उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45श्रीनिकेतनची स्थापना
या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू करण्याचे ठरवले. त्याला त्यांनी श्री निकेतन असे सुंदर नाव दिले. श्री म्हणजे विकास किंवा कल्याण. श्री निकेतन म्हणजेच लक्ष्मीचे वस्तीस्थान ! आतापर्यंत अठरा विश्वे दारिद्र्य असणाऱ्या ग्रामीण भागात या माध्यमातून लक्ष्मीच्या पावलांचा प्रवेश होईल अशी त्यांची कल्पना होती.
रवींद्रनाथांच्या युरोप दौऱ्यामध्ये त्यांना जो लिओनार्डो एल्म हर्स्ट या नावाचा तरुण भेटला होता, त्याची या श्रीनिकतनच्या कामात त्यांना मोलाची मदत झाली. एल्म हर्स्ट बद्दल मागील एका भागात मी आपल्याला सांगितले आहे त्याची आणि रवींद्रनाथांची भेट १९२० मध्ये न्यूयॉर्क येथे झाली. एल्म हर्स्ट हा कृषीअर्थशास्त्राचे शिक्षण घेणारा एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाने तो भारावला होता. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील कविता त्याने वाचल्या होत्या. रवींद्रनाथांनाही हा उत्साही तरुण अतिशय आवडला आणि पहिल्याच भेटीत त्यांनी त्याला भारतात येण्याबद्दल निमंत्रण दिले होते. रवींद्रनाथांच्या मनात श्रीनिकेतन या संस्थेचा विकास करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या भौतिक प्रगतीसाठी एल्म हर्स्टला बोलवण्याचा विचार होता. एल्म हर्स्ट हा खरोखरीच ध्येयवादी तरुण होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या शब्दाला जागून त्याने रवींद्रनाथांना एक तार केली आणि माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी आता भारतात येऊ का असे विचारले ? यावेळी रवींद्रनाथांना आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात भासत होती. आपल्या संस्थेचे कार्य पुढे चालवण्यासाठी पैशाची तरतूद कशी करावी याची विवंचना त्यांना होती. आणि अशा वेळी युरोपातून कोणी शिकवण्यासाठी येणार असेल तर त्या व्यक्तीला पगार तरी कसा द्यावा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे रवींद्रनाथांनी एल्म हर्स्टला उलट तार पाठवली की आता पैसे नाहीत तेव्हा येऊ नकोस. हा प्रसंग फार बोलका आहे. या प्रसंगातून रवींद्रनाथ आणि एल्म हर्स्ट या दोघांचेही आरपार प्रामाणिक असलेले व्यक्तिमत्व आपल्याला स्पष्ट दिसते.
पैसे नाहीत हे कारण एल्म हर्स्टला भारतात येण्यापासून रोखू शकले नाही. आपल्या पदरचे पैसे खर्च करून तो भारतात रवींद्रनाथांच्या मदतीसाठी धावून आला. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा पैसा नाही या गोष्टीचे रवींद्रनाथांना जराही वाईट वाटत नसे. त्याचे कारण हे होते की त्यांना हे माहिती होते की आपल्या कामाची किंमत गुणवत्तेवरून केली जाईल, संख्येवरून नाही. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्यावर प्रयोगाने अभ्यासाने अत्यंत काळजीपूर्वक उपाय शोधले पाहिजेत आणि मग ती योजना कार्यान्वित केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. कार्याची ही ज्योत सदैव प्रज्वलित रहावे असे त्यांना वाटत होते.
आपल्या घरातील पिढीजात अशा जमीनदारी आणि सावकारीच्या व्यवसायाच्या निमित्ताने रवींद्रनाथांचा लहानपणापासून ग्रामीण भागातील लोकांशी जवळचा संबंध आला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांची उत्तम जाण होती. ६ फेब्रुवारी १९२२ रोजी श्री निकेतनची स्थापना झाली. त्यांनी श्री निकेतनच्या उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण त्याची साक्ष देते. ते म्हणतात, " खेडी जर समृद्ध व्हायची असतील तर त्यासाठी बाहेरील लोकांनी केलेली मदत फारशी उपयोगाची नाही. खेड्यातील लोकांनी स्वतःच आपल्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. बाहेरून पाणी आणण्यापेक्षा वाळवंटात जर एखादा झरा निर्माण झाला तर तो सतत पुरवठा करतो. असा झरा कधीच वाटत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
" ग्रामीण समस्येच्या निवारणाकरता समोर ठेवलेला दृष्टिकोन हा एकसंघ असावा. तो विस्कळीत असू नये. ग्रामीण जीवनातल्या सर्व महत्त्वाच्या समस्या एकत्रितरीत्या सोडवता आल्या पाहिजेत. परंतु हे करीत असताना माणसाच्या सर्वांगीण प्रयत्नांना आवाहन केले पाहिजे. ग्रामसेवकाने केवळ बुद्धी, हात व तांत्रिक ज्ञान यांचाच वापर करू नये, तर त्याला त्याच्या कार्यात भावनिक आत्मीयताही वाटली पाहिजे. आरोग्य, बुद्धी, ज्ञान, काम आणि आनंदाची भावना एक दुसऱ्यात मिसळून जातील तेव्हाच मानवाचे कल्याण खऱ्या अर्थाने पूर्णत्वास पोहोचेल."
एल्म हर्स्टला आपले काम करण्यासाठी रवींद्रनाथांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि आपली कोणतीही मते त्याच्यावर लादली नाहीत. यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. एल्म हर्स्टने देखील त्यांच्या तत्वांना अनुसरून
ग्रामीण भागातील पुनर्रचनेचे आपले कार्य धडाडीने सुरू ठेवले. या वाटचालीत ग्रामीण विकासाचा एक परिणामकारक असा कार्यक्रम लोकांसमोर आला. स्वतः रवींद्रनाथ आणि एल्म हर्स्ट यांच्यासोबत संतोष चंद्र मुजुमदार, गौरगोपाल घोष, कालीमोहन घोष, किम तारो कासहारा यांचेही या वाटचालीत योगदान होते. ही योजना इतकी सुंदर आणि प्रभावी ठरली की नियोजन आयोगाने सुद्धा त्यातील बऱ्याचश्या गोष्टी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्या कार्यपद्धतीत समाविष्ट केल्या.
श्री निकेतन हे केवळ शैक्षणिक केंद्र नव्हते तर स्थानिक कला आणि हस्तकलांना उत्तेजन देणारे एक मोठे सांस्कृतिक केंद्र होते. पारंपारिक हस्तकलांच्या विकासासाठी श्री निकेतनचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर या ठिकाणी शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि कुटीर उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अशा तऱ्हेने विश्वभारती विद्यापीठाचा एक भाग असलेले हे श्री निकेतन ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत होते. केवळ शाळा किंवा विद्यापीठ स्थापन न करता ग्रामीण भागातील लोकांचाही विकास व्हावा, शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रांचा वापर करावा, त्यांच्यामध्ये साक्षरता यावी, नवनवीन तंत्रांची आणि वैज्ञानिक शोधांची त्यांना माहिती व्हावी, स्वच्छतेचे महत्व पटावे, आजारांशी योग्य उपचाराने सामना करता यावा यासारखे अनेक उद्देश या माध्यमातून साध्य झाले. यातून रवींद्रनाथांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा