मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४७

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४७

सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (२)


बंगालमधील लोक खरंच भाग्यवान ! रवींद्रनाथांचे सहजपाठ जणू त्यांच्या रक्तातच भिनले होते. अगदी शिशुवर्गात जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असणाऱ्या बंगाली माणसांपर्यंत त्यांच्या सहजपाठातील कविता सर्वांना पाठ होत्या. ही रवींद्रनाथांनी घडवून आणलेली जादू होती. खरंतर शिक्षण क्षेत्रातील ही एक क्रांती होती असे म्हटलेले जास्त योग्य ठरेल.

पु ल देशपांडे यांचा मुक्काम शांतीनिकेतनला असताना त्यांच्यासोबत सलील घोष नामक तेथीलच एक तरुण होता. त्याच्याबरोबर एकता ते शिशुभवनाच्या वस्तीगृहात गेले. त्या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात केले आहे. ते वर्णन अत्यंत हृद्य आहे. तेथे गेल्यावर सलीलने त्यांची तेथे शिकवणाऱ्या बाईंशी ओळख करून दिली. त्या प्रसंगाचे मोठे मनोरंजक वर्णन पुलं करतात. ते त्यांच्याच शब्दात- 
" बाईच्या भोवती पाच पंचवीस पोरींचा किलबिलाट चालला होता. आम्हाला पाहिल्यावर उगीचच त्या पोरी लाजल्या काय, गंभीर काय झाल्या, खुदकन हसल्या काय. काही बोलायची सोय नाही. बाईंनी पोरींना काय सांगितले देव जाणे. त्या चिमण्यांचा थवा एकदम माझ्या पायाकडे झुकून ' प्रोनाम ' करायला लागला. ' पुरे पुरे ' म्हणायला ' थाक थाक ' म्हणतात हे तेव्हा मला कळले. मी बाईंना हळूच म्हटले," या पोरींना सहज पाठातली गाणी म्हणता येत असतील. एक-दोन गाणी म्हणायला सांगाल का ?"

" एक दोन ? एकदा सरबत्ती सुरू झाली की आवरणे मुश्किल होईल. " आणि खरोखरच जी सरबत्ती सुरू झाली ती संपेचना.एकतर बंगाली म्हणजे ' ओ ' ची भाषा. त्या चिमण्या ओठांचे चंबू झाले. एकापाठोपाठ एक अशी गाणी सुरू झाली. सलीलही बालपणी हीच गाणी शिकलेला. त्यानेही आवाज मिसळला. मधूनच तो एखादी ओळ विसरला की पोरींच्या आनंदाला उधाण ! बंगालीत कविता पाठ म्हणण्याला '  आवृत्ती ' म्हणतात. एका मागून एक आवृत्त्या निघतच होत्या. त्यात ह्या पूजेच्या सुट्टीची वेळ आल्याबरोबर त्या पोरींनी त्या ओळी म्हणताना पूजेच्या सुट्टीच्या नुसत्या कल्पनेने इतक्या जोरात त्या ओळी म्हटल्या की भिंतीवरची हरणे देखील घाबरून धावत सुटतील असे मला वाटले.

पूजार फुलेर बने ओठे ओई. पूजार रोबी.
( पूजेच्या फुलांच्या वनी उगवला. पूजेच्या दिनींचा रवी...) "

पुलं पुढे म्हणतात, " बंगाल्यांचा कधीही वाटला नव्हता इतका हेवा मला त्यादिवशी वाटला. पुढे एका चांगल्या प्रौढ स्त्री-पुरुषांच्या मेळाव्यात मी सहज या बालगीतांचा उल्लेख केला. आणि गंमत अशी की त्या रात्री भोजनासाठी जमलेल्या निरनिराळ्या कुटुंबातील स्त्री-पुरुषांनी ती गाणी कोरसमध्ये म्हणायला सुरुवात केली. तोवर माझीही ती गाणी पाठ झाली होती. त्यामुळे त्यांच्या जोडीने मीही माझा आवाज मिसळला. 

कुमोर पाडार गोरुर गाडी... नाम तार मोती बिल... एशेछे शोरोत हिमेर पोरोश... ह्या बालगीतांचा पासपोर्ट घेऊन मी बंगाली कुटुंबात हिंडलो. आज साठीत असलेल्या आजोबांपासून ते सहा वर्षांच्या नातवापर्यंत सगळ्यांना ही गाणी पाठ ! मला वाटले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या भारतीय भाषांतून जर अशी चार चार सहा ओळींची गाणी निवडली आणि असली पाच-पन्नास गाणी साऱ्या देशातल्या पोरांना नाचत- खेळत पाठ करायला लावली तर त्या गीतांच्या नात्याने सारा देश बांधला जाईल. सगळ्या भाषा शिकणे अवघड आहे. पण नाद, प्रास, छंद यांच्या जादूने मंतरलेली गाणी असली म्हणजे झाले." 

गाणे म्हणणे म्हणजे तारुण्याचे आणि जिवंतपणाचे लक्षण ! गाणी हरवून बसणे म्हणजे म्हातारपणाचे लक्षण ! पूर्वी आपल्याकडे गाण्यांची जितीजागती अशी परंपरा होती. खेळातली गाणी, भोंडल्याची गाणी, जात्यावरची गाणी, झुल्यावरची गाणी, मोटेवरची गाणी असे कितीतरी विविध प्रकार होते. लेझीमच्या खेळातील तालबद्ध नाच लोकांना माहिती होता. परंतु आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आले. या सगळ्या नैसर्गिक गोष्टींची जागा एका कृत्रिम सभ्यतेने घेतली. आणि त्या सभ्यतेपोटी आपण गायचे, नाचायचे विसरून गेलो. नाचणे, गाणी म्हणणे हे मूर्खपणाचे आणि अडाणीपणाचे लक्षण आहे असे आम्हाला वाटू लागले. आणि शिक्षणाच्या आणि सभ्यतेच्या नावाखाली आम्ही सुतकी चेहरे करून बसलो.

पुलं म्हणतात, " खाणे, गाणे, अद्भुतात रंगणे, मोकळ्यावर खेळणे, पाखरांची मजा पाहणे, बोरे, पेरू काढणे, उत्सव, जत्रा, बाजार आणि सुट्टी यासारख्या मुलांच्या नैसर्गिक आवडी लक्षात घेऊन गुरुदेवांनी हे सहजपाठ रचले आहेत. आमच्या शिक्षण तज्ज्ञांनी निदान आदर्श बालवाचनमाला कशा असाव्यात हे पाहण्यासाठी तरी बंगाली शिकावे. मुलांपुढे एक एक धडा एक एक चित्र होऊन येतो. पहिल्याच पुस्तकातील धडा आहे - 

" निलू चल. तालवनाची हिच वाट. पलीकडे तिळाचे शेत आणि तिथून पुढे मोहरीचे. पुढे तळे लागते. निळे निळे पाणी. काठाकाठाला चिखल. जळात किरण कसे झगमग झगमग करतात पाहा. बगळा तसा टुकूटुकू बघतो आणि मासा पकडतो.  कुठले रे पाखरू ? अरे ! हा तर पोपट. हा काही बोलतो का रे  ? तो बोलतो राम राम हरी... किती सुंदर चित्रे. सगळ्या धड्यातून. मुलांना घराच्या चार भिंती बाहेर नेऊन हिंडवलेले. "

रवींद्रनाथ यांच्या सहजपाठात मुलांसाठी जोडाक्षरे शिकणे आणि शिकवणे किती रंजक असायचे त्याचे हे एक सुरेख उदाहरण 
" आज आद्यनाथ बाबूंच्या कन्येचा विवाह. शल्यपुरातील घरी. कन्येचे नाव शामा. वराचे वैद्यनाथ. त्याचा भाऊ सौम्यनाथ आणि कॉलेजात शिकणारा भाऊ आहे तो धौम्यनाथ..."

धौम्य, सौम्य, रम्य, आद्य, वैद्य यासारख्या जोडाक्षर असलेल्या शब्दांची सुरेख योजना केली आहे. म्हणता म्हणता ही जोडाक्षरे सहज लक्षात येतात. तसेच ' र ' फार शिकवयला जायचा तोही अतिशय मनोरंजक पद्धतीने. 
' वर्षा ' आली.  ' गर्मी ' सरली. मेघ ' गर्जना ' सुरू झाली. पर्वतावरून झरे धावत सुटले. कर्णफुली नदीला पूर आला. वर्षा, गर्जना, पर्वत यासारख्या शब्दात मुलांना रफार सहज शिकायला मिळतात आणि पावसाळ्याचे चिरपरीचीत दृश्यही त्यांच्या डोळ्यासमोर सहज उभे राहते. म्हणता म्हणता आनंद निर्माण होतो आणि आनंदातून शिकणे सहज होते. 

या सहजपाठाच्या पुस्तकांमध्ये शांतिनिकेतन मधील प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी चित्रे काढली आहेत. पण त्यातील काही चित्रे त्यांनी मुलांनी त्यात रंग भरावेत म्हणून कोरी सोडली आहेत. आपण मुलांना पाठ्यपुस्तकातील चित्रे रंगवू नका, त्यावर काही लिहू नका म्हणून सांगत असतो. पण रवींद्रनाथांनी पाठ्यपुस्तके हीच मुलांना खेळण्यासारखी वाटावी इतकी सुंदर केली. आपण वाचतो त्यात आनंद आहे, मौज आहे असे मुलांना आधी वाटायला हवे. चौथीपर्यंतच्या पुस्तकांमध्ये त्यांनी चतुर्थी, पंचमी, षष्ठी, कर्तरी, कर्मणी यासारखे क्लिष्ट प्रकार ठेवलेच नाहीत. खेळल्यासारखी मुलांनी पुस्तके वाचायची आणि त्यांचा आनंद घ्यायचा. या सगळ्या गोष्टींचा रवींद्रनाथांनी विचार करून त्या या सहज पाठाच्या पुस्तकांच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणल्या. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने गुरुदेव आहेत.

या संदर्भात आपल्याकडील शिक्षणाबद्दल आणि रवींद्रनाथांबद्दल बोलताना पुलं लिहितात, " गणितासारख्या चिमुकल्या मेंदूंना शेणवणारा विषय शिकवताना त्या गुरुजींनीच किंवा गुरुजीणबाईंनीच म्हणावे - का रे बुवा, जरा कंटाळा आला नाही का ? दोन मिनिटे एखादे मजेदार गाणे म्हणूया. जरा डोक्यातला कंटाळा बाहेर फेकून भांडी स्वच्छ करूया. या नुसत्या कल्पनेनेच आमचे शिक्षणतज्ज्ञ तडकतील. आणि इथे नोबेल प्राईज मिळालेले गुरुदेव रवींद्रनाथ शांतिनिकेतनाच्या आश्रमात शाळेतल्या पोरांना शिकवण्यासाठी भुकेलेले असायचे. आपल्या शैशवाला त्या शिशुसमूहात बसून हा कवी वृद्धत्वी जपत होता. इतकेच नव्हे तर मोठ्यांच्या नृत्य नाटिकांच्या तालमींना देखील प्राथमिक शाळेतल्या पोरांना मुक्तद्वार ! शांतिनिकेतनात आज कुठल्याही समारंभाला सगळ्यात पुढे फुलांचा गालीच्या पसरल्यासारखी रंगीबेरंगी पोशाखातील बच्चे मंडळी बसलेली असतात."

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१९/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...