मुख्य सामग्रीवर वगळा

हुशार बबू माकड

 *उगवतीचे रंग* 


( *आजचे उगवतीचे रंग खास छोट्या दोस्तांसाठी ! आपल्या घरातील लहान मुलांना जरूर वाचायला द्या किंवा वाचून दाखवा*.)


 *हुशार बबू माकड* 


उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडले होते. जंगलात सगळीकडे कोरडं कोरडं झालं होतं. पाणी मिळणं कठीण झालं होतं. जंगलातील पाण्याचे सगळे स्रोत आटले होते. हरणं, ससे, पक्षी आणि माकडं सगळेच तहानलेले होते. जंगलातील एका तलावात मात्र पाण्याचा भरपूर साठा होता.


एके दिवशी माकडांची एक टोळी पाणी पिण्यासाठी त्या तलावाकाठी आली.


“चला चला… आधी पाणी पिऊया,” टोळीचा म्होरक्या म्हणाला.


सगळी माकडं आनंदाने तलावातलं थंडगार पाणी प्यायला. पाणी पिऊन झाल्यावर सगळी माकडं जवळच असलेल्या जांभळीच्या झाडावर चढली. झाडावर भरपूर गोड जांभळं लागलेली होती.


या टोळीत बबू नावाचं एक छोटं माकड होतं. बबू खूप हुशार  होता पण तसाच खोडकरही...! जांभळीच्या झाडाची एक फांदी तलावावर झुकली होती आणि त्या फांदीला भरपूर जांभळं लागली होती. पण ती फांदी नाजूक आणि कमजोर होती.


“अरे बबू, फार टोकाला जाऊ नकोस!”


“ती फांदी कमजोर आहे!”


सगळी माकडं त्याला सांगत होती.


पण बबू कुठला ऐकतोय ?


“मला फांदीच्या टोकावरची ती मोठी, टपोरी गोड जांभळं  हवीत!” असं म्हणत तो झाडाच्या अगदी टोकावर गेला.


आणि सगळ्यांना जी भीती होती तीच खरी ठरली. मोठ्याने धपकन असा आवाज झाला


फांदी तुटली… आणि बबू थेट तलावात पडला!


तलावात चिखल होता, तुटलेल्या फांद्या होत्या.


बबू प्रचंड घाबरला.


तो हातपाय हलवत होता. तलावाच्या बाहेर येण्यासाठी त्याची धडपड सुरू होती.


“अरे बापरे! आता काय करायचं?”


खूप हातपाय मारून झाल्यावर तो कसाबसा एका मोठ्या दगडापर्यंत जाऊन पोहोचला.


तो खूप थकला होता. दम लागला होता.


थोडावेळ तो शांत बसला आणि विचार करू लागला. मग त्याला आईचे शब्द आठवले. आई त्याला सांगायची " बबू अरे ,कोणताही कठीण प्रसंग आला तरी घाबरायचं नाही. थोडा वेळ शांत बसायचं. शांत डोक्याने विचार करायचा मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच सुचतो."


“खरं आहे. घाबरून उपयोग नाही,” बबू मनात म्हणाला.


“आधी शांत व्हायचं… मग मार्ग सापडतो!”


आणि अचानक…


टक्!


त्याला एक युक्ती सुचली!


जांभळीचं झाड अगदी जवळच होतं. त्या झाडाची दुसरी एक मजबूत फांदी तलावावर झुकलेली होती.


बबूने एक मोठा श्वास घेतला. आणि घेतली झेप त्या फांदीकडे. जणू हनुमान उडीच ! आपल्या दोन्ही हातांनी फांदी घट्ट पकडून बबू आता झाडावर चढला होता.


“अरे वा बबू! शाब्बास!”


सगळी माकडं आनंदाने ओरडली.


बबूला आपली चूक कळली होती. तो म्हणाला,


“ मला माझी चूक कळली आहे. आता तुम्ही सांगितलेलं मी लक्षात ठेवीन. सगळी मोठी माणसं माझ्या हितासाठीच सांगतात हे मला आता कळलं आहे. "


मग सगळी माकडं एकत्र हसत-खेळत जंगलात निघून गेली.


© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 

२१/१/२०२६


 *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* 


( *कृपया कथा नावासहित अग्रेषित करावी* )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...