मुख्य सामग्रीवर वगळा

माझे आदर्श आणि दिलदार मित्र श्री उत्तमराव काळे सर

 उगवतीचे रंग 

माझे आदर्श आणि दिलदार मित्र श्री उत्तमराव काळे सर

चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा करत असताना एक उत्तम मित्र मला लाभला त्या मित्राचे नाव श्री उत्तमराव काळे सर. खरोखरच नावाप्रमाणे उत्तम असे हे व्यक्तिमत्व ! सुदृढ शरीरयष्टी, गौरवर्ण आणि चारचौघात उठून दिसणारे रुबाबदार व्यक्तिमत्व सरांना लाभले आहे. चेहऱ्यावरून करारी वाटणारे सर अंतरंगी अतिशय प्रेमळ आहेत.

 विद्यार्थ्यांना त्यांचा आदरयुक्त धाक असायचा. गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यात सरांचा हातखंडा. सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी. हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरांच्या हाताखालून शिकून गेले आणि मोठे झाले. अशा अनेक ओल्या मातीच्या गोळ्यांना त्यांनी आकार दिला आणि त्यातून सुंदर मूर्ती घडवली. त्यापैकी अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, वकील अशा उच्च पदावर कार्यरत आहेत.  अनेक विद्यार्थी परदेशात उत्तम प्रकारे सेवा बजावत आहेत. हे सर्व विद्यार्थी आजही भेटले की सरांचे आवर्जून नाव काढतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचू शकलो याचा आवर्जून उल्लेख करतात. या सर्व गोष्टींचा त्यांचा प्रदीर्घ काळापासून असलेला मित्र म्हणून मी साक्षीदार आहे.

सरांनी शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशा विविध पदांवर काम केले. नुसते काम केले असे नाही तर आपल्या वागणुकीने इतरांना आदर्श घालून दिला. प्रार्थना सुरू होण्यापूर्वी सर वर्गावर असत. त्यामुळे विद्यार्थी आणि इतर शिक्षकांना प्रार्थनेचे आणि शिस्तीचे वेगळे महत्त्व सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. शाळेची सर्व कामे वेळच वेळी पूर्ण करण्यावर त्यांचा भर असायचा. विद्यार्थी असो की शिक्षक, कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्याकडे गेला की त्या समस्येवर हमखास उपाय किंवा मार्गदर्शन मिळणारच याची खात्री असायची. 

शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा उत्साहपूर्वक सहभाग असायचा. मग त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली असो, विज्ञान प्रदर्शन असो, प्रश्नमंजुषा किंवा अन्य कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, सरांच्या सहभागाने तो कार्यक्रम उत्कृष्टच पार पडत असे. अशा अनेक प्रसंगांमध्ये मी सरांच्या सोबत काम केले असल्यामुळे कोणतेही काम कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिकच आम्हा सर्व शिक्षकांना त्यांच्याकडून मिळत होते. 

सरांचे लहानपण अतिशय कष्टात आणि गरिबीत गेले. आईवडिलांनी त्यांना उत्तम संस्कार दिले. त्यांच्या आईचा आदर्श माता म्हणून गौरव झाला. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून ते पुढे आले पण आपल्या कर्तृत्वाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एक यशस्वी शिक्षक, एक उत्तम मुख्याध्यापक आणि प्रशासक, शिक्षकांच्या हक्कासाठी तळमळीने काम करणारा शिक्षक संघटनेचा कार्यकर्ता, आपल्या समाजासाठी तळमळीने काम करणारी व्यक्ती म्हणून नावलौकिक प्राप्त केला. समाजात यशस्वी म्हणून स्थान प्राप्त केल्यानंतरही आपले पूर्वीचे कष्टाचे दिवस ते विसरले नाहीत. गरीब परिस्थितीतील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे राहिला. अनेक मुलांना शालेय गणवेश घेऊन देणे, त्यांची फी भरणे, वह्या पुस्तकांची व्यवस्था करणे या गोष्टी सरांनी नेहमीच केल्या आणि विशेष म्हणजे ते करताना त्याची कोणतीही जाहिरात केली नाही हे विशेष आहे. आज थोडीफार मदत करणारे देखील आपल्या मदतीची खूप जाहिरात करताना दिसतात तशा प्रकारचा प्रयत्न सरांनी कधीच केला नाही. 

विद्यार्थी हे सरांचे दैवत होते आणि शाळेला ते माता मानत असत. आयुष्यभर गणिताचे शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या सरांना शून्याची किंमत कळली होती. एखाद्या संख्येच्या डावीकडे जेव्हा शून्य असते तेव्हा त्याला काहीही किंमत नसते पण जेव्हा तेच शून्य एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला जाते तेव्हा त्या संख्येची किंमत वाढते. शून्यातून आजच्या यशस्वी परिस्थितीपर्यंत पोहोचलेल्या सरांनी आपल्या वागणुकीतून, कष्टातून आणि प्रयत्नातून हे शून्य उजव्या बाजूला आणले आणि आपल्या वागणुकीला, पदाला एक मोठे स्थान प्राप्त करून दिले. ज्या शाळेत त्यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून सेवा दिली, त्या शाळेला निवृत्तीच्या वेळी भरघोस देणगी त्यांनी दिली. अशा प्रकारच्या देणग्या विविध संस्थांना त्यांनी दिल्या आणि एक प्रकारे समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. अनेक गरीब आणि गरजू नातेवाईक आणि आपल्या गावातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या घरी शिक्षणासाठी ठेवून घेतले. त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सरांनी सर्वतोपरी मदत केली. या सगळ्या त्यांच्या कार्यात त्यांच्या सहधर्मचारिणी सौ लता वहिनींची मोलाची साथ लाभली. त्यांच्या सहकार्यामुळेच सरांना या सर्व गोष्टी करता आल्या. सरांना एक मुलगा आणि दोन मुली. मुलगा चिरंजीव सौरभ आणि सुनबाई सौ कल्पिता हे दोघेही डॉक्टर म्हणून यशस्वीरित्या कार्यरत आहेत. मुलगी सौ सुनीला ही डॉक्टर आहे आणि दुसरी मुलगी स्नेहल इंजिनियर आहे अशा रीतीने सरांचा सर्व परिवार उच्चशिक्षित आहे. 

सर्व समाजासाठी सरांनी काम तर केलेच परंतु ज्या कुंभार समाजातून ते आले त्या समाजाच्या प्रगतीसाठीही त्यांनी बरेच मोठे कार्य केले आहे.  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतरही समाजाच्या कार्यासाठी वाहून घेणे, मार्गदर्शन करणे, गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे या गोष्टी करण्यात आजही ते व्यस्त असतात. सकाळी फिरणे आणि नियमित व्यायाम करणे या गोष्टी त्या आवर्जून करतात. त्यामुळे आपले आरोग्य त्यांनी सुदृढ राखले आहे. चाळीसगाव येथील सुवर्णाताई उद्यानात जॉगिंग ग्रुपच्या माध्यमातून अनेक मित्रमंडळी त्यांनी जोडली आहेत. 

असा हा माझा उत्तम आणि आदर्श मित्र !  मित्र म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. १ मे २०२५ रोजी ते आपल्या वयाची  वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो आणि समाजहिताची आणखी कामे त्यांच्या हातून घडोत या शुभेच्छा !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

९/२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...