उगवतीचे रंग
स्पर्श होता तुझा...
जेव्हा तुझी नि माझी सहजीच भेट झाली
केसात रुपेरी माझ्या पाती हिरवी फुलून आली.
जगणे सुंदर होतेच ते आणखी सुंदर झाले
जगण्यास या आता अर्थ नवे मिळाले .
असे खूप दुर्मिळ जरी तो स्पर्श तुझा मला लाभला
दिव्य त्या स्पर्शे देह माझा रोमरोमी फुलून आला.
शारदेच्या उपवनातील पुष्पे दोन मला मिळाली
दिव्य त्यांच्या सुगंधाने काया ही पुलकित झाली.
शारदेच्या वीणेचे ते दिव्य स्वर कानी आले
मधुर त्या स्वरांनी आयुष्य माझे झंकारले.
कृपा ही अशीच राहो जन्म जन्मांतरी
तुझिया अमृताने व्हावी धन्य मम वैखरी.
( प्रिय रसिक वाचकहो, या कवितेचे थोडे स्पष्टीकरण देतो. सेवानिवृत्तीनंतर मी लेखनाला सुरुवात केली. आतापर्यंत जे लेखन माझ्या हातून घडले ते केवळ माझे नसून त्या शारदामातेचा दिव्य स्पर्श कुठेतरी मला लाभला असावा. त्यामुळेच हे शक्य झाले. यात माझे स्वतःचे असे काही नाही. त्याचेच वर्णन करणारी आणि तिची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता ! )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
११/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा