मिळालेली शिदोरी त्यांना आपल्या पुढील आयुष्यात कामी आली. त्यांनी
पुढील आयुष्यात जेव्हा शास्त्रज्ञ म्हणून मोठमोठे प्रकल्प राबवले आणि आपल्या
शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व केले, तेव्हा हे आईवडिलांकडून मिळालेले संयम,स्वयंशिस्त, इतरांबद्दल प्रेम, विश्वास गुण त्यांना अतिशय उपयोगी पडले.
बालपणीचे काही प्रसंग मात्र त्यांच्या
हळव्या आणि संस्कारक्षम मनावर कायमचे कोरले गेले. ते शाळेत असतानाचा एक प्रसंग. ते
आणि गावातील शंकराच्या मंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री यांचा मुलगा
रामनाथन हे वर्गात पुढे एकाच बाकावर बसत. कलामांच्या डोक्यावरील मुस्लीम पद्धतीची
गोल टोपी आणि रामनाथन याच्या कपाळावरील गंध, शेंडी इ गोष्टींमुळे त्या दोघांचा भिन्न धर्म चटकन लक्षात येत असे. एकदा त्या
शाळेत एक नवीन शिक्षक आले. त्यांनी या दोघांना पहिल्या बाकावर शेजारी बसलेले
पाहिले आणि त्यांना ते खटकले. एका ब्राह्मणाच्या मुलाजवळ मुस्लीम मुलगा बसलेला
पाहून त्यांचे पित्त खवळले. आणि त्यांनी सरळ कलामांना उठून मागे जाऊन बसण्यास
सांगितले. कलामांना आपले काय चुकले हे कळले नाही. पण आपल्या प्राणप्रिय
मित्रापासून दूर उठून जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. घरी गेल्यावर दोघांनीही
हा प्रसंग आपल्या घरच्यांना सांगितला. कलामांच्या वडिलांना आणि पक्षी
लक्ष्मणशास्त्रीना या घटनेमागील गांभीर्य लक्षात आले. लक्ष्मणशास्त्रींनी त्या
शिक्षकांना निरोप पाठवून बोलावून घेतले. आणि सर्वांसमक्ष सांगितले की मुले निरागस
आहेत. त्यांच्या मनात हे जातीय असहिष्णुतेचे आणि सामाजिक विषमतेचे बीज पेरू नका.
आणि हे जमत नसेल तर गाव आणि शाळा सोडा. येथे कलामांना नीतिमूल्यांचा एक नवीन पाठ
अप्रत्यक्षपणे शिकायला मिळाला. आणि ते शिक्षकही खजील झाले. आपल्या वागणुकीचा
त्यांना पश्चाताप झाला. हा प्रसंग कलामांच्या मनावर कायमचा कोरला गेला.
या प्रसंगातून त्या गावातील कलामांच्या
वडिलांसारखी माणसे, लक्ष्मणशास्त्री
इ किती समजूतदार आणि मोठ्या मनाची होती हे दिसते. अशीच घरे आणि माणसे संस्काराची
अप्रत्यक्ष पाठशाळा असतात. त्यातूनच कलामांसारखी व्यक्तिमत्वे घडतात आणि आपल्या
देशाचे नाव उज्ज्वल करतात. असेच कलामांचे आणखी एक शिक्षक होते. ते कर्मठ ब्राह्मण
असले तरी आधुनिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या घरी कलामांना जेवायला बोलावले.
त्यांच्या पत्नीने जेव्हा कलामांना आपल्या स्वयंपाकघरात वाढण्यास नकार दिला तेव्हा
ते शिक्षक स्वतः त्यांच्यासोबत बाहेरच्या खोलीत बसून जेवले. त्या गुरूंचे नाव शिव
सुब्रह्मण्यम् अय्यर. त्यांनी कलामांमधील सुप्त गुण ओळखले होते. ते म्हणायचे, “ मी मोठ्या शहरात राहणाऱ्या शिक्षित माणसांच्या बरोबर तुला
आणणार आहे. “ आणि त्यांचे हे
शब्द पुढे अक्षरशः खरे ठरले.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा