उगवतीचे रंग
तमसो मा ज्योतिर्गमय...
सध्या आपण दीपावली साजरी करतो आहोत. वर्षभरातून एकदा येणारा हा प्रकाशाचा उत्सव ! घराघरात आणि घराबाहेरही दीप प्रज्वलित झाले आहेत. या मंगलमय प्रकाशात घरातील आणि घराबाहेरील वातावरण उजळून निघाले आहे. दिवाळीत नवीन खरेदी, फटाके, फराळाचे विविध पदार्थ तर आपण करतोच पण यापेक्षाही थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून दिवाळीकडे पाहता येईल का ? तो म्हणजे ज्ञानियांची दिवाळी. दिवाळी हा अंतरीच्या प्रकाशाचा उत्सव देखील उत्सव व्हावा. ही दिवाळी केवळ चार दिवसांची नव्हे तर वर्षभर चालणारी असेल. यातून फक्त घरे आणि घराबाहेरील वातावरणच नव्हे तर मने देखील उजळून निघतील. अशी ही ज्ञानियांची दिवाळी.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
"मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेकदीप उजळी॥ तैं योगियां पाहे दिवाळी॥"
याचा अर्थ असा की, अज्ञानाच्या अंधाराला विवेकबुद्धीच्या प्रकाशाने दूर करणे हीच खरी दिवाळी. आपल्या उपनिषदांचा आपल्याला संदेश आहे तो म्हणजे ' तमसो मा ज्योतिर्गमय '. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य ! हा मंत्र केवळ धार्मिक आहे असे समजण्याचे कारण नाही. तो आपल्याला ज्ञानयात्रेची दिशा दाखवतो.
दिवाळी आली की आपल्या घराघरांत दिव्यांची रोषणाई होते, फराळाचा गंध वातावरणात भरून राहिलेला असतो आणि फटाक्यांच्या झगमगाटात वातावरण उजळून निघते. आनंदाच्या, गडबडीच्या आणि आवाजाच्या या सगळ्या बाह्य प्रकाशात सगळे मग्न असताना काहीजण मात्र शांतपणे, विचारांच्या गाभाऱ्यात बसून, एका वेगळ्या दिवाळीचा उत्सव साजरा करतात आणि तो असतो— ज्ञानियांची दिवाळी.
आपण सामान्य माणसे अंधार दूर करण्यासाठी तेलाची पणती लावतो. ज्ञानियांच्या हृदयात मात्र तेवत असतो ‘ ज्ञानाचा दीप '. हा ज्ञानदीप अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून विवेक बुद्धीच्या प्रकाशाने आपले अंतरंग उजळतो. दिवाळीचे दिवस त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा जरा वेगळे असतात. त्यांच्यासाठी ‘धनत्रयोदशी’ म्हणजे सोने-चांदी नव्हे, तर उत्तम विचार देणाऱ्या नवीन ग्रंथांची खरेदी. तेच त्यांच्या दृष्टीने मौल्यवान धन असते. ते करतात नव्या विचारांचे संकलन आणि आत्मशुद्धीची तयारी.
ज्याच्या घरात ग्रंथांचा सुवास आहे, त्याला बाहेरील रोषणाईची गरज नसते. त्याचे अंतरंग नेहमी प्रकाशमान असते. त्याच्यासाठी प्रत्येक चांगला विचार हा मौल्यवान हिरा असतो, जो मनाच्या तिजोरीत जपून ठेवला जातो. अशा विचारांनी त्याची तिजोरी भरत जाते. बाहेर फुटणाऱ्या फटाक्यांच्या आवाजापेक्षा तो अंतरातील आवाज ऐकत असतो. सकारात्मक विचारांची बीजे रुजवून अंधश्रद्धा, कुविचार, त्याज्य रूढी आणि परंपरा यांच्यावर तो आघात करत असतो. ज्ञानियांची दिवाळी गोंगाटात नव्हे, तर संवादात साजरी होते. दिवाळीला मित्र एकत्र येतात. फराळही करतात पण त्याचबरोबर ते करतात नवीन विचारांचा स्वीकार, एखाद्या पुस्तकावर चर्चा, ते शोधतात जीवनाची दिशा दाखवणाऱ्या एखाद्या कवितेचा अर्थ. समाजातील प्रश्न त्यांना भेडसावत असतात, त्यावरही ते चर्चा करतात. चर्चा करून ते थांबत नाहीत. ते एखाद्या वृद्धाश्रमात जातात. तेथील वृद्धांसाठी होतात मदतीचा हात, अनाथालयातील मुलांसाठी घेऊन जातात गोडधोड फराळाचे जिन्नस, कुठेतरी आदिवासी पाड्यावर भगिनींना नवीन साड्या, कपड्यांचे वाटप करतात. पावसाने सर्वस्व हिरावून घेतलेल्या शेतकऱ्याच्या उदास चेहऱ्यावर त्यांचे धीराचे शब्द जादू करतात. जमेल तेवढी मदत करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अशा ज्ञानियांची दिवाळी शतपटीने उजळून निघते.
ज्ञानियांसाठी नरक चतुर्दशी म्हणजे अंतरात दडून बसलेल्या राक्षसांचा वध. कोणते असतात हे राक्षस ? तर ते असतात अहंकाराचे, असहिष्णूतेचे, वाईट विचारांचे, अज्ञानरूपी अंध:काराचे ! ज्ञानी लोक या सगळ्या गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करून अनोखी नरक चतुर्दशी साजरी करतात. ते अभ्यंग स्नान करतात ते आत्मपरीक्षणाच्या पाण्यात आणि वापरतात सुगंधी उटणे वापरतात सद्विचारांचे. अशा लोकांच्या विचारांचा सुगंध आसमंतात पसरला की तो वातावरण शुद्ध करतो. त्यांची दिवाळी ही जगण्याचा उत्सव होते.
ज्ञानियांना माहित असते की लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे, तर बुद्धीची आणि सद्विचारांची समृद्धी. तीच असते खरी लक्ष्मी. ते जाणतात की सोनेनाणे, पैसा यासारखी क्षणभंगुर संपत्ती चोरली जाऊ शकते, पण ज्ञानाचा प्रकाश कधी विझत नाही. ही संपत्ती जेवढी वाटली तेवढी वाढत असते. म्हणून ते जमेल तेवढे या संपत्तीचे वाटप करत असतात.
आजचे युग तंत्रज्ञानाचे. आपण वावरतो डिजिटल युगात. हातात असतो मोबाईल आणि मनात मात्र असतो गोंधळ. बाहेरील स्क्रीन उजळतात, पण आतील अंधार मात्र वाढत जातो. अशा वेळी ज्ञानियांची दिवाळीच आपल्याला दिशा देते. तमसो मा ज्योतिर्गमय ! त्यांचे विचार, त्यांचे वागणे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करते. संपूर्ण मानवजातीलाच अशी माणसे दिशा दाखवतात.
आजच्या या डिजिटल युगातही काही तरुण असे आहेत की जे स्क्रीनमध्ये अडकून पडत नाहीत. त्यांची पावले वळतात वाचनालयाकडे. अशा ठिकाणी ते दिवाळीचा ‘ज्ञानोत्सव’ साजरा करतात. पुस्तक वाटप, ग्रंथप्रदर्शन, संवाद सत्रं यांचं आयोजन करतात. काही ध्येयवादी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांच्या जीवनात सदविचारांचा प्रकाश आणतात आणि त्यांचे जीवन उजळवतात.
हीच असते ज्ञानियांची दिवाळी. खरी ‘ज्ञानदीपावली’.कारण जेव्हा एक मन सद्विचारांनी उजळते, तेव्हा समाजात हजारो दिवे प्रकाशमान होतात. अंतरीच्या प्रकाशाची ज्योत पेटते. अंतरीचा प्रकाश असतो शाश्वत. म्हणूनच, यंदा घरातील पणत्यांबरोबर मनातले दिवेही पेटवा. घर सजवा पण मनही प्रकाशाने उजळू द्या. उपनिषदांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करू या. ' तमसो मा ज्योतिर्गमय !'
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/१०/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा