मुख्य सामग्रीवर वगळा

आपल्या काळात

 *उगवतीचे रंग*


*आपल्या काळात.....!*

मध्यंतरी एक सुंदर गोष्ट वाचनात आली होती. एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती असते. राहण्यासाठी प्रचंड मोठा राजवाडा . भरपूर नोकरचाकर. सर्व सुखे हात जोडून उभी. राजवाड्यात खेळण्यासाठी मोठे उद्यान , पोहण्याचा तलाव , धबधबा इ . गोष्टी. अशा या श्रीमंत माणसाला एकुलता एक मुलगा असतो. त्या मुलाला गरिबी म्हणजे काय,  भूक म्हणजे काय काही माहित नसते. अर्थातच माहिती असण्याचे काही कारणच नव्हते. एके दिवशी त्या श्रीमंत माणसाला असे वाटते की आपल्या मुलाला गरिबी म्हणजे काय हे कळले पाहिजे म्हणून तो त्याला एका छोटया गावात एका गरीब शेतकऱ्याकडे पाठवतो. आणि त्याला सांगतो तू आठ दिवस तेथे राहून सर्व निरीक्षण कर, ते लोक आपल्यापेक्षा किती गरीब आहेत हे बघ. 

त्याप्रमाणे तो मुलगा खेडेगावातल्या त्या गरीब शेतकऱ्याकडे जातो. पण तेथे जातो तर तो तिथल्या वातावरणात रमून जातो. परत आल्यावर आपल्या वडलांना तेथील वृत्तांत सांगताना तो म्हणतो.  " तुम्ही म्हणता ती माणसे गरीब आहेत. पण ती माणसे मोकळ्या हवेत,मोकळ्या वातावरणात राहतात. त्यांच्या घरात पंख्यांची गरज नाही. मोकळी हवा,उजेड त्यांच्या घरात आहे. रात्री झोपल्यानंतर त्यांच्या घरातून चंद्रताऱ्यांचे दर्शन होते. आपल्या महालातून तर वरचे छत फक्त दिसते,आपल्याकडे छोटासा तलाव आहे तर त्यांच्याकडे वाहणारी नदी आहे. ते रोज शेतातील पिकलेलेअन्न , ताज्या भाज्या, फळे सेवन करतात. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्याना कोणतेही औषध लागत नाही. तुम्ही म्हणता, ते गरीब आहेत. पण आपल्यापेक्षा तेच खरे श्रीमंत आहेत. त्यांची घरं  छोटी असतीलही पण मनं मोठी आहेत बाबा." मंडळी ही  गोष्ट पुरेशी बोलकी आहे. 


     वरील गोष्टीवर काही भाष्य करण्याऐवजी मी दलाई लामांचे एक पत्र आपल्यापुढे ठेवतो.  पत्र थोडं मोठं आहे पण जरूर वाचा. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते. त्यांचे हे जीवनदृष्टी व्यक्त करणारे सुंदर पत्र - 

आपल्या काळात...

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली;पण माणुसकीची कमी झाली का ?

     रस्ते रुंद झाले ; पण दृष्टी अरुंद झाली का ?

     खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली. घरं मोठी पण कुटुंबं छोटी.. 

     सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला. 

     पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग. 

     माहितीचे डोंगर जमले; पण नेटकेपणाचे झरे आटले . 

     तज्ञ् वाढले आणि समस्याही वाढल्या . औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं . 

     मालकीची भाषा वाढली;मूल्यांची कमी. 

     आपण बोलतो फार.... प्रेम क्वचित करतो... आणि तिरस्कार सहज करतो... 

     राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं . 

     आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली; पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही. 

     भले आपण चंद्रावर गेलो-आलो ;

     पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही. 

     आपण बाहेरचा परिसर जिंकत चाललो आहोत;पण आतल्या हरण्याचं काय ?

     हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा; पण आत्म्याच्या गुदमरण्याचे काय ? 

     आपली आवक वाढली; पण नीयत् कमी झाली. संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली . 

     हा काळ उंच माणसांचा; पण खुज्या व्यक्तिमत्त्वांचा . 

     उदंड फायद्यांचा ; पण उथळ नात्यांचा . 

     जागतिक शांतीच्या गप्पांचा; पण घरातल्या युद्धांचा . 

     मोकळा वेळ हाताशी; पण त्यातली गंमत गेलेली. 

     विविध खाद्यप्रकार ; पण त्यात सत्व नाही. 

     दोन मिळवती माणसं ; पण त्यांचे घटस्फोट वाढलेले. 

     घरं नटली; पण घरकुलं दुभंगली . 

     दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं ; पण कोठीची खोली रिकामीच. 

     हे पत्र तुमच्यापर्यंत पोहचवणारं तंत्रज्ञान आज आहे. 

     आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही ... या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं . 

     यातलं काही वाटलं तर बदला... किंवा... विसरून जा... 

© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 

*प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२*

( *कृपया लेख नावासह शेअर करावा )*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...