उगवतीचे रंग
अदृश्य अस्त्रांचा धोका ( भाग एक )
युद्धाच्या कथा ऐकणे, वाचणे किंवा पाहणे सर्वांनाच आवडते. युद्धस्य वार्ता रम्य : असे म्हटले जाते. परंतु सध्या होत असलेल्या आणि भविष्य काळात होऊ शकणाऱ्या युद्धांचे स्वरूप जर आपण लक्षात घेतले तर युद्धस्य वार्ता न रम्य: असे आपल्याला म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असेही म्हटले जाते परंतु जगातील निरनिराळे देश ज्या पद्धतीने युद्धाची तयारी करीत आहेत ती पाहिल्यानंतर सर्व काही क्षम्य नाही असेच आपल्याला म्हणावे लागेल. कारण नीती आणि अनितीच्या कल्पना गुंडाळून ठेवल्या जात आहेत, मानवी मूल्यांना तिलांजली दिली जात आहे. आजच्या काळात रशिया युक्रेन, इस्रायल हमास, ऑपरेशन सिंदूर यासारखी युद्धे सुरू असलेली आपण पाहत आहोत. केवळ काही मिनिटात किंवा सेकंदात भयंकर विनाश घडवून आणणारी आधुनिक अस्त्रे विज्ञानाने माणसाच्या हाती दिली आहेत.
युद्धे आता काही पारंपारिक पद्धतीनेच फक्त लढली जाणार नाहीत तर त्यामागे आधुनिक टेक्नोलॉजी पण असेल जसं की रोबोटिक सैनिक, ड्रोन्स, रोबोटिक प्राणी आणि युद्धाची साधने इ. पण त्याच बरोबर जो देश हेरगिरी मधे सर्वात पुढे त्याची सरशी होण्याची शक्यता तेवढीच जास्त आणि ही हेरगिरी जमिनीबरोबरच अवकाशातून पण तेवढीच महत्त्वाची आणि परिणामकारक आहे. अमेरिकेचे जवळपास सर्व मोठ्या देशांवर हेरगिरी ( spy satellites ) करणारे उपग्रह आहेत आणि ते त्या त्या देशांच्या संशोधनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा व्यापार करणे आणि त्यातून अवाढव्य नफा कमावणे हे जगातील बऱ्याच राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ते एकत्र येतात. प्रगत देशांमधील युद्धे ही भविष्यत अवकाशात लढली जातील अशी शक्यता आहे. कोणाकडे किती प्रगत तंत्रज्ञान आहे आणि ते तंत्रज्ञान शत्रू देशाचे मिसाईल्स/ फाइटर जेट्स लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच कसे उध्वस्त करू शकते. त्याचबरोबर तुमचे मिसाइल किंवा लढाऊ विमान हे शत्रूच्या रडारला चकवा कसे देऊ शकते. यावर युद्धाचा जय किंवा पराजय ठरणार आहे. ह्या आधुनिक शस्त्रांना आता पारंपारिक इंधन न वापरता अणुशक्तीचा वापर करून काम केले जाईल. त्याच बरोबर आपली कमीत कमी मनुष्यहानी होऊन शत्रू राष्ट्राचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर पूर्वीपासून होत आला आहे , ज्यामध्ये विषाणू, विषारी वायू इ चा वापर केला जातो. पण जीवाणूंचा उपयोग जर त्यापासून बचावाची संरक्षक यंत्रणा नसेल तर दुधारी अस्त्र ठरू शकते आणि ते त्याच राष्ट्रावरही उलटू शकते. जसे की चीनच्या वुहान लॅबमधे कोरोना व्हायरसचा जन्म झाला अशी सर्वसाधारण मान्यता आहे पण त्याचा त्रास त्याच देशाला पण खूप झाला हेही आपण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आधुनिक शस्त्रे महत्वाची आहेतच पण शस्रांपेक्षाही ती कधी आणि कशी वापरली जातात हे जास्त महत्वाचे आहे.
कधी नव्हे ती मानवजात नजीकच्या भविष्यकाळात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. कोणाचा कधी आणि कशाने मृत्यू झाला हे देखील कळणार नाही अशा प्रकारचे बदल युद्धाच्या पारंपारिक कल्पनेत होत आहेत. आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या दृश्य अस्रांपेक्षा अदृश्य अस्त्रे अपरिमित हानी करतील. भूतकाळातील युद्धे धनुष्यबाण, भाले, गदा, तीर कामठा, ढाल तलवारी, तोफा या साधनांनी लढली गेली. त्यानंतर बंदुकांचा शोध लागला. विज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसतसे विविध प्रकारच्या वापर आधुनिक तोफा, रणगाडे आणि बॉम्बस् यांचा युद्धांमध्ये केला गेला. एके ४७ सारख्या बंदुका आल्या. यानंतरही विविध प्रकारच्या अस्त्रांवर संशोधन सुरूच होते. कमीत कमी परिश्रमात, भौतिक संपत्तीची कमीत कमी हानी होऊन शत्रू राष्ट्राची जास्तीत जास्त माणसे एकाच वेळी कशी मारता येतील यावर प्रगत देशांमध्ये प्रयोगशाळांमध्ये संशोधन होऊ लागले. हे संशोधन अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आणि गुप्तपणे केले गेले.
दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर केला गेला आणि जपानमधील दोन शहरे हिरोशिमा आणि नागासाकी पूर्णपणे उध्वस्त झाली आणि जपानचे भरून न येणारे नुकसान झाले. परंतु त्यातूनही जपानने भरारी घेतली आणि तो उभा राहिला हे सगळे आपल्याला माहिती आहे.
परंतु युद्धात न दिसणारी अस्त्रे वापरण्याचा इतिहास फार प्राचीन आहे. इसवीसनपूर्व सहाव्या आणि सातव्या शतकात झालेल्या काही युद्धांमध्ये शत्रू राष्ट्रातील पाण्याचे स्रोत विविध प्रकारची विषारी रसायने वापरून दूषित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शत्रुपक्षाकडील लोकांना त्यांना कळणारही नाही अशा पद्धतीने अतितीव्र अशा प्रकारची रेचके देण्यात आली होती. ज्यामुळे जुलाब होऊन ते युद्धासाठी उभेच राहू शकणार नाहीत. १४ व्या शतकात तर मंगोलांच्या काळात तारतार सैन्यानं मृतदेह आणि मेलेले उंदीर यांचा वापर करून प्लेगच्या साथीचा प्रसार केला होता आणि त्यामुळे शत्रू राष्ट्रातील अनेक लोक मारले होते. हा प्लेगचा आजार पुढे अनेक देशांमध्ये पसरला आणि त्याने अपरिमित मानवहानी केली. अठराव्या शतकात उत्तर अमेरिकेतील रेड इंडियन्सवर ताबा मिळवण्यासाठी इंग्रजांनी देवी रोगाची साथ जाणीवपूर्वक पसरवली. त्यात हजारो अमेरिकन नागरिक बळी गेले. पुढे एडवर्ड जेन्नर यांनी संशोधन करून देवीची लस शोधून काढली. त्यामुळे लाखो माणसांचे प्राण वाचले. जगात सुरू झालेल्या जंतू युद्धाच्या लढाईत विधायक कामगिरी करणारा हा पहिला मानवजातीचा तारणहार !
आपल्याला वाटतं की पहिलं महायुद्ध तोफा आणि बंदुका यांच्या सहाय्याने लढलं गेलं पण ते पूर्णपणे खरं नाही. या युद्धापासून अदृश्य अस्त्रांच्या वापराला सुरुवात झाली आणि पारंपारिक युद्धाच्या कल्पनेमध्ये अपरिमित असा बदल झाला. जर्मनीने फ्रान्सवर चढाई करण्यासाठी आणि लढाईत विजय मिळवण्यासाठी क्लोरीन या वायूचा अस्त्र म्हणून वापर केला. त्यामुळे शत्रूराष्ट्रातील अनेक सैनिक गुदमरून मेले. त्यांच्या बंदुका आणि तोफा अनेक वर्षे पावसात राहिल्यासारख्या गंजल्या. नंतर पुढे याच वायू अस्त्राचा उपयोग जर्मनांनी रशियन सैन्यावर केला आणि त्यांचेही हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. याच्यापुढे जाऊन एका जर्मन संशोधकानं अँथ्रॅक्स म्हणजे काळपुळी आणि ग्लँडर्स या रोगांचे जंतू विकसित केले. त्यामुळे एकाच वेळी माणसे आणि प्राणी मारण्याची नवी क्षमता म्हणजे नवीन अस्र त्याने विकसित केले. पुढे ग्लँडर्स या रोगाच्या प्रसारामुळे अनेक देशातील निरपराध प्राण्यांचा बळी गेला. ( क्रमशः )
संदर्भ : आंतरजालावरील माहिती.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३१/१०/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा