मुख्य सामग्रीवर वगळा

फुले वेचिता बहरू...

 उगवतीचे रंग

फुले वेचिता बहरू…

माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळीयासी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली!

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध...! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे !

आपण अनेकदा देण्यात थांबतो.आता पुरेसे दिले, आता माझा वाटा संपला असे म्हणत. पण निसर्ग मात्र कधी थकत नाही. फुले वेचली तरी तो पुन्हा बहरतो. झाडावरून फुले काढली, तरी ते रुसत नाही; उलट नव्या कळ्यांना उमलण्याची संधी देते. देताना त्याला अपेक्षा नसते. नाही मोबदल्याची, नाही कौतुकाची. त्याशिवाय ते हातचं राखून देत नाही. आपली ओंजळ अपुरी पडते.

कुंदाला वास नसतो, असे आपण म्हणतो. पण खरंच नसतो का? की आपण वासाच्या शोधात असताना सौंदर्य पाहायचे विसरतो? शुभ्र पाकळ्या, नितळ रूप, साधेपणा—हे सारे पाहिले की मन आपोआप प्रसन्न होते. देवाला वाहिले तरी तो प्रश्न करत नाही, “ मला सुगंध का नाही ? ” गजऱ्यात गुंफले, हार केला तरी फुले आढेवेढे घेत नाहीत. केवढी ही स्थितप्रज्ञता ! हे शिकायला गीताच वाचली पाहिजे असे काही नाही. निसर्ग आपल्याला त्याच्या कृतीतूनही शिकवत असतो. 

कुंदाच्या फुलांना त्यांच्या अस्तित्वातच समाधान असते. त्यांनी आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलेले असते. मोगऱ्याच्या फुलांसारखा आपल्याला वास नाही म्हणून ते स्वतःला दुःखी करून घेत नाहीत. ते प्रसन्नच असतात नेहमी आणि त्यांच्याकडे मन भरून पाहणारा देखील प्रसन्न होतो. या फुलांकडून आपल्यालाही शिकायला मिळते. आपल्यात असलेले गुण, सौंदर्य, सामर्थ्य हे दाखवण्यासाठी गाजावाजा कुठे आवश्यक असतो ? सुगंध नसला तरी चालतो, रूप नितळ असेल तर पुरेसे आहे. कुणी देवासाठी वापरले, कुणी सजावटीसाठी...फुलांचे काही म्हणणे नसते; आपण मात्र लगेच माझा वापर कसा केला गेला याचा हिशेब मांडायला लागतो.

कुंदाच्या झाडाकडे पाहताना वाटते, आपणही असेच असावे. कुणी आपल्याकडून घेतले तरी न रुसता पुन्हा पुन्हा द्यावे. कौतुक न झाले तरी बहरणारे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो; आपण त्यातून प्रसन्नता घ्यायची की आपल्याच दुःखाला कवटाळून बसायचं हा आपला प्रश्न आहे.

अंगणातले ते शुभ्र चांदणे संध्याकाळपर्यंत मनात साठवून ठेवले. फुले सुकतील, गजरे विस्कटतील; पण त्या फुलांनी दिलेली शांती, प्रसन्नता मात्र टिकून राहील. आणि ती टिकवून ठेवणे आपल्यावर असते. आपलं आयुष्यही असंच असतं ना ! थोडे देणे, थोडे बहरणे आणि उरलेल्या कळ्यांसाठी जागा ठेवणे!

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/१/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...