मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४३

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४३

मानवतावादी धर्माचा साक्षात्कार 

रवींद्रनाथ हे भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अभिमानी असले आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून परदेशात त्यांनी प्रतिनिधित्व केले असले तरी देखील नेहमीच पारंपारिक गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यापेक्षा त्यावर विचार करून, त्यात काहीतरी बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच राहिला. त्यांची धर्मविषयक कल्पना सुद्धा अशाच प्रकारे विकसित पावली. भगवद्गीतेमध्ये परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग. परंतु रवींद्रनाथांचे म्हणणे असे की अशा वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करण्यापेक्षा ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा मेळ घालून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. 

ईशोपनिषदात असे म्हटले आहे की 

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।

( याचा अर्थ हे सर्व चराचर जग ईश्वराने व्याप्त आहे. त्याचा जाणीवपूर्वक उपभोग घ्यावा. मी त्याचा मालक आहे, हे सर्व माझे आहे या भावनेने त्यांचा उपभोग घेऊ नये. )

या दृश्य जगातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराने व्यापलेली असली तरी सुद्धा रवींद्रनाथांच्या मते मानव हा परमेश्वराचे सर्वात जवळचे रूप आहे. मानवात परमेश्वर विद्यमान आहे. मानवाच्या माध्यमातून त्या अदृश्य आणि सर्व शक्तीमान परमेश्वरापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. ईश्वराची कृपादृष्टी मानवावर मानवाद्वाराच होऊ शकेल असे ते म्हणतात. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी ते स्त्री चे उदाहरण देतात. एकच स्त्री वेगवेगळी नाती आणि भूमिका निभावते. ती कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, कोणाची तरी मैत्रीण असते, कोणाची तरी पत्नी असते. परंतु तिच्या मुलासाठी तिचे केवळ एकच असे दृढ नाते असते. ते म्हणजे आई आणि मुलाचे. केवळ आईच्या नात्यामुळेच तिचा मुलाशी निकटचा आणि सबळ संबंध असतो. त्यावेळी जगातली इतर नाती तिच्या दृष्टीने अनोळखी आणि निरुपयोगी अशी असतात. त्याचप्रमाणे परमेश्वर जरी वेगवेगळ्या रुपात व्यक्त होत असला तरी तो मानवासाठी मानव म्हणून अधिक जवळचा आहे. परमेश्वर मानवासमोर मानवतेच्या सच्या आणि दृढ स्नेहाच्या स्वरूपात प्रकट झाला आहे. त्याच्या या नात्यामुळेच आपण त्याला ओळखू शकतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याची सेवाही करतो.

ईश्वराचा शोध घेण्याच्या घेण्याच्या त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांना मानवातील ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्याची निष्काम सेवा करण्याचा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. आपण केवळ ज्ञान, प्रेम आणि सेवा यांच्या माध्यमातूनच त्या अदृश्य शक्तीपर्यंत ( ईश्वरापर्यंत )पोहोचू शकतो हा त्यांचा चिंतनातून निर्माण झालेला विचार होता. रवींद्रनाथांच्या धर्मविषयक संकल्पनेचा मानव हाच केंद्रबिंदू होता. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये १९३० मध्ये जी हिबर्ट व्याख्यानमाला झाली, त्या व्याख्यानमालेमध्ये देखील त्यांनी आपले हेच विचार प्रकट केले. मानवता धर्माचा उद्घोष त्यांच्या व्याख्यानात होता. त्यांचे हे विचार ' रिलीजन ऑफ मॅन ' या ग्रंथात प्रकाशित करण्यात आले आहेत.

या आध्यात्मिक साक्षात्कारानंतर त्यांनी स्वतःच्या हृदयातील ईश्वराचा शोध घेण्याचे थांबवून सामान्य माणसांमध्ये ईश्वराला पाहणे पसंत केले. त्यांच्या दृष्टीने असंख्य अशी सामान्य माणसे क्षुद्र नव्हती तर ईश्वराचा साक्षात अवतार होती. जनता हीच जनार्दन. हिच गोष्ट त्यांच्या कवितेची प्रेरणा ही ठरली. त्यांच्या एका कवितेतील काही ओळी अशा आहेत...

असंख्यांना एका सूत्रात बांधून 

ज्या विश्वात तू आहेस 

माझी अन तुझी ही 

तिथेच युती आहे 

न वनात न विजनात

 न माझ्या मनात

 जिथे तुझी माया जडे

 तिथेच माझेही प्रेम जडे. ( गीतांजली )

मंदिर मशिदीत देवाला शोधण्यापेक्षा माणसातच त्याचा शोध घ्यायला हवा असे ते म्हणतात. मानवाला भेटा, त्याच्या कष्टात, घाम गाळण्यात सहभागी व्हा. धार्मिक माणसाने कष्ट आणि परिश्रम यांच्या माध्यमातूनच ईश्वराला भेटले पाहिजे. सामान्य माणूसच प्रेम आणि सेवा यांचा केंद्रबिंदू ठरला पाहिजे. कारण त्या मार्गेच ईश्वराची कृपा संपादन करता येते. त्यामुळेच ईश्वराचे निकटतम रूप आपल्यासमोर साकार होते. अशा तऱ्हेने रवींद्रनाथांचा मानवतावाद व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. त्यांच्या दृष्टीने ईश्वर हा प्रामुख्याने अशिक्षित, दरिद्री समाजामध्ये वसलेला आहे. मजूर रस्ते करण्यात मग्न आहेत तर शेतकरी धान्य पिकवण्यात. हे सगळे लोक  निढळाचा घाम गाळतात. ईश्वर सर्वांमध्ये आहेच पण केवळ सुस्थितीत असलेल्या लोकांकडेच ईश्वराचे रूप म्हणून बघू नये तर असे दरिद्री कष्टकरी लोक हे ईश्वराचे रूप आहेत.  आपल्या एका कवितेत ते म्हणतात...

जिथे तो जाई तिथे तो पाही 

 भूमी नांगरून चाललेली शेतीभाती 

दगड फोडून रस्ते करती

 बारोमास देह कष्टविती 

 तो आहेच उन्हात पावसात सुद्धा

 धुळीने माखलेला फाटका कुडता पाहून

 शुभ्र वसने द्या टाकून नि बसा

  त्याप्रमाणे ह्या संगे धुळीत. ( गीतांजली - इंग्रजी आवृत्ती )

कोणतेही काम केवळ व्यक्ती हितास्तव करू नये. ते समाजाच्या व्यापक कल्याणासाठी असावे. ईश्वराचा सेवक हा सर्वसंचारी कार्यकर्ता बनला पाहिजे. कामे कितीही छोटी असो, ती सर्वव्यापी समजूनच करावी. अशा कामाने विश्वकर्म्याचा साक्षात्कार होतो. विश्वकर्मा म्हणजे जो सर्वांसाठी काम करतो, जो संपूर्ण विश्वासाठीच जणू काम करतो असा ! ( रिलीजन ऑफ मॅन )

ईश्वराची सेवा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मानवाची सेवा करणे. यामध्ये गोरगरीब, अशिक्षित आणि दरिद्री लोकांची सेवा प्रामुख्याने येते. रवींद्रनाथांचा हा मानवतावाद धर्मावर आधारलेला आहे. पाश्चिमात्य विचारवंत सुद्धा मानवतावादाची कल्पना मान्य करतात परंतु त्यांच्या विचारात धर्माला स्थान नाही तर रवींद्रनाथांचा मानवतावाद हा धर्मावर आधारित आहे. मानवता हाच त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा धर्म आहे. ईश्वरावरील डोळस श्रद्धा आणि धर्मभावानेतून त्यांचा मानवतावाद निर्माण झाला आहे. हाच मानवतावादाचा उदात्त दृष्टिकोन बाळगून रवींद्रनाथांनी आयुष्यभर मानवतेची सेवा केली.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

५/१/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...