मुख्य सामग्रीवर वगळा

सोडा रेडी टू इट खा घरचेच नीट

 उगवतीचे रंग 

सोडा रेडी टू इट, खा घरचेच नीट

काही दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी चाळीसगावला आमच्या शेठ ना बं वाचनालयात व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात दुकानात तयार मिळणारे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहेत हे उदाहरणासहित समजून दिले. त्याचा श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडला. सांगणारी व्यक्ती एक तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व होते. रेडी टू इट पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांची बनवेगिरी अशी की ते आपल्या पदार्थांच्या वेष्टनावर जे काही लिहितील त्याचा समावेश त्यात असेलच असे सांगता येत नाही. दिसते तसे नसते. जे आपण पाहू नये किंवा वाचू नये असे त्यांना वाटते ते कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते.

आपल्या घरच्या पदार्थांमध्ये जास्त तेल, जास्त मसाले आपण वापरत नाही. त्यात प्रिझर्वेटिव्ह चा वापर करत नाही. या पदार्थांची चव हॉटेलमधील पदार्थांसारखी लागली नाही तरी आरोग्यासाठी ते सर्वोत्तम असतात म्हणून आपल्या जिभेला घरात बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यावी. स्वयंपाकात कुशल असणाऱ्या गृहिणींना घरातील सदस्यांना आवडतील असे अन्नपदार्थ कसे बनवायचे याची कला अवगत असते.

पूर्वी एकदा अशीच एक बातमी मी पेपरमध्ये  वाचली होती. न्यूझीलंडमधील एक सुखवस्तू कुटुंब आहे. लिडिया ही पती व चार मुलांसोबत राहते. दोघेही नोकरी करीत असल्याने स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे नेहमी फास्टफूड किंवा रेडी टू ईट फूड घेत . काही दिवसांनी त्यांना आढळले की त्यांचा लहान मुलगा ॲस्टन हा खूप आजारी असून त्याला असह्य वेदना होत आहेत. आणि तो दोन घासही खाऊ शकत नाही. त्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेल्या. डॉक्टरांनी केमिकल अलर्जीचे निदान केले. अलर्जीतील रासायनिक घटक खाद्यपदार्थांमध्ये आढळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हापासून त्यांनी आपल्याला कळत नसलेल्या घटकांची माहिती गुगल सर्चवरून शोधली. अनेक मंहिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले. आपण जे पाकिटबंद अनेक पदार्थ खातो त्यामध्ये त्यांना अनेक धोकादायक रसायने आढळली. त्यांना असे आढळले की आपण जे खातो ते खाद्यपदार्थच नाहीत. तेव्हापासून त्यांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणणे बंद केले . आपली नोकरी सोडली आणि घराजवळ शेती खरेदी केली. घरासाठी लागणाऱ्या भाज्या, फळे इ. तेथे लावण्यास सुरुवात केली. लिडिया व त्यांच्या पतीने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी याला बॅक टू बेसिक्स असे नाव दिले असून या नावाचे त्यांचे फेसबुक पेजही आहे. ( संदर्भ: दिव्य मराठी दि. ११/२/२०१७ )

हे पाकिटबंद पदार्थांचे आणि रेडी टू ईट पदार्थांचे लोण आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. आज भारतातील मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या स्रियांना वेळ नसल्यामुळे असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे सध्या जी मॉल संस्कृती निर्माण झाली आहे ती पण काही अंशी याला कारणीभूत आहे. मॉलमध्ये जाणे आणि खरेदी करणे हे गरजेपेक्षा जास्त हौशीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. मॉलमध्ये फिरत असताना आपण अशा अनेक पदार्थांची खरेदी करतो की जे आवश्यक नसतात. त्यामध्ये खाण्याच्या पाकिटबंद पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यात आपल्या आवडीचे अनेक पदार्थ असतात. काही तयार पदार्थ आणि काही रेडी टू कूक . जसे ढोकळे, बाकरवडी ,गुलाबजाम इ. अनेक भाज्यांची पाकिटेही मिळतात. असे अनेक पदार्थ दुकानांमध्ये मिळतात. मंडळी, या पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात अनेक धोकादायक रसायने ,म्हणजेच प्रिझर्वेटिव्हज वापरलेले असतात. तेव्हा भरमसाठ पैसे देऊन असले पदार्थ खरेदी करून आपण आपल्या आरोग्याची हानी करून घेत असतो.

आपल्या व्याख्यानात डॉ. अविनाश सावजी असे म्हणाले की या संदर्भात गांधीजींनी सांगितलेले एक साधे सोपे सूत्र आपण लक्षात ठेवू या. गांधीजी म्हणाले होते जे पदार्थ नाशिवंत असतात किंवा लवकर नासतात ,कुजतात ते पदार्थ आरोग्यास चांगले असतात. मी जेव्हा हे प्रथम ऐकले तेव्हा मला सुरुवातीला त्यांचे विधान विचित्र वाटले. की नाशिवंत पदार्थ आरोग्याला चांगले कसे असतील ? हा वरवर पाहता विरोधाभास वाटतो. पण ते खरे आहे. उदा. आपल्या घरी बनवलेली भाजी, पोळी,भाकरी लवकर खराब होते. दुसऱ्या दिवशी ते पदार्थ शिळे होतात. हे नाशिवंत पदार्थ आहेत. ते ताजे असतानाच आपण खातो आणि खाल्ले पाहिजेत. जेवढे आपण घरी बनवलेले ताजे पदार्थ खाऊ तेवढे आपले आरोग्य चांगले राहील.

शास्त्रज्ञानी आरोग्यासाठीच्या केलेल्या संशोधनात असे आढळून आले की ताजे आणि स्वच्छ पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. स्वच्छ म्हणजे पाकिटबंद पदार्थ नाहीत ही गोष्ट पुन्हा येथे लक्षात घेतली पाहिजे. पाकिटबंद पदार्थ जसे तेल, मीठ , साखर आपल्याला स्वच्छ दिसतात पण प्रत्यक्षात ते तयार करताना त्यात धोकादायक रसायनांचा वापर केलेला असल्याने ते आरोग्यास अपायकारक असतात. त्याऐवजी साधे मीठ, गूळ , घाण्यावर काढलेले तेल आरोग्यासाठी चांगले आहेत. तसेच घरातील फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ साठवून ठेवतो. बऱ्याच वेळा आठवडभरासाठीच्या भाज्या आपण घेऊन ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्या तरी त्यातील पोषक घटक नष्ट होतात, त्या शिळ्या होतात. म्हणून शक्यतो ताज्या भाज्या, फळे विकत घेऊन खाल्ली पाहिजेत. अशा पद्धतीचा ताजा आहार माणसाचे आरोग्य वाढविण्यास व तारुण्य टिकविण्यास मदत करतो.

     तेव्हा शक्य तो घरी बनवलेले पदार्थच खाऊ या. शिवाय ते पदार्थ मोठ्या प्रेमाने आपल्या आईने, पत्नीने बनवलेले असतात त्याची सर बाहेरच्या पदार्थाना कशी येणार ?

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२२/१०/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा  )
                                                 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...