मुख्य सामग्रीवर वगळा

आम्ही कधी शहाणे होणार ? फटाक्यांचे भीषण वास्तव.

 उगवतीचे रंग 

आम्ही कधी शहाणे होणार ? फटाक्यांचे भीषण वास्तव 

दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि ऐश्वर्याचा सण. काळोख्या रात्रीत दीपमाळा उजळतात, घराघरात फराळाच्या पदार्थांचा खमंग दरवळ, मिठाई आणि हसरे चेहरे दिसतात. पण या सर्व आनंदाच्या मागे एका प्रश्नाचा काळाकुट्ट धूर हवेत तरंगत असतो. आणि तो म्हणजे आपण नक्की आनंद साजरा करतोय का, की प्रदूषण वाढवतोय?

या दिवाळीत आपण भारतीयांनी साधारणपणे किती रुपयांचे फटाके फोडले असतील ? काही अंदाज ? दहा वीस कोटी, पन्नास शंभर कोटी रुपयांचे ? छे ! परवाच्या पेपरमध्ये मी बातमी वाचली आणि मोठाच धक्का बसला. आपण या दिवाळीत सात हजार कोटी रुपयांचे फटाके फोडले म्हणजेच सात हजार कोटी रुपये चक्क धुरात घालवले किंवा त्यांचा धूर केला. ही तर पेपरमध्ये दिलेली रक्कम पण खरंतर यापेक्षाही कितीतरी अधिक रकमेचे फटाके फोडले गेले असतील. केवढी मोठी ही रक्कम ! या रकमेत काय होऊ शकले नसते ? एखादा उत्तम असा लोककल्याणाचा प्रकल्प, उत्तम अशा प्रकारची बेकारांसाठी किंवा गरिबांसाठीची योजना, सर्वसामान्यांना अल्प दरात आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल्स यासारख्या अनेक गोष्टी होऊ शकल्या असत्या. शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याच्या योजना राबवता आल्या असत्या. पण लक्षात कोण घेतो ?

यावर बरेच व्यक्तिवाद होऊ शकतील. लोक म्हणतील अशा योजना तयार करणे हे सरकारचे काम आहे. आम्ही त्याचा विचार का करावा ? आम्ही सण साजरे करायचे नाहीत का ? आमचे आमची हौस मौज पुरवायची नाही का ? हे सगळे तसे पाहिले तर बरोबर आहे. पण जेव्हा एक बोट आपण समोरच्याकडे दाखवतो तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात. पण हा देश आपला आहे, आपण राहतो ते पर्यावरण आपले आहे, श्वास घेतो ती हवा, आपण पितो ते पाणी, आपण राहतो ती वस्ती किंवा तो भाग या सगळ्या गोष्टी आपल्या नाहीत का ? भारत माझा देश आहे हे फक्त प्रतिज्ञा करण्यापुरतेच म्हणायचे का ?

अलीकडे पर्यावरण प्रदूषित होते आहे म्हणून आपण ओरड करतो. विद्यार्थ्यांना शाळेत पर्यावरण विषय शिकवला जातो. पर्यावरण रक्षण करण्याचे धडे शाळेतून दिले जातात. त्यासाठी वृक्षारोपण करण्यावर भर दिला जातो. पर्यावरणाचे आपापल्या परीने का होईना परंतु रक्षण करावे म्हणून आपण सौर ऊर्जेवर भर देतो, विजेवरील वाहने वापरणे सुरू करतो. पण हे सगळे करत असताना जेव्हा सण येतात तेव्हा आपली ही पर्यावरण रक्षणाची जाणीव कुठे लुप्त होते ? तिचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो का ?

फटाक्यांच्या प्रचंड प्रदूषणामुळे मुंबई दिल्ली सारख्या अनेक मोठमोठ्या शहरांचीच नव्हे तर अनेक छोट्या गावांची हवा देखील प्रदूषित झाली आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे आणि हवेच्या प्रदूषणामुळे अनेकांना आपली दारि खिडक्या लावून घरात कोंडून बसावे लागले आहे संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडण्याची सोय नाही किंवा सहजपणे कुठल्या कामासाठी बाहेर जायचे असेल तरी आपल्याला सुरक्षित वाटत नसते अशी परिस्थिती निर्माण होते. फटाक्यांच्या दोरातून धुरातून निर्माण झालेला विषारी वायू थेट फुफ्फुसापर्यंत जाऊन दमा, हृदयरोग आणि श्वसनाचे अनेक आजार निर्माण करतो. फटाक्यांच्या धुरामुळे त्रास झालेल्या माणसांमुळे अनेक दवाखान्यांमध्ये या काळात प्रचंड गर्दी झाली आहे. श्वसनाचे आजार डोळ्यांचे आजार कमी ऐकू येणे यासारख्या अनेक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. 

अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्याच्या बातम्या आल्या. अनेक लहान मुलांना त्यामुळे भाजले. अशा अनेक गोष्टी होत असताना देखील आपण जोपर्यंत मला काही होत नाही तोपर्यंत मला काय त्याचे अशी भूमिका घेऊन तोंडात गुळणी धरून गप्प बसून राहतो. 

खरे तर पर्यावरण पूरक सण हे भारतीय संस्कृतीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य. पण आम्ही सणांचा मूळ उद्देशच विसरून चाललो आहोत की काय असे वाटावे अशी परिस्थिती हल्ली निर्माण होत आहे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव म्हणजे ढोल ताशे, डीजे, लाऊड स्पीकर यासारख्या अनेक वाद्यांमुळे निर्माण झालेले प्रचंड ध्वनीप्रदूषण असे समीकरण झाले आहे सर्वसामान्यांना या काळात रस्त्यावर फिरण्याची चोरी होते, घरात बसणे कठीण होते परंतु राजकीय नेते यावर बोलण्याऐवजी अशा प्रकारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उत्तेजनच देताना दिसतात. खरे तर अशा बाबतीत जनजागृती करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य ! स्वातंत्र्यपूर्व काळात असे राजकीय नेते होते की ज्यांनी जनजागृतीवर भर दिला आणि अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. परंतु तो विवेक, ते शहाणपण हल्ली दिसत नाही.

खरंतर आपला प्रत्येक सण आनंदाचा असावा आणि तसा तो असतोच म्हणजे आपल्या पूर्वजांनी तोच उद्देश ठेवून या परंपरा आपल्यासमोर ठेवल्या. सण संपल्यानंतर आपण एका नवीन उत्साहाने आणि चैतन्याने आपल्या कामाला लागावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय होते ? सण संपल्यावर शहर थकलेलं दिसतं — हवेत धूर, फुफ्फुसात वेदना, आणि निसर्गाच्या चेहऱ्यावर राखाडी सावली. माणसांची अशी अवस्था होते तर ज्यांना बोलता येत नाही अशा बिचार्‍या प्राणी, पक्षी आणि वृक्षवेली यांची अवस्था कशी होत असेल ? त्यांची मूक भाषा कोणी समजून घ्यायची ? 

केवळ फटाक्यांवर एवढे पैसे खर्च करून ते धुरात उडवण्यापेक्षा आपल्याला दिवाळीच्या खर्चातून काही भाग वंचित मुलांच्या शिक्षणासाठी, झाडे लावण्यासाठी किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी देता येईल का ? एखाद्या समाजोपयोगी संस्थेला मदत करता येईल का ? याचा विचार नक्कीच करायला हवा असं मला वाटतं. तर ती खरी आनंदाची आणि प्रकाशाची दिवाळी होईल. तो आनंद अनेक पटीने आपल्याकडे परत येईल.

आपण सण साजरा करू या, पण जबाबदारीने आणि प्रदूषण नव्हे, तर आनंद आणि प्रकाश पसरवू या. आकाशात धूर नव्हे, तर माणुसकीचे दीपस्तंभ प्रज्वलित करू या.


आपल्या मुलांना आपण हे सांगू या की बाळांनो, दिवाळीचा आनंद फटाक्यांत नाही तर तो आहे एखाद्या गरीबाच्या घरात उजळलेल्या छोट्याशा दिव्यात, एखाद्या झाडाला पाणी घालणाऱ्या हातात आणि आपल्यात जागवलेल्या जागरूकतेच्या प्रकाशात. त्यांच्या हातात फक्त फटाके नव्हे, तर भविष्यातील उजेडाचा दिवा देऊ या.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२५/१०/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...