मुख्य सामग्रीवर वगळा

वाळवंटातील हिरवळ...

 उगवतीचे रंग 

वाळवंटातील हिरवळ...

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ' रिसेप्शन 'हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना बऱ्याच वेळा आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.  

' कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ' असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच वेळा ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या ! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात. 

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते. 

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग ! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात ? 

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर " काय ?कसे आहात ? खूप दिवसांनी भेटला " या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात  ( म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात ) मग्न होऊन जातो. 

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो. 

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो. 

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळी सारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच ! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच ! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१९/१/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...