मुख्य सामग्रीवर वगळा

आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर

 उगवतीचे रंग 

आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर

१९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ' भारतरत्न ' हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले," O my God, why I am selected for this honour ? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का ? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले ? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच ! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का ?"

पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच ! राजकारण हे खरे तर समाजसेवेचे क्षेत्र. परंतु या क्षेत्रात काम करणारे समाजसेवेच्या उद्देशाने अभावानेच येतात. बहुतेकांना सत्ता किंवा पद हवे असते. ते नाही मिळाले तर ते वाटेल त्या थराला जाण्यासाठी कमी करत नाही हे आजकाल आपण पाहतो आहोत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात असे सारखे पक्षांतर सत्तेसाठी सुरू राहते. 

ज्याप्रमाणे जेआरडी टाटा यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ती पाहून म्हणावेसे वाटते की खरोखर अशा व्यक्ती धन्य होत. भारताचे भूषण होत. कोणतीही अपेक्षा न बाळगता अशा व्यक्ती आपले कर्तव्य निरलसपणे करीत राहतात.

 असेच आणखी एक उदाहरण आठवते. १९५२ सालची गोष्ट आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते.  त्यावेळी इस्रायलचे पहिले अध्यक्ष चॅम वेजमेन यांचे नुकतेच निधन झाले होते. अशावेळी आईन्स्टाईन यांना इस्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने इस्रायलचे अध्यक्ष व्हावे अशी जनतेची इच्छा होती. वास्तविक जर्मनीतून आलेल्या एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा सन्मान होता. परंतु आईन्स्टाईन यांनी अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. ते आपल्या उत्तरात म्हणाले," तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. त्यासाठी आपला मनापासून आभारी आहे. परंतु त्याचबरोबर मला हेही आपल्याला सांगितले पाहिजे की आपण जे पद मला देऊ करत आहात त्या पदावर बसण्याची माझी पात्रता नाही. कारण गुंतागुंतीच्या अशा मानवी संबंधांच्या क्षेत्रात मला फारसं कळत नाही. त्या विषयाचा मी कधी अभ्यासही केला नाही. मला गणितात आणि भौतिकशास्त्रात थोडीफार गती असेल पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की त्याच क्षेत्रात मी आणखी परिश्रम करावेत आणखी अभ्यास करावा. "

महान व्यक्ती खरोखरच महान का असतात त्याचे उत्तर म्हणजे मला वाटतं वर आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया. नाहीतर आपल्याला एखादे पद मिळावे म्हणून आपण किती आसुसलेले असतो. आपल्याला कोणत्याही विषयात गती आहे आणि आपल्याला कोणतेही काम जमू शकते अशा विचाराने सत्तेकडे किंवा पदांकडे धाव घेणाऱ्यांची सध्या कमतरता नाही. परंतु जेव्हा अशा अयोग्य किंवा अपात्र व्यक्ती पदावर येतात तेव्हा ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आपण पाहतो. 

रामकृष्ण परमहंस, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखी थोर मंडळी कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. वास्तविक ते काय किंवा आणखी इतर संत काय यांची योग्यता खरोखरच फार मोठी ! पण त्यांचे म्हणणे असे असायचे की वाकायचंच असेल तर त्या सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापुढे वाका. इतरांपुढे नाही. दुसऱ्याला आपल्यापुढे वाकायला लावून काहीच साधत नाही. वाकायला लावणाऱ्याचा अहं वाढत जातो आणि वाकणाऱ्याच्या मनात कमीपणाची भावना ! 

आम्हाला तर आमच्या कोणी पाया पडले तर केवढा आनंद होतो ! आमचा अहम सुखावतो ! मला किती लोक नमस्कार करतात हे आपण इतरांना अप्रत्यक्षपणे दाखवून देतो आणि आपण किती मोठे आहोत हेही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात सगळेच असे असतात असे नाही. काही जण ज्यांच्या पुढे वाकावे किंवा नम्र व्हावे अशा योग्यतेचे असतातच !

या सगळ्या थोर व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, 'पद' माणसाला मोठे करत नाही, तर 'कर्तृत्व' आणि 'नम्रता' या गुणांमुळे माणूस मोठा होतो. कवी दत्ता हलसगीकर आपल्या कवितेत म्हणतात

​"आभाळाएवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडे खाली झुकावे,

मातीत मळले जन्म ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे..."

महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी तर ही 'उंची' प्रत्यक्ष जगून दाखवली. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण ते स्वतः मात्र गरिबांच्या झोपड्यांत जाऊन त्यांना 'उचलून धरण्याचे' काम करत राहिले. त्यांनी सत्तेच्या सावलीलाही स्पर्श केला नाही. तर दुसरीकडे साने गुरुजी यांनी आपल्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून समाजाला माणुसकीचे धडे दिले. त्यांनी कधीही राजकीय पदाची अभिलाषा धरली नाही, उलट मातीत मळलेल्या कष्टकरी वर्गाला स्वाभिमान मिळवून दिला.

​आज आपण पाहतो की, कोणत्याही छोट्या पदासाठी लोक एकमेकांचे पाय ओढतात. 'आधी सिद्धी आणि मग प्रसिद्धी' हे जीवनाचे सूत्र आहे. यशाचा मंत्र आहे. पण याचा विसर पडल्यामुळे केवळ नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी धावणारी माणसांची शर्यत दिसते. खरी श्रेष्ठता आधी 'सिद्ध' करण्यात असते. मग प्रसिद्धी आपोआपच मिळते. ' न मागे तयाची रमा होय दासी ' असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे खरोखरच 'उंची' असते, त्यांना ती ओरडून सांगावी लागत नाही; ती त्यांच्या नम्रतेतूनच झळकत असते.

 शिखरावर जाणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच वेळी पाय जमिनीवर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. कारण जमिनीवर पाय असतील तरच माणसाला दुसऱ्याची वेदना समजते आणि आकाशाचा आवाका उमजतो. या सगळ्या व्यक्तींच्या कवेत आकाश होते पण पाय मात्र जमिनीवर होते.

 कविवर्य बा भ बोरकर यांच्या ' लावण्यारेखा ' या कवितेतील या ओळी मला फार आवडतात. ते म्हणतात 

जीवन त्यांना कळले हो 

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१/१/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...