मुख्य सामग्रीवर वगळा

संगीत राजकारण संन्यास

उगवतीचे रंग 

संगीत राजकारण संन्यास 

स्थळ : मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल. राजकारणातील मान्यवर परंतु राजकारणाला कंटाळलेले तीन आमदार इथे एकत्र आले आहेत. तिघेही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदार संघातूनआलेले आहेत. तिघांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते आहे. टेबलवर रिकामे ग्लास आणि बाटल्या दिसत आहेत. अर्धवट भरलेल्या खारे काजू आणि शेंगदाण्याच्या डिशेस पडल्या आहेत.

त्यांच्यापैकी एक जण वेटरला बोलावून..

" हे पहा, आम्ही आता महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आमची चर्चा सुरू असताना कोणत्याही कारणाने मध्ये यायचे नाही. आम्ही बेल वाजवली किंवा बोलावले तरच यायचे. विनाकारण मध्ये आलास तर गय करणार नाही. तंगडी तोडून हातात देऊ. काय, लक्षात आले ना ?"

" होय साहेब, आता तुम्ही बोलावले तरच आम्ही मध्ये येऊ. काही लागले तर सांगा. " असे म्हणून तो घाईने निघून जातो.

सर्जेराव: खऱ्याची दुनिया अजिबात राहिली नाही. मला तर या राजकारणात कंटाळा आला आहे. 

विलास : काय झालं ते जरा मला इसकटून सांगाल का. 

सर्जेराव: त्यासाठीच तर इथे आलो ना भाऊ. कोणाला सुगावा लागू दिला नाही आम्ही कुठे जातो आहोत ते. 

अर्जुन : मग सांगा की नेमकं काय झालं आहे ? तुम्हाला असं वाटत असेल की फक्त आपणच चिंतेत आहोत. पण तसं नाही आम्हाला सुद्धा काळजी लागून राहिली आहे.

सर्जेराव : तर मग ऐका. एखाद्या वेळेस एखाद्या सभेत माझ्या तोंडून काही निघून गेला असेल पण माझा उद्देश वाईट नव्हता. पण खरं बोललो तर कोणाला आवडलं नाही. हे पत्रकार ' ध ' चा ' मा ' करतात. माझ्यावरच लोकांनी टीका केली. माझं खातं गेलं. लोकांमध्ये बदनामी झाली ती वेगळीच !

अर्जुन : भौ, तुमचं तर फक्त खातं गेलं, माझं तर मंत्रीपदच गेलं, त्याचं काय ? आता माझ्या आणि त्या खुनाचा काही संबंध आहे का ? कोणी माझ्या नावावर गुंडगिरी करत असेल तर त्यात माझा काय दोष ? पण तुम्ही म्हणता ते बरोबर. हल्ली खऱ्याची दुनिया राहिली नाही. 

विलास : आता लक्षात आला तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते. बरं झालं मी मंत्री नाही झालो ते. पण आमदारकी सुद्धा किती दिवस शाबूत राहील काही सांगता येत नाही. कधीही पक्षातून हकालपट्टी होऊ शकते. लोकांच्या भल्यासाठी काही चांगलं करायला गेलं की असं अंगाशी येतं.

सर्जेराव : भाऊ, या सगळ्यावर एकच उपाय मला दिसतो आहे.

विलास आणि अर्जुन ( एका सुरात ) : कोणता ?

सर्जेराव : आता या राजकारणातून बाजूला व्हायचे आणि दुसरा काहीतरी धंदा सुरू करायचा. 

विलास आणि अर्जुन काही बोलत नाहीत. डोकं खाजवतात. 

विलास : तुमच्या डोळ्यापुढे दुसरं काही नक्की आहे का ?

सर्जेराव : ते लिट फेस्ट का बुक फेस्ट काय म्हणतात ना ते आपण भरवायचं. 

अर्जुन : म्हणजे काय साहित्य संमेलन वगैरे ..?

सर्जेराव : छे छे आता साहित्य संमेलनाला कोण विचारतो ? हे बुक फेस्ट म्हणजे नवी कल्पना आहे. जयपुर वगैरे शहरात आतापर्यंत ते भरत आलंय आणि पुण्यामध्ये काही वर्षापासून भरत आहे. 

विलास : पण ते आपलं काम नाही. आपल्याला त्यातलं काय कळतंय ?

सर्जेराव : तुम्ही ऐका तर खरं मी काय सांगतो ते. अहो गेल्यावर्षी या कार्यक्रमाला पुण्यामध्ये दहा लाख लोकांनी भेट दिली आणि ४० कोटी रुपयांची विक्रमी पुस्तक विक्री झाली. आहात कुठे महाराजा ? 

अर्जुन : बरं मग आपण काय करायचं ?

सर्जेराव : आपण हा कार्यक्रम हायजॅक करायचा त्यांच्याकडून. आपणच भरवायचे हे बुक फेस्ट. आपण हा शो हायजॅक केला तर बघा येणारे दहा लाखाचे कसे वीस लाख मग तीस, चाळीस होतात ते. भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, कोणतेच आरोप नाहीत, ना मंत्रिपद जाण्याची भीती. उलट लोकांमध्ये आपली प्रतिष्ठा वाढेल. वाचन संस्कृतीला हातभार लावण्याची श्रेय लोक आपल्याला देतील. प्रवेशद्वाराजवळ आपले मोठमोठे कट आउटस लावायचे. लोक त्याच्याजवळ सेल्फी घेतील. आणि सध्या हा बुक फेस्ट फक्त पुण्यात भरतो पण आपण तो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करायचा. नागपूर, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर. काय, कशी वाटते कल्पना ?

विलास : भाऊ कल्पना तर चांगली वाटते. कुठलंच टेन्शन नाही. पैसे वाटायचं नाही की निवडून यायचं टेन्शन नाही. शिवाय तिथे निरनिराळे स्टॉल्स आपण लावायचे. खाद्यपदार्थ, खेळणी, मुलांचे खेळ, रोजच्या लागणाऱ्या वस्तू. त्यांच्या विक्रीतूनही आपल्याला भरपूर नफा मिळेल. शिवाय रमी वगैरे सारखे पत्त्यांचे खेळ आयोजित करता येतील. 

अर्जुन : काही हरकत नाही. माझा या योजनेला पाठिंबा आहे. या आयोजनासाठी कोणी आडकाठी आणली तर सांगा. माझ्याकडे भरपूर माणसे आहेत काही गरज लागली तर त्यांचा वापर करता येईल. 

सर्जेराव : मग ठरलं तर. राजकारण आता आपल्या योग्य राहिलं नाही, चांगल्या माणसांचं काम नाही. म्हणून आपण राजकारण संन्यास घेऊया. फक्त आपलीही योजना कोणाला सांगू नका म्हणजे झालं.

सर्जेराव उठून एक गाणं गाऊ लागतात...

गीत नवे गाऊ, आता गीत नवे गाऊ...

विलास आणि अर्जुन पण उठून उभे राहतात आणि आता तिघे मिळून गाऊ लागतात 

गीत नवे गाऊ, आम्ही गीत नवे गाऊ 

राजकारण नकोच आता, खेळ नवा भाऊ

गीत नवे गाऊ, आम्ही गीत नवे गाऊ.

गुंडगिरीला, मारहाणीला तिलांजली देऊ 

गीत नवे गाऊ, आम्ही गीत नवे गाऊ.

राजकारण सोडून आता पुस्तक हाती घेऊ 

गीत नवे गाऊ, आम्ही गीत नवे गाऊ.

बुक फेस्ट साठी आता आमचे फुरफुरती बाहू 

गीत नवे गाऊ, आम्ही गीत नवे गाऊ.

तिघेही वेटरला बक्षिसी देऊन बाहेर पडतात. वेटर त्यांच्या या बदललेल्या रूपाकडे पाहतच राहतो !

( हा लेख पूर्णपणे काल्पनिक असून त्याचे कोणत्याही व्यक्तीशी वा घटनेशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२०/१०/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...