उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग तीन )
कर्वे मुंबईत शिक्षक म्हणून काम करीत असताना गोपाळ कृष्ण गोखले यांनी कर्व्यांना पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात गणित शिकवण्यासाठी आमंत्रित केले. हा कर्व्यांच्या विद्ववत्तेचा एक प्रकारे मोठा सन्मानच होता. गोखले यांना कर्व्यांचे गणितावरील प्रभुत्व माहिती होते. हे आमंत्रण स्वीकारावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत कर्वे असताना त्यांचे गुरु राजाराम शास्त्री भागवत यांनी त्यांना पुण्याला जाण्याचा सल्ला दिला आणि प्रो. कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुण्यात आल्यानंतर कर्व्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण मिळण्यास सुरुवात झाली. कर्व्यांची विद्वत्ता, त्यांची फर्ग्युसन सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात असलेली प्राध्यापकाची नोकरी आणि त्यांचे सामाजिक स्थान पाहून त्यांना पुनर्विवाह करण्याविषयी वारंवार विचारणा होत असे. पण कर्व्यांच्या मनात केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच मनाला शिवला नाही.
समाजातील विधवांची स्थिती ते उघड्या डोळ्यांनी पहात होते. ती स्थिती अत्यंत वाईट होती. स्त्री म्हणजे केवळ पुरुषाच्या भोगविलासाचे साधन बनली होती. तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिचे स्वतःचे काही विचार, मते आहेत हे मानायलाच समाज तयार नव्हता. तो काळ असा होता की एखाद्या पन्नास साठ वर्षाच्या गृहस्थाची बायको वारली तरी तो दहा बारा वर्षांच्या मुलीशी पुनर्विवाह करीत असे. याच विषयावर आधारित प्रख्यात नाटककार गो ब देवल यांचे ' संगीत शारदा ' हे नाटक त्या काळातील एक महत्वाचे नाटक. दुर्दैवाने अशा व्यक्तीचे काही कारणाने लवकर निधन झाले तर ती कोवळी मुलगी तिचा काही दोष नसताना विधवा होई. त्या काळातील प्रथेप्रमाणे तिला केशवपन करावे लागे. तिला पुनर्विवाहाला बंदी असे. आणि समाज या सगळ्यांचा दोष तिच्यावर टाकून मोकळा होत असे. हे सगळे तिच्या पूर्वजन्मीच्या पापाचे फळ आहे असे मानले जाई.
म्हणून कर्व्यांनी मनाशी ठरवले की
पुनर्विवाह करायचाच झाला तर आपण तो एखाद्या विधवेशी का करू नये ? अण्णांचा मित्र नरहर जोशी याच्या तीनही बहिणी बालविधवा
झालेल्या होत्या. म्हणून नरहरचे वडील बाळकृष्ण जोशी यांनी कर्व्यांना म्हटले की, विधवेशीच लग्न करायचे असेल तर मुलगी शोधण्याची गरज नाही.
माझी मुलगी गोदुबाई हिच्याशी तुम्ही पुनर्विवाह करा. त्यावेळी गोदुबाई पंडिता
रमाबाईंच्या ‘शारदा सदन ‘ मध्ये राहत असत. गोदुबाईशी लग्न करायचे कर्व्यांनी मान्य
केले. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून प्रसिद्ध झाल्या. अण्णांच्या कार्यात बाया कर्वे यांनी मोलाचे योगदान दिले. पण कर्व्यांना या
विधवेशी केलेल्या विवाहाची खूप मोठी किंमत मोजावी लागली. पण कर्वे त्यामुळे विचलित
झाले नाहीत. बऱ्याच वृत्तपत्रात त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली पण काही
वर्तमानपत्रांनी कर्व्यांवर टीकेची झोड उठवली. सनातनी लोकांनी त्यांची कठोर शब्दात
निर्भत्सना केली. इतकेच काय पण कर्वे आणि आनंदीबाई हे दोघे जेव्हा मुरुडला गेले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना झिडकारले. कर्व्यांच्या गावातील
कुटुंबावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. या सगळ्या गोष्टींमुळे कर्व्यांना आणि
त्यांच्या कुटुंबियांना फार मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. कर्वे आणि
त्यांच्या मित्रांनी गावात स्नेहवर्धक मंडळ या नावाचे एक मंडळ काढले होते. पण आता
कर्व्यांच्याच काही मित्रांना त्यांची उपस्थिती नकोशी झाली. कर्व्यांनी ते मंडळ
सोडले.
समाजाने एवढा प्रचंड त्रास दिला पण कर्वे
डगमगले नाहीत. कधी कधी त्यांना विषण्णता आली पण आपण जे काही करतो ते योग्यच आहे या
गोष्टीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे सगळ्या परिस्थितीला त्यांनी मोठ्या
धैर्याने तोंड दिले. त्यांची मनोवृत्त्ती संताची होती. सगळा त्रास सोसूनही
कोणाबद्दल टीकेचा एक चकार शब्दही त्यांच्या तोंडून बाहेर पडला नाही. संत
ज्ञानेश्वरांनी समाजाची जहरी टीका सहन केली. पण शेवटी त्यांनी लोकांसाठी ‘ पसायदान ‘ मागितले. विष
प्राशन करून तोंडातून अमृतवाणीच बाहेर पडली. तसेच अण्णांचे होते. बालविवाह, विधवा विवाहास विरोध, केशवपन, अस्पृश्यता आदी अनेक गोष्टी केवळ
अतिरेकी विरोध करून बंद होणार नाहीत. त्यासाठी समाजमन बदलले पाहिजे. त्यासाठी
स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचे आत्मभान जागृत केले पाहिजे असे त्यांना वाटे.
स्त्रिया शिकल्या म्हणजे त्यांची समाजातील परिस्थिती सुधारेल अशी त्यांची धारणा
होती. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. स्त्रीने स्वावलंबी व्हावे, एखादी कला शिकून घ्यावे म्हणजे तिला आपल्या पायावर उभे
राहता येईल असे त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी आनंदीबाईंना परिचारिका आणि सुईण
यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नागपूरला पाठवले. त्यासाठी वर्षभर त्यांना
नागपूरला राहावे लागले.
एखाद्याने विधवेशी पुनर्विवाह केला तर
त्याला केवढ्या दिव्याला सामोरे जावे लागते याचा अनुभव स्वतः कर्व्यांनी घेतला
होता. म्हणून त्यांनी विधवा विवाहासारख्या कार्याला बळ मिळावे यासाठी ‘ विधवा विवाह परिषदे ‘ची स्थापना केली. पण पुढे या संस्थेला समाजाचा प्रखर विरोध होऊ नये म्हणून
त्यांनी पुढे हे नाव बदलून ‘ विधवा-विवाह बंधन
मुक्ती परिषद ‘ असे ठेवले. पण एवढे करून शांत
बसतील तर ते कर्वे कसले ? त्यांनी विधवा
स्त्रियांच्या हाल अपेष्टा पहिल्या होत्या. अनेक विधवा स्त्रियांना पुन्हा विवाह
करण्याची संधी मिळत नाही, शिक्षण घेण्याची
संधी मिळत नाही हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी विधवांना सुखाने रहाता येईल असा
एखादा आश्रम सुरु करावा असे त्यांनी ठरवले. आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी
स्वतःपासून होते हे तत्व आपल्या आयुष्यात कर्व्यांनी नेहमी कटाक्षाने पाळले होते.
त्यामुळे सुरुवातीला स्वतःचे एक हजार रुपये जमा करून यातील पहिला वाटा त्यांनी
उचलला. आणि अशा रीतीने पुढे ‘ अनाथ बालिकाश्रम
मंडळ ‘
पुण्यात सुरु झाले. त्यासाठी कर्व्यांनी स्वतः गावोगाव
फिरून निधी जमवला. पुढे हा आश्रम पुण्याजवळील हिंगणे या गावी स्थलांतरित झाला.
आश्रम हिंगणे येथे स्थलांतरित झाला तरी कर्वे पुण्यातच राहात होते. दिवसभर कॉलेजमध्ये काम करून संध्याकाळी ते हिंगणे येथे जायला निघत. थंडी, वारा, पाऊस काहीही त्यांना अडवू शकत नसे. प्रसंगी स्वतःच्या घराकडे ते दुर्लक्ष करीत. पण आश्रमातील मुली उपाशी राहू नये म्हणून त्यांच्यासाठी दररोज ओझे वाहून नेत. रात्री त्या मुलीना शिकवीत असत. पुन्हा पहाटे उठून पुण्याची वाट धरीत यावरून ते करीत असलेल्या कष्टांची कल्पना येईल. पुढे कर्व्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी मातेच्या ममतेने या आश्रमातील मुलींना सांभाळले. कर्व्यांना मुलगी नव्हती. आश्रमातील मुली याच आता त्यांच्या मुली झाल्या. आता कर्व्यांना या मुलीना व त्यांच्यासोबतच शहरातील इतर कुमारिकांना शिक्षण मिळावे म्हणून महाविद्यालय काढावे असे वाटू लागले. यासाठी पुन्हा पैशाची आवश्यकता होती. आश्रमातील व्यवस्थापनाच्या कानावर कर्व्यांनी ही गोष्ट घातली. पण ही गोष्ट आश्रमाच्या कक्षेत येत नसल्याने हवे तर कर्व्यांनी त्यासाठी स्वतंत्र संस्था काढावी असे व्यवस्थापनाचे मत पडले. हे आव्हानही कर्व्यांनी पेलण्याचे ठरवले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने लकडी पुलाजवळ असलेल्या आपल्या जुन्या प्रशस्त वाड्यात हे महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी दिली. आणि १९०७ मध्ये हे महाविद्यालय सुरु झाले त्यावेळी प्रवेश घेणाऱ्या फक्त दहा मुली होत्या. चांगल्या कामासाठी मदतीचे अनेक हात पुढे येतातच. या महाविद्यालासाठी भगिनींनी मुष्टीफंड जमवून पैसे गोळा केले. अनेकांनी सढळ हस्ते मदत केली. याकाळात मुलींसाठी दोन निधी उभारण्यात आले. त्यांचा उद्देश मुलींना स्वावलंबी बनवणे हा होता. दोन निधींपैकी एक निधी होता ‘ ब्रह्मचर्य निधी.’ आणि दुसरा निधी होता ‘ शिक्षण निधी.’ या निधीचा उद्देश होता मुलींनी बालविवाह करू नये. त्यांनी वीस वर्षांपर्यंत अविवाहित राहावे आणि शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा