उगवतीचे रंग
एक अनोखा ज्ञानयज्ञ...
बाहेर प्रचंड थंडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोक अंगात स्वेटर चढवून घराच्या उबदार कोपऱ्यात विसावले आहेत. कुठे दूरचित्रवाणीवरील मालिकांचा आस्वाद घेतला जातोय, तर कुणी आपल्या मोबाईलच्या आभासी जगात व्यस्त आहे. पण अशा गारठलेल्या संध्याकाळीही चाळीसगावच्या एका कोपऱ्यात दोन-अडीचशे लोक आनंदाने एकत्र आले आहेत. निमित्त आहे एका आगळ्यावेगळ्या यज्ञाचे ! हा यज्ञ म्हणजे 'ज्ञानयज्ञ'. दररोज निरनिराळे वक्ते आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या समिधा या यज्ञात अर्पण करत आहेत आणि हे सुंदर दृश्य पाहायला मिळत होते चाळीसगाव येथील आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात, जिथे शेठ नारायण बंकट वाचनालयाची 'सरस्वती व्याख्यानमाला' काही दिवसांपूर्वी दिमाखात सुरू होती. तिची सांगता नुकतीच झाली आहे.
तब्बल ८७ वर्षे एखादा उपक्रम अव्याहतपणे चालवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्राला व्याख्यानमालांची मोठी परंपरा आहे. पुण्याची ऐतिहासिक 'वसंत व्याख्यानमाला', नाशिकची 'सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला' किंवा सांगलीची 'व्याख्यानमाला' ज्याप्रमाणे शहराची ओळख बनली आहे, त्याचप्रमाणे चाळीसगावची ही 'सरस्वती व्याख्यानमाला' आता उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरली आहे.
यंदाच्या व्याख्यानमालेत विषयांचे जे वैविध्य होते, त्याने श्रोत्यांना नक्कीच समृद्ध केले.
ठाण्याच्या डॉ. अरुणा टिळक यांनी आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून सोपे उपाय सुचवले. पुणे येथील मुक्तांगण परिवारातील माधव कोल्हटकर आणि मानवेंद्र जोगदेव यांनी व्यसनाधीनतेच्या सामाजिक प्रश्नावर परखड प्रबोधन केले. जळगावहून आलेले रामचंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य गुणांचे दर्शन घडवले, तर बारीपाडा येथील पद्मश्री चैतरामजी पवार यांच्या मुलाखतीतून त्यांच्या निस्पृह कार्याची गाथा समोर आली. जबलपूरच्या प्रशांतजी पोळ यांनी 'इंडिया ते भारत' या प्रवासातून देशाच्या प्रगतीचा गौरवशाली आढावा घेतला.
सातारा येथील प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी 'सुंदर जगण्यासाठी' लागणारे मौलिक विचार मांडले. मुंबईच्या अविनाश कोल्हे यांनी साहित्यिक व कलाकारांच्या आठवणी जागवल्या, तर नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी 'समकालीन जीवन वास्तव' प्रभावीपणे मांडले. 'बर्ड मॅन ऑफ ताडोबा' सुमेध वाघमारे यांनी पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून साक्षात जंगलच उभे केले, तर नाशिकहून आलेल्या प्रवीण मानकर यांच्या ७५ देशांच्या रोमांचक प्रवासाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वाचनालयाने या ज्ञानयज्ञाला कृतीची जोड दिली आहे. व्याख्यानांचे सुंदर वृत्तांत लिहिणाऱ्या 'उत्कृष्ट श्रोत्याचा' सन्मान करणे असो, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सुरू केलेली 'वाचक वीर योजना' असो किंवा मुलांसाठीची 'वाचन शिबिरे' असोत; शेठ नारायण बंकट वाचनालय केवळ माहिती देत नाही, तर सुजाण नागरिक घडवत आहे. यात फक्त एकच खंत जाणवली ती म्हणजे जी तरुणाई अशी व्याख्याने ऐकण्यासाठी उपस्थित राहायला हवी त्यांची संख्या अत्यंत अपवादात्मक आढळते.
पूर्वीच्या काळी कीर्तन-प्रवचनांतून जे संस्कार मिळायचे, तेच कार्य आज ही व्याख्यानमाला करत आहे. या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना या ओळी आठवतात:
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!"
हे 'देणे' केवळ पैशांचे नसून विचारांचे आहे. जेव्हा एक वक्ता आपले आयुष्यभराचे ज्ञान दीड तासात देतो, तेव्हा तो समाज घडवत असतो. चाळीसगावचा हा ८७ वर्षांचा अखंड ज्ञानयज्ञ असाच तेवत राहो, हीच सदिच्छा!
"ज्ञान हाच मानवाचा खरा डोळा आहे आणि वाचन हे त्या डोळ्याचे तेज आहे."
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/१/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा