मुख्य सामग्रीवर वगळा

आपण आहोत तोवर...

उगवतीचे रंग 

आपण आहोत तोवर...

दिवाळी सुरू आहे. काल नरक चतुर्दशी होती. भल्या पहाटे एका जवळच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या,“ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ” आणि लगेचच थोड्या खिन्न स्वरात म्हणाले, " आता सकाळी लवकर उठणारी, पहाटे अभ्यंग स्नान करणारी बहुदा आपलीच पिढी आहे. कारण मुलांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याचे महत्त्व नाही. त्यांची कारणे वेगळी असतात."

" बरोबर आहे "मी म्हणालो. त्यांनी फोन ठेवला पण ते जे काही म्हणाले त्यावर माझे मन विचार करू लागले. खरंच, आपणच ती पिढी आहोत जी अजूनही पहाटे उठून उत्साहाने या सगळ्या गोष्टी करते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच वाजताच रेडिओवर कीर्तन लागायचे ते ऐकूनच जाग यायची. एक वेगळाच उत्साह असायचा. आपल्याकडे घरात वृद्ध आई असेल तर ती अजूनही आपल्याला लवकर उठवते. आपण सगळे उत्साहाने उठतो. आंघोळीपूर्वी अंगाला सुगंधी तेल लावतो. अंघोळ करताना सुगंधी उटण्याचा खरखरीत स्पर्श अनुभवतो, अंगणात दिवे लावतो, देवघर उजळवतो. घराघरात अजूनही आई-वडील, आजी-आजोबा यांचे प्रेमळ स्वर आणि त्यांच्या पावलांचा नाद ऐकू येतो. देवाला नमस्कार केल्यानंतर त्यांना नमस्कार करतो. मागच्या पिढीने आपल्याला सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाळतो आहोत. पण पुढच्या पिढीचे काय ? ते जपतील का या परंपरा ?

माझी सौ. मला नेहमी म्हणते, “ अहो, आपण आहोत तोपर्यंत हे सणवार टिकतील. पुढचं काही सांगता येत नाही.” तिचं म्हणणं खरं आहे. आपली पिढी अजून काही प्रमाणात तरी परंपरा जपते आहे. पण असं वाटतं की आजच्या पिढीसाठी दिवाळी म्हणजे बहुधा ऑफर्स, सेल्स आणि रील्सचा सण ! 

एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती ही की 
नातेसंबंध टिकवून ठेवणारी, संपर्क साधणारी, सणाच्या दिवशी “ तुम्ही कसे आहात ?” हे विचारणारी अजूनही आपलीच पिढी आहे. आपल्या नातेवाईकांशी संबंध जपणं, त्यांचं सुख-दुःख विचारणं हे आपल्याला आपल्या संस्कारांनी दिलं आहे.
पण पुढची पिढी जपेल का हे मायेचे आणि प्रेमाचे हळुवार बंध ? ही शंका कधी कधी मनाला बेचैन करते.

आपण अपेक्षा करतो त्यांच्याकडून पण त्यांचीही काही एक बाजू असू शकते. कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही.
किंवा त्यांना तसं गरजेचं वाटणारही नाही.
कारण त्यांच्या आयुष्यात गती आहे, कामाचा ताण आहे, स्पर्धा आहे. जगण्याची व्याख्या वेगळी होत चालली आहे.
त्यांच्याकडे एकमेकांशी जोडणारं वेगवान नेटवर्क आहे, पण नात्यांचंजाळं विरळ होत चाललं आहे.


आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा डोळ्यांतले भाव बोलतात. फार काही सांगावं लागत नाही. स्पर्शाची भाषा खूप बोलकी असते. पाठीवरचा आश्वासक हात, प्रेमळ मिठी सगळं काही सांगून जातात. पण पुढच्या पिढीची भाषा स्क्रीनवर इमोजीमध्ये व्यक्त होताना दिसते आहे. कधी कधी प्रश्न पडतो की आपले हे संस्कार, परंपरा कायम राहतील का ? की हा एक इतिहास बनून जाईल ?

पण मी याबाबत आशावादी आहे. काळया ढगाला एक रुपेरी किनार असते. तसाच हा आशावाद ! मला वाटतं सगळं नाहीसं होणार नाही. परंपरा आणि नाती दोन्ही हळुवार धाग्यांनी काळाशी जुळत राहतात. आजची पिढी कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या माध्यमातून हे सण साजरे करेल हे नक्कीच. पण जर त्या उत्सवात आपुलकीचा एक दिवा तरी पेटला, तर या आपल्या उज्वल परंपरांचा प्रकाश कमी होणार नाही.

पण फक्त असं म्हणून भागणार नाही. स्वस्थ बसून चालणार नाही. आपण आहोत तोवर ही परंपरा जिवंत ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. ही करताना आपण पुढच्या पिढीला इतकंच सांगायचं की बाळांनो,
सण साजरा करणं म्हणजे फक्त विधी किंवा औपचारिकता नव्हे. सण म्हणजे नात्यांना उजाळा देण्याची, आजच्या भाषेत सांगायचे तर नातेसंबंध रिन्यू करण्याची सुवर्णसंधी आहे.”

आणि आता ही संध्याकाळ येते आहे. आपण हातात दिवे घेऊन उभे आहोत, त्यांच्या ज्योती अजूनही प्रकाशमान आहेत. हा प्रकाश आपण उपभोगला, आता तो वारसा पुढे द्यायचा आहे. आपल्या हातातील हे दिवे, हा प्रकाश पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे.
त्यांच्या हातात तो गेला की, आपल्या जगण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

मग आपल्याला म्हणता येईल - 

दिवे लागले रे दिवे लागले 

तमाच्या तळाशी दिवे लागले.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२१/१०/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...