उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 44
शांतिनिकेतन ते विश्वभारती
शिक्षण कसे असावे याबद्दल रवींद्रनाथांच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या. त्यांना लहानपणी आलेला शाळेतील आलेला कटू अनुभव त्याच्या जोडीला होताच. शाळेत दिले जाणारे साचेबद्ध औपचारिक शिक्षण त्यांना आवडत नव्हते. हे शिक्षण मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास करण्यास असमर्थ आहे अशी त्यांची भावना होती. शिवाय त्यांचा मुलगा रथींद्रनाथ याचे देखील शाळेत नाव दाखल करण्याचे वय झाले होते. आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्यालाही शिक्षण देता यावे असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या चिंतनातून झालेला मानवता धर्माचा साक्षात्कार त्यांना समाजाची निष्काम सेवा करावी अशी प्रेरणा आतून देत होताच. या सगळ्या कारणांमुळे आपल्याला अपेक्षित असणारे उत्तम शिक्षण देणारी एखादी संस्था आपणच का निर्माण करू नये असे त्यांना वाटू लागले आणि त्यातूनच १९०१ मध्ये शांतिनिकेतनची स्थापना झाली.
प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या धर्तीवर शिक्षण देणारी संस्था असे शांतिनकेतनचे स्वरूप होते. हळूहळू या संस्थेची वाढ आणि विकास होऊ लागला. शांतिनिकेतनचा विकास होत असतानाच्या काळात रवींद्रनाथ परदेशात भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून जात होते. जगातील विविध देशात लोकांना भारतीय संस्कृतीचा परिचय करून देत होते. विदेशातील लोकांच्या हे लक्षात आले होते की एक व्यक्ती म्हणून नव्हे तर भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी या नात्याने रवींद्रनाथ आपल्याशी बोलत आहेत. ते केवळ भारताचा संदेश बाहेरच्या जगात पोहोचवण्याचे कार्य करीत नसून भारतीयांच्या गरजा परिणामकारकपणे मांडून जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रवींद्रनाथांची जी व्याख्याने परदेशात होत होती, त्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळत होती. त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत होते. परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव होती की आपल्यामार्फत भारताचा आवाज जगापर्यंत पोहोचतो आहे. याबाबत त्यांनी स्वतःच एका ठिकाणी असे म्हटले आहे की ज्यांनी माझा सन्मान केला तो खरं म्हणजे माझ्याकरवी भारताचा सन्मान झाला आहे आणि माझं जीवन संपल्यावरही हे बंद होऊ नये कारण मला जो आदर सन्मान मिळाला आहे तो व्यक्तिगत माझ्याशी संबंधित नाहीच. त्यांना हेही जाणवले की परदेशात भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल विलक्षण भूक आहे. ही भूक भागवण्यासाठी अशी एखादी संस्था असावी की जिच्यामार्फत हे कार्य सातत्याने करता यावे. आणि ही संस्था शांतिनिकेतनच असावी असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले आणि ती नावारूपाला येण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली.
पुढे आणखी काही वर्षानंतर जगातील विविध देशात भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अग्रदूत म्हणून कार्य करीत असताना शांतिनिकेतनचे रूपांतर एका विशिष्ट प्रकारच्या विद्यापीठात करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली असावी. या विद्यापीठाची स्थापना करून उदात्त आणि व्यापक अशा भारतीय संस्कृतीचे उदाहरण जगासमोर ठेवण्याचा त्यांचा विचार होता. भारतीय पारंपारिक संस्कृतीचे रवींद्रनाथांना विलक्षण कौतुक होते. त्यांची अशी इच्छा होती की जगातील लोकांचा शिक्षणाच्या निमित्ताने अशा विद्यापीठाची संबंध यावा आणि भारतानेही जगभरातील अशी इच्छा असणाऱ्या लोकांना येथे शिकण्यासाठी आमंत्रित करावे. भारताची संस्कृती वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख इत्यादी अनेक धर्मांवर आधारलेली आहे आणि अशा प्रकारच्या संमिश्र अशा भारतीय संस्कृतीचे ज्ञान विविध विषय आणि कलाप्रकारातून देण्याची व्यवस्था अशा प्रकारच्या विद्यापीठातून व्हावी असे त्यांना वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या मनाशी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आणि संस्थेसाठी विशिष्ट अशा प्रकारचा आराखडा तयार केला.
त्यांनी आपल्या मनाशी या विद्यापीठाचे जे नाव निश्चित केले ते अत्यंत समर्पक असे होते ते म्हणजे विश्वभारती ! ' यत्र विश्वं भवत्येकनिडम ' या वैदिक ऋचेतून त्यांना हे नाव ठेवण्याची प्रेरणा मिळाली असे दिसते. त्याचा अर्थ असा की ही संस्था अशी असावी की जिथे संपूर्ण विश्व एखाद्या घरट्याप्रमाणे आपण एकत्र करू शकू. या संस्थेचा असा विकास झाला पाहिजे की जगातील विविध भागातील लोक आध्यात्मिक संपत्तीची देवाणघेवाण करण्यासाठी इथे आकृष्ट झाले पाहिजेत.
जगभर प्रवास करताना रवींद्रनाथांनी हे पाहिले होते की जगातील विविध विद्यापीठे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिक ज्ञान किंवा खाद्य पूरवत होते. परंतु व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर केवळ बौद्धिक विकास होऊन चालणार नाही तर भावनिक विकासही होईल अशा प्रकारचे शिक्षण विद्यापीठातून दिले गेले पाहिजे असे त्यांना वाटत होते. विद्यापीठांनी विज्ञान, शास्त्र इत्यादी विषय शिकवत असतानाच ललित कला आणि त्या समूहात येणाऱ्या इतर विषयांना देखील तसेच मानाचे स्थान मिळवून द्यावे त्यायोगेच विद्यार्थ्यांचा खरा विकास होईल.
शिक्षणाचा हेतू केवळ ज्ञानासाठी ज्ञान असा मर्यादित न राहता मानवाला समजून घेऊन इतरांना त्याचा मानव म्हणून परिचय होण्यासाठी असावा. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे तर ' माणसा माणसा कधी होशील माणूस ' असं माणूस बनवणारं, माणूस घडवणारं शिक्षण विद्यापीठांनी देणं त्यांना अपेक्षित होतं.
आपल्या विश्वभारती या विद्यापीठात अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून त्यांनी जगभरातील नामवंत विद्वानांना भारतात आमंत्रित केलं. २२ डिसेंबर १९२१ रोजी या विद्यापीठाचे उद्घाटन झाले प्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉ. ब्रजेंद्रनाथ सील, प्रो. सिल्वान लेव्ही हे याप्रसंगी उपस्थित होते. प्रो. सिल्वान लेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यापीठात चिनी भाषा आणि साहित्याचा अभ्यास करण्याची योजना आखली गेली. विद्यापीठाच्या किरकोळ खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी संस्थेची काही जमीन विश्वभारतीला रवींद्रनाथांनी देणगी म्हणून दिली. आपल्या शिक्षणविषयक कार्याच्या आयुष्यभर केलेल्या धडपडीतून रवींद्रनाथांची प्रतिमा एक थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून जगासमोर आली होती. शांतिनिकेतन ते विश्वभारती हा रवींद्रनाथांचा जो प्रवास झाला त्याचा आढावा या छोट्याशा लेखात घेण्याचा प्रयत्न केला असला तरी रवींद्रनाथांनी आपले संपूर्ण आयुष्य याच्यासाठी खर्ची घातले आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा