उगवतीचे रंग
माहेरओढ
परवा सहज योगप्रकाशचा डिसेंबर २०२५ चा अंक चाळत होतो. त्यावेळेस संपादकीय वाचताना ' माहेरओढ ' हा शब्द वाचनात आला आणि या शब्दाबद्दल एक वेगळंच कुतूहल आणि ओढ वाटायला लागली. ' माहेरओढ ' किती सुंदर शब्द ! तसे माहेरची ओढ हे शब्द आपल्याला माहिती आहेत पण ते जोडून माहेरओढ हा सुंदर शब्द तयार झाला. हा शब्द जरा वेगळाच वाटला. उच्चारातच माया आहे, ओढ आहे, आणि आठवणींचा एक लपलेला कप्पा उघडणारी ताकद आहे.
' माहेर ' हा शब्द उच्चारताच असंख्य आठवणींचं मोहोळ आपल्या मनात जागं होतं. मनाच्या आकाशात असंख्य आठवणींची गर्दी जमू लागते आणि अनेक सुंदर, भावविभोर करणारी गाणी नकळत ओठांवर येतात...
“ घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात,
माहेरी जा सुवासाची कर बरसात…”
सासरी असलेल्या एखाद्या मुलीला खूप दिवसात माहेरी जायला होत नाही. मग खेड्यामधले घर कौलारू अशी गाणी तिच्या ओठांवर नकळत येतात. तिच्या मनात मग खेड्यातलं कौलारू घर, अंगणातली तुळस, विहिरीवरचं पाणी, आणि मायबापाच्या मायेचा ओलावा अशा आठवणी एकामागून एक दाटून येतात. त्या आठवणींनी ती हळवी होते, डोळ्यांत नकळत पाणी तरळतं. म्हणूनच बहिणाबाई चौधरी आपल्या एका कवितेत अत्यंत मार्मिकपणे म्हणतात—
" ऐक ऐक साधुबोवा, काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.”
एवढ्या थोड्या शब्दांत माहेरची ओढ, आईची माया आणि लेकीचं हळवं नातं त्यांनी उलगडून दाखवलं आहे. असं किती आणि काय सांगावं…!
माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं. ती एक अशी जागा असते जिथे आपण मनमोकळं, हवं तसं वागू शकतो. तिथे आपल्याला काही सिद्ध करावं लागत नाही, जपून वागावं लागत नाही. आपण जसे आहोत तसे स्वीकारलं जातं. म्हणूनच माहेरची ओढ ही केवळ भौगोलिक अंतराची नसतेच; ती मनाची असते. माहेरओढ हा शब्द त्या भावनेला अधिक नेमकं, अधिक हळवं रूप देतो.
आपण सहसा माहेर म्हटलं की स्त्रीचाच विचार करतो. पुरुष कधी बोलून दाखवत नाही पण माहेरची ओढ त्यालाही असतेच! पुरुषाला आणि माहेराची ओढ ? होय, खरं सांगायचं तर पुरुषालाही माहेर असतंच. कुणासाठी आपलं आजोळ म्हणजे माहेर असतं. बालपणच्या अनेक आठवणी त्याच्याशी निगडित असतात. जिथे आजीच्या पदरात लपलेली बालपणाची सुरक्षितता आजही तशीच शाबूत असते. कुणासाठी शाळेचं गाव, कुणासाठी कॉलेजचं वसतिगृह, तर कुणासाठी जिवलग मित्रांचं घर… जिथे गेल्यावर ‘ मी कोण आहे ’ हे सांगावं लागत नाही, ती जागा नकळत माहेर बनते. तिथे गेल्यानंतर एक प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला आपसूकच बहाल केलं जातं आणि तुम्ही माहेरी येता !
संतांच्या अभंगांमधलं पंढरपूर तर माहेरओढीचं सर्वोच्च रूप आहे. म्हणूनच संत म्हणतात-
माझे माहेर पंढरी... आहे भिवरेच्या तीरी...
वारकरी वर्षभर संसाराच्या ओझ्यात अडकलेला असतो; पण आषाढ आला की पायांना पंढरीची आणि मनाला विठ्ठलाची ओढ लागते. “ पंढरीस जावे ” ही फक्त एक इच्छा नसते, ती एक हाक असते मनाच्या आतल्या गाभाऱ्यातून आलेली ! पंढरीला गेल्यावर आपण फक्त दर्शनासाठी आलो आहोत असं वाटतच नाही तर आपण आपल्या घरी आलो आहोत असं वाटतं. म्हणून तर आपण त्या विठ्ठलाला ' विठूमाऊली ' म्हणतो. परमेश्वर हा आई आणि बाप सगळं काही आहे. म्हणूनच त्याचंही माहेर असू शकतं, ही भावना म्हणजे आपल्या संस्कृतीचं आगळवेगळं वैशिष्ट्य !
माहेरओढ ही केवळ माणसांपुरती मर्यादित नसते. काही ठिकाणं आपल्याला पुन्हा पुन्हा खेचत राहतात. एखादा नदीकाठ, एखादं डोंगरातलं गाव, समुद्राचा किनारा, किंवा शहरातली एखादी जुनी गल्ली… आपण तिथे आधीही गेलो असतो, पुन्हा जाणार हे माहीत असतं, तरीही त्या जागेची ओढ संपत नाही. त्या ठिकाणांनी आपल्या आयुष्यातील अनेक आनंदी क्षण जपून ठेवलेले असतात.
कधी कधी ही माहेरओढ माणसांची असते. ती माणसं भेटावी असं वाटत राहतं. एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर मन मोकळं होतं, हसू सहज बाहेर पडतं आणि वेळ कसा जातो कळत नाही. असा सहवास म्हणजेही एक प्रकारचं माहेरच, नाही का ? तिथे मुखवटे लागत नाहीत, अभिनय लागत नाही. आपला सगळा थकवा, ताणतणाव दूर होतो.
माहेरओढ म्हणजे भूतकाळात अडकून राहणं नव्हे. उलट, आयुष्याच्या धावपळीत आपण जेव्हा जेव्हा हरवतो, थकतो, तेव्हा ही ओढ आपल्याला आपल्या मुळाशी पुन्हा जोडून ठेवते. मी कुठून आलो आहे याची आठवण करून देते आणि त्यामुळेच पुढे जाण्याचं बळ मिळतं.
कदाचित म्हणूनच माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, तरी त्याच्या मनात कुठेतरी एक हळवी हाक सतत घुमत असते. तीच हाक म्हणजे माहेरओढ.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/१/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा