उगवतीचे रंग
सुख पर्वताएवढे!
सध्या थंडीचे दिवस आहेत. परवाचीच गोष्ट ! मी बाहेर माझ्या पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून पेपर वाचत बसलो होतो. कोवळे, सुखद आणि उबदार ऊन अंगाला सुखावत होते. माझ्या मनात सहज विचार आला की मी किती भाग्यवान आहे ! कोवळ्या उन्हात बसण्याचं हे सुख अनुभवतो आहे. काही काही सुखांची पैशात तुलना करता येत नाही. पैसे देऊनही असे सुख विकत घेता येणार नाही. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधं हे उन्हात बसण्याचं सुख देखील अनुभवता येत नाही. या छोट्याशा परंतु मौल्यवान सुखाला ते पारखे झाले आहेत. कोणाच्या घरात ऊनच येत नाही तर कोणाला उंचच उंच इमारतींमुळे सूर्यदर्शन घडत नाही. कामाच्या धावपळीत अनेकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कोणी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असतो तर कोणी फायलींच्या ढिगार्यात.
संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे'. पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आणि मानत आलो आहोत. पण कधीकधी वाटतं, आपण दुःखाच्या पर्वताकडे इतकं टक लावून पाहतो की, हाताच्या तळव्यावर असलेल्या 'जवा'एवढ्या सुखाच्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो. आणि या दुःखाच्या जाणिवेने आपण विनाकारण स्वतःला गंभीर करून घेत असतो. खरंतर, जर आपण जीवनाकडे डोळस दृष्टीने पाहिलं, तर लक्षात येईल की आपण ज्याला ' जवा 'एवढं म्हणतोय, ते सुख खरं तर पर्वताएवढं विशाल आहे. सुख ही अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही चलनात मोजता येणार नाही. सुख आणि समाधान विकत मिळत नाही, ते फक्त ' अनुभवावे ' लागते.
आपण अनेकदा सुखाची व्याख्या ' वस्तूंमध्ये ' शोधत असतो. आपण जर कुणाला त्याला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करायला सांगितली, तर बहुतेकांच्या यादीत मोठी गाडी, आलिशान बंगला, गडगंज संपत्ती हीच नावे येतील. पण खरंच असं असतं का ? जर संपत्तीतच आनंद असता, तर जगातले सर्व श्रीमंत लोक सर्वात आनंदी दिसले असते. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. पैशाने सुविधा विकत घेता येतात, पण समाधान नाही. बिछाना विकत घेता येतो, पण शांत झोप नाही.
खरा आनंद कुठे असतो? तो साध्या साध्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. बाहेर सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत असताना आणि पेपर वाचत असताना बायकोने प्रेमाने वाफळलेला चहाचा कप समोर ठेवावा, त्याचा आस्वाद घ्यावा. तो केवळ चहा नसतो. त्यात असतं प्रेम आणि काळजी ! आपल्या माणसाची. आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचताना त्यात पूर्णपणे हरवून जावं. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना सगळे मुखवटे काढून ठेवून काळ-वेळ विसरावा. लहान मुलांच्या खेळात रमून स्वतःही बालपण अनुभवावं. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवावा. आपलं आवडतं एखादं गाणं ऐकावं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रचंड ऊर्जा देणाऱ्या असतात.
पण या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे आपण पाहतो का ? बऱ्याच वेळा आपण उजळणी करतो ती दुःखाच्या क्षणांची. हा माझ्याशी असं वागला, तो मला असंच बोलला, हीच का माझ्या उपकारांची परतफेड... असे विचार करून आपण स्वतःला दुखी करून घेत असतो. पण जीवनात पदोपदी येणारे हे सुखाचे छोटे क्षण आपण डोळे भरून पाहतो का ? त्यांचा आनंद घेतो का ? हे सुखाचे छोटे छोटे क्षण जेव्हा आपण एकत्र करतो, तेव्हा सुखाचा एक भलामोठा पर्वत उभा राहतो.
पाऊस पडून गेल्यावर पानांवर पडलेला पाण्याचा थेंब जसा सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखा चमकतो, तसंच आपलं आयुष्य आहे. फक्त आपली दृष्टी 'डोळस' हवी. ज्या दिवशी आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि आनंद दिसायला लागेल, त्या दिवशी आपल्याला जाणवेल की, दुःख कदाचित तात्पुरतं असेल, पण 'सुख' हे खरोखरच पर्वताएवढं अथांग आणि विस्तीर्ण आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं एक गाणं आहे. पण खरोखरच सुख म्हणजे नक्की काय ते शब्दात सांगता येणं कठीण आहे कारण ती अनुभवण्याची गोष्ट असते.
चिनी आणि जपानी संस्कृतीतील एक सुंदर कल्पना आहे. ते लोक एकमेकांना शुभेच्छा देताना " तुम्हाला सर्व सहाही सुखे प्राप्त होवोत " असे म्हणतात. यातली पहिली पाच सुखे म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार आणि चांगली मुले ही आहेत. तर सहावे सुख म्हणजे वैयक्तिक गोष्ट आहे हे सुख प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते ते ज्याचे त्याने शोधून काढावे लागते असाच आपल्या जीवनातील आनंद देखील आपल्याला शोधता आला पाहिजे तेच आपले सहावे सुख असू शकेल !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/१/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा