उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री ( अंतिम भाग )
१९६५ च्या या भारत पाक युद्धात शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचे आक्रमण तर परतवून लावलेच पण पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय प्राप्त केला. पण इंग्लंड, अमेरिका इ. राष्ट्रांनी
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याबद्दल भारताला दोष दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात
वाटाघाटी घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला. भारताने पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय मिळवल्याने खरे म्हणजे या वाटाघाटींची अजिबात आवश्यकता नव्हती. पण एकंदरीत असे वातावरण निर्माण करण्यात आले की या परिषदेला जाणे शास्त्रीजींना भाग पडले. हा सगळा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच भाग होता. त्यासाठी १० जानेवारी १९६६ ला
रशियात ताश्कंद करार परिषद झाली. या परिषदेसाठी शास्त्रीजी प्रकृती ठीक नसतानाही
रशियाला गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान करार होऊन त्यावर सह्या झाल्या.
या करारामुळे भारताला आपल्या मालकीच्या काश्मीरच्या प्रदेशातून माघार घ्यावी
लागणार होती. हा भारताच्या भूमिकेचा राजनैतिक पराभवच होता. या करारामुळे भारतावर
प्रचंड दबाव आला. शाश्त्रीजी अस्वस्थ झाले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा तीव्र
झटका आला. आणि तेथेच शास्त्रीजींचे दु:खद निधन झाले. भारतमातेचा लाल हरपला. त्यांच्या या अकाली जाण्याने
संपूर्ण देश हळहळला. एका कार्यक्षम, कर्तव्यतत्पर नेत्याला भारतीय जनता मुकली होती. भारतमातेच्या रत्नहारातील एक रत्न ओघळले होते.
शास्त्रीजींचा मृत्यू मनाला चटका लावून जातो. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असं जरी म्हटलं जात असलं तरी खरं म्हणजे त्यांचा मृत्यू हे एक गूढ आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ' द ताश्कन्द फाईल्स ' या चित्रपटात हे गूढ बऱ्यापैकी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या शीतयुद्धाच्या काळात संपूर्ण जग दोन भागात विभागले गेले होते. जगातले अर्धे देश अमेरिकेच्या बाजूने तर उर्वरित देश रशियाच्या बाजूने होते. हे दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्याच्याप्रमाणे या दोन्ही देशांच्या गुप्तहेर संघटना इतर देशांमध्ये ढवळाढवळ करून आपल्याला अनुकूल अशा घटना घडवून आणत होत्या. त्यावेळी भारतावर रशियाचा प्रभाव होता. पं नेहरू रशियातील औद्योगिक क्रांती पाहून भारावून गेले होते. भारताच्या औद्योगिक विकासासाठी रशियाची मदत अनुकूल ठरेल असे त्यांना वाटल्याने भारत रशियाकडून औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली प्रचंड यंत्रसामुग्री आयात करत होता. खरे म्हणजे यात रशियाचाही प्रचंड फायदा होता. रशिया भारताचे हित जपतो आहे असा भारतीयांचा समज दृढ करण्यात रशिया यशस्वी झाला होता. रशियाचे अनेक हस्तक भारतात कार्यरत होते. अनेक भारतीय राजकारणी आणि मंत्री रशिया आणि त्यांच्या हस्तकांच्या प्रभावाखाली होते आणि त्यांना अनुकूल असे निर्णय घेत होते. कदाचित शास्त्रीजींसारखा तत्वनिष्ठ नेता त्यांना आणि रशियन राज्यकर्त्यांना अडचणीचा ठरत असावा.
भारत पाकिस्तान युद्धानंतर खरे म्हणजे जी ताश्कन्द परिषद झाली ती आवश्यक नव्हती. पण एकंदरीत आंतराराष्ट्रीय कटाचा एक भाग म्हणून तसे वातावरण निर्माण करण्यात आले. शास्त्रीजींना त्या ठिकाणी जाणे अपरिहार्य ठरले. त्या ठिकाणी झालेला शास्त्रीजींचा मृत्यू संशयास्पद ठरला. भारतासारख्या एका महत्वाच्या देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्याचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याची योग्य ती चौकशी व्हायला हवी होती. पण शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतरचा अहवाल ना रशियाने प्रसिद्ध केला ना भारताने. त्यांचे पार्थिव भारतात आले तेव्हा ते पूर्णपणे काळे पडले होते. शरीरावर ठिकठिकाणी कापल्याच्या जखमा होत्या. त्यातून थोडे रक्तही निघाल्याचे दिसत होते. या सगळ्या गोष्टी शास्त्रीजींवर विषप्रयोग झाल्याचे सूचित करतात. त्यांच्या शरीरात विषाचा अंश सापडू नये म्हणून शरीराला जखमा करून विषाचे अंश काढून टाकण्याचा प्रयत्न झाला असावा. शास्त्रीजींच्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे नाकारले आहे. तसेच प्रख्यात पत्रकार कुलदीप नायर हेही त्यावेळी उपस्थित होते. त्यांचेही असेच मत आहे. शास्तीजींच्या मृत्यूसंदर्भात जे प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदार होते, त्यांचाही वेगवेगळ्या अपघातात मृत्यू होतो हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. आपल्या भूमिकेला प्रतिकूल असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा काटा काढण्याचे काम रशियन आणि अमेरिकन हेरखात्याने सहजपणे केले आहे, याच पार्श्वभूमीवर शास्त्रीजींच्या बळी गेला असल्याच्या शक्यतेकडे निर्देश ' द ताश्कन्द फाईल्स ' हा चित्रपट करतो.
२ ऑक्टोबरला म गांधींची जयंती असते. त्याचबरोबर शास्त्रीजींची पण जयंती असते. पण देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या भारतमातेच्या सुपुत्राची काहीशी उपेक्षाच झालेली दिसते. शास्त्रीजींनी देशासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांनी आपले खाजगी जीवन, त्यातील मौजमजा यांना तिलांजली दिली. प्रसंगी आपल्या प्रकृतीची सुद्धा पर्वा केली नाही. या माणसाचे राहणे कायमच अत्यंत साधे होते. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावरही त्यांच्या साध्या राहणीमानात फरक पडला नाही. पदाचा अहंकार त्यांच्यात कधीही आला नाही. खादीचे धोतर, सदरा आणि टोपी हाच त्यांचा पोशाख कायम राहिला. त्यांचा मनमिळावू स्वभाव सुद्धा शेवटपर्यंत कायम राहिला. कोणावरही ते कधी रागावले नाही. आपण कोणीतरी खूप मोठे आहोत असा आव त्यांनी कधी आणला नाही. कधी त्यांच्या हातून एखादी चूक झाली तर ते स्वतःला शिक्षा करीत व त्यात सुधारणा करीत असत. आपल्या भारतमातेला वैभवसंपन्न करण्यासाठी हा महात्मा आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला. ते खरोखरच भारतरत्न होते. अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय असे त्यांचे जीवन होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी, उज्ज्वल चारित्र्य, निगर्वी स्वभाव आणि देशासाठी स्वतःला वाहून घेणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. अशा या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. अशा या महान आणि आदरणीय दुसऱ्या राष्ट्रपित्याला शतशः प्रणाम.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/१०/२०२०
प्रतिक्रयेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा