उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे भाग चार
कोणतीही संस्था चालवण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी पैसा आणि समर्पित कार्यकर्त्यांची
गरज असते. कर्व्यांच्या संस्थांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. त्या
चालवण्याकरिता आवश्यक तेवढा पैसाही वेळोवेळी उभा राहिला. पण हे सगळे कार्य
चालवण्यासाठी निस्वार्थ आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज होती. असे कार्यकर्ते
घडवण्यासाठी कर्व्यांनी ‘ निष्काम कर्म
मठाची ‘
स्थापना केली. या मागे भगवद गीतेतील निष्काम कर्मयोगाची
कल्पना कर्व्यांच्या डोळ्यांसमोर होती. पण काही काळातच ही संस्था बंद करावी लागली.
कारण पुरेशा समर्पित कार्यकर्त्यांचा अभाव होता. शिवाय लोकांनाही या मठाच्या
उपयुक्ततेबद्दल शंका होती. अण्णांची मठ स्थापन करण्यामागे जी उदात्त कल्पना होती
ती लोकांना समजू शकली नाही. अण्णांच्या मनात आणि आचरणात सुद्धा असलेला निष्काम कर्मयोग समजून घेण्यात समाज कमी पडला. पण अशा गोष्टींमुळे अण्णा विचलित होत नसत. कोणत्याही परिस्थितीत ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची एक विलक्षण जिद्द आणि चिकाटी अण्णांजवळ होती. आणि या सगळयांच्या पाठीमागे होती ती स्त्रियांच्या उद्धाराची तळमळ. त्यामुळे पुढे आश्रम, मठ आणि महाविद्यालय यांचे एकत्रीकरण करून ‘ महिलाश्रम ‘ ही वेगळी संस्था निर्माण करण्यात
आली. त्यावेळी अण्णा म्हणाले, “ या त्रिवेणी संगमाने कार्याचे महत्व वाढून हे एक तीर्थस्थान
ठरो व यातून बाहेर पडणाऱ्या हजारो मानसकन्या स्वतःचा व आपल्या मातृभूमीचा उद्धार
करण्यास सहाय्यभूत ठरोत. “
याच सुमारास जपानी महिला विद्यापीठाचे एक माहितीपुस्तक
योगायोगाने अण्णांच्या हाती पडले. आणि ते वाचून त्यांच्या विचारांना चालना मिळाली.
त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे, त्यांची जाचक रुढींतून मुक्तता करणे आदी गोष्टी म्हणजे स्त्रियांवर उपकार करणे
समजले जात होते. पण स्त्रियांना शिक्षण देणे, आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे हे आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे अशी
अण्णांची भावना होती. स्त्री दास्य मुक्ती आम्हाला मान्य नाही. उलट स्त्रीचे
मुक्तक्षेत्र हे तिचे घर आहे. या तिच्या कार्यक्षेत्रात पत्नी, माता म्हणून तिचा योग्य सन्मान झालाच पाहिजे. या विचारात
स्त्रियांना आपल्या घरापुरातेच सीमित करण्याचा अण्णांचा मुळीच हेतू नव्हता. तर
तिला शिक्षण घेऊन स्वावलंबी होता यावे, तिने स्वतःची प्रगती करावी आणि समाजाकडून आणि कुटुंबातील इतर घटकांकडून तिला
मानाचे स्थान मिळावे असे अण्णांना वाटत होते. या विचारात अण्णांचे द्रष्टेपण
आपल्याला दिसते. अण्णा केवळ स्त्रियांचे उद्धारकर्ते होते असे नव्हे तर ते
स्त्रियांना व्यक्ती म्हणून स्वतंत्र स्थान देणारे, स्वतःच्या पायावर उभे करणारे एक मूर्तिमंत विद्यापीठ होते.
अण्णांनी आपली महिला विद्यापीठाची कल्पना
लोकांसमोर मांडली. त्यांच्या या कल्पनेवर सुद्धा अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. पण अण्णा दृढनिश्चयी होते.
एकदा जे ठरवले त्यापासून ते कधीही मागे हटत नसत. आणि त्यांच्या जिद्दीला फळ आले. ३
जून १९१६ ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम
मातृभाषेतून ठरवण्यात आला. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी अण्णांच्या या कर्तृत्वाची
प्रशंसा केली.
अण्णांनी महिला विद्यापीठाची स्थापना तर
केली पण या विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांची गरज होती.
अण्णांनी त्यासाठी पुण्याला महिला पाठशाला सुरु केली. सुरुवातीला या पाठशालेत फक्त
५ विद्यार्थिनी होत्या. लवकरच तेथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम
शिकवण्यास सुरुवात झाली. विद्यापीठाला मात्र अजून सरकारकडून मान्यता मिळाली
नव्हती. पण लौकरच एक दुग्धशर्करा योग जुळून आला. मुंबईतील एक दानशूर उद्योगपती
अण्णांच्या मदतीला धावून आले. ते नुकतेच जपान महिला विद्यापीठाचा दौरा करून आले
होते. त्यांना स्त्री शिक्षणाविषयी तळमळ वाटे. आणि त्यांनी अण्णांच्या महिला
विद्यापीठासाठी पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्या काळात १५ लाख रु.
म्हणजे फार मोठी मदत होती. या विद्यापीठाला भारतीय स्त्री विद्यापीठाचे नाव बदलून
त्यांच्या आईंचे म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतीय स्त्री विद्यापीठ
असे नाव देण्यात आले.
याच सुमाराला पुण्यामध्ये आश्रमाच्या
सहाय्याने एक कन्याशाळा चालवण्यात येत होती. तिचे सारे काम श्री गो म चिपळूणकर हे
ध्येयवादी आणि समर्पित वृत्तीचे गृहस्थ पहात होते. ही कन्या शाळा, महिला पाठशाला आणि विद्यापीठ यांचे एकत्रीकरण करण्यात आले.
या तिन्ही संस्थांचा अण्णांच्या महिलाश्रामाशी कोणताही संबंध राहणार नव्हता.
अण्णांची वृत्ती एखाद्या फकीरासारखी निरिच्छ होती. आपण सामान्य माणसे आपल्या
एखाद्या किरकोळ गोष्टीवर हक्क सांगण्यासाठी किती आटापिटा करतो ! पण अण्णा त्यातून
सहज बाजूला झाले. पुढे या विद्यापीठातून हजारो मुली आणि महिला शिक्षणाची तेजस्वी
ज्योत घेऊन बाहेर पडू लागल्या आणि महिलांच्या जगतातील अन्याय, अत्याचाराचा अंधःकार दूर करू लागल्या. अण्णा मात्र या
सगळ्या गोष्टींसाठी चंदनासारखे झिजत राहिले.
आता अण्णांचे आणि विद्यापीठाचे नाव साऱ्या भारतात प्रसिद्ध झाले. पण इथे
थांबतील आणि स्वस्थ बसतील ते अण्णा कसले ? आता त्यांना ध्यास लागला होता आपल्या विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात
पोहचविण्याचा आणि विद्यापीठासाठी अधिक निधी मिळवून त्याची आणखी प्रगती करण्याचा !
या करिता ते जगप्रवासाला निघाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे सत्तर वर्षे ! पण एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी उमेद त्यांच्याकडे होती. या दौऱ्यात अण्णांनी युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. अनेक शिक्षण तज्ज्ञांबरोबर भेटी घेऊन चर्चा केली. बर्लिनमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन बरोबर त्यांनी चर्चा केली. पुढे ते जपानमध्ये गेले. तेथे त्यांनी महिला विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठातील अभ्यासक्रम, उपक्रम इ ची माहिती त्यांनी यावेळी घेतली. नंतर अनेक आशियायी देशात ते गेले. या सगळ्या देशातून आपल्या विद्यापीठासाठी मोठा निधी त्यांना मिळाला. अण्णांचे चिरंजीव डॉ शंकरराव कर्वे हे आफ्रिकेत स्थायिक झाले होते. आता अण्णांनी आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथील अनेक शहरांना भेटी देऊन त्यांनी विद्यापीठासाठी मदत मिळवली. यावरून कोणाचा असा समज होण्याची शक्यता आहे की अण्णा फक्त मदतीसाठी परदेशात फिरत होते. पण त्यांना आपल्या विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची होती. महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती करणे, महिलांना अधिक स्वावलंबी बनवणे आणि त्यासाठी समाजमन अनुकूल करून घेणे हा त्यांचा उद्देश होता.
( पुढील आणि अंतिम भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा