उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 46सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (१)
रवींद्रनाथांच्या स्वतःच्या शिक्षण विषयक काही कल्पना होत्या. मुलांना औपचारिक पारंपारिक शिक्षण देण्यापेक्षा नैसर्गिकरित्या ते कसे शिकतील यावर त्यांचा भर होता. त्या दृष्टीनेच त्यांनी शांतिनिकेतन मधील मुलांना शिकवले. रटाळ घोकंपट्टी त्यांना कधीच मान्य नव्हती. तर भोवतालचे वातावरण, निसर्ग यांचे निरीक्षण करता करता मुलांनी त्यातून सहज शिकावे असे त्यांना वाटत होते. त्यातूनच त्यांचे सहजपाठ निर्माण झाले. रवींद्रनाथ केवळ व्यासपीठावरून भाषण देणारे किंवा वृत्तपत्रात मोठ-मोठे शिक्षण विषयक लेख लिहिणारे शिक्षणतज्ज्ञ कधीच नव्हते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून आणि मुळापासून करणारे ते प्रायोगिक शिक्षणतज्ज्ञ होते. म्हणून केवळ शिक्षणसंस्था काढून ते शांत बसले नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिशय सुंदर पाठ्यपुस्तके तयार केली. ही पाठ्यपुस्तके म्हणजेच सहजपाठ आणि हे सहज पाठ म्हणजे त्यांनी बंगालला दिलेली सर्वात मोठी देणगी असे म्हणावे लागेल ! मुळात ' सहजपाठ ' हे नावच किती सुंदर आहे ! सहजपाठ होणारे ते सहज पाठ !
पु ल देशपांडे आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात त्याबद्दल लिहिताना म्हणतात, " रवींद्रनाथांनी हजारो कविता लिहिल्या, नाटके लिहिली, कादंबऱ्या, प्रवासवर्णने' पत्रे, निबंध- खूप काही लिहिले; पण रवींद्रनाथ टागोर या माणसापुढे मी जर मनोमन लोटांगण घातले असेल तर प्राथमिक शाळेची ही पाठ्यपुस्तके रचल्याबद्दल ! ' वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असे केशवसुतांनी म्हटले आहे. पण शैशवाचे स्मरण म्हणजे काय ते टागोरांचे हे सहजपाठ वाचल्यावर कळते. ही पाठ्यपुस्तके म्हणजे रस, रंग, गंध, नाद यांच्या सृष्टीतील आनंददायक सहल आहे. बंगाल्यांच्या गेल्या चार पिढ्या ह्या पाठ्यपुस्तकातून शिकत आहेत. आज देखील सरकार कुठल्याही पक्षाचे असो, पाठ्यपुस्तके गुरुदेवांचीच !
रवींद्रनाथ लहानपणी शाळेत जे शिकले होते ते शिक्षण त्यांना नीरस आणि कंटाळवाणे वाटत होते. आपल्याकडील काय किंवा बंगालमधील काय पाठ्यपुस्तके सदैव उपदेशाचा डोस पाजणारी होती. खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, आळशीपणा करू नये यासारख्या उपदेशात्मक गोष्टी सतत सांगणारी आणि हे करू नको, ते करू नको अशा नकारात्मक गोष्टी सांगणारी पाठ्यपुस्तके अस्तित्वात होती. मुलांच्या बालविश्वाशी अत्यंत विसंगत अशा प्रकारची ही गोष्ट होती.
ढग, पाऊस, फुलपाखरे, नदी, चांदण्या, पाखरे यासारख्या निसर्गाच्या घटकांमध्ये काही सौंदर्य असते आणि त्यातूनही आपली मुले सहजपणे शिकू शकतात याचा गंध ना शाळाखात्याला होता ना शिक्षणतज्ज्ञांना ! खेळ म्हणजे मुलांच्या आवडीची गोष्ट ! दैनंदिन नित्य खेळातून सुद्धा मुले सहजपणे शिकू शकतात याची जाणीव शिक्षणखात्याला कधी झालीच नाही. पण या सगळ्या गोष्टींची दखल रवींद्रनाथांनी घेतली. त्यांच्या या पाठ्यपुस्तकांमुळे प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती झाली. खऱ्या अर्थाने ते ' गुरुदेव ' या उपाधीला पात्र होते.
थोरांची चरित्रे, राष्ट्रप्रेम, सदाचार यासारख्या लहान मुलांच्या वयाला न पेलणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात ठेवल्याच नाहीत. या गोष्टींना त्यांचा विरोध होता अशातला भाग नव्हता. परंतु मुलांना सहजपणे कसे शिकता येईल, त्यांचे शिक्षण आनंददायी कसे होईल यावर त्यांचा भर होता. त्यांनी मुलांचे बालसृष्टीतील मित्र होऊन, त्यांच्या पातळीवर जाऊन या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. या पाठ्यपुस्तकातील एक एक धडा म्हणजे सुंदर शब्दचित्रच आहे ! सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करता करता मुले सहजपणे यातून शिकत जातात आणि आपण काही शिकतो आहोत याची जाणीव न होता सहज शिकत जातात हे या पाठ्यपुस्तकांचे वैशिष्ट्य आहे. यातील पाठ गाता येतात, पाहता येतात, ऐकता येतात आणि अनुभवता येतात.
शांतिनिकेतनमध्ये त्यावेळी प्रख्यात चित्रकार नंदलाल बोस विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवत. त्यांच्या सुंदर चित्रांनी ही पुस्तके नटलेली आहेत. रवींद्रनाथांचे शब्द आणि नंदलाल बोस यांची बोलकी चित्रे यांचा सुरेख संगम या पाठ्यपुस्तकांमध्ये झाला आहे.
पु ल देशपांडे यांनी शांतिनिकेतनमध्ये काही काळ वास्तव्य केले होते. या पुस्तकांबद्दल बोलताना ते म्हणतात, "माझ्या शांतीनिकेतन मधल्या वास्तव्यात या सहजपाठांनी माझे हरवलेले बालपण मला परत आणून दिले. ज्याला म्हणून बंगाली शिकायचे असेल त्याने सहजपाठाचे हे चार भाग पुन्हा पुन्हा वाचावेत. बंगाली भाषेच्या अंगाखांद्यावर खेळल्यासारखे वाटेल. सहजपाठ म्हणजे गुरुदेवांचे बंगालवर असलेले महान उपकार ! "
बंगालमधील खेड्यात राहणारी मुले मुली डोळ्यासमोर ठेवूनच रवींद्रनाथांनी हे सहजपाठ लिहिले. सकाळचे वर्णन ते किती सुंदर करतात ते पहा
आलो हॉय - गॅलॉ भोय, चारी दिक झिक मिक -
( उजेड होतो, भय जाते, चारी बाजूला झुंजूमुंजू होते )
हे सगळे मुले गात गात आनंदाने म्हणू शकतात. सकाळ झाल्यानंतर गावातील माणसे कशी कामाला लागली याचेही चित्र सोप्या शब्दातून ते मुलांसमोर उभं करतात
पाडे पेरू हरी हर
मधू राय बांधे घर
होडी हाके पातू पाल
धान्य आणे जयलाल
धरे सुकाणू दीनानाथ
अविनाश रांधे भात.
आपल्याकडे शाळेतील मुलांना कविता पाठ केल्या की परीक्षेला मार्क मिळतात एवढेच ठाऊक. परंतु त्यातून मिळणाऱ्या आनंदाला ही मुले पारखी होतात. कविता या चालीवर सुंदर गाता येतात, त्या म्हणताना नाचता येते त्या गात गात भाषा शिकता येते, याची जाणीवच आमच्याकडे करून दिली गेली नाही. बंगालमधील मुले खरोखरच भाग्यवान म्हणावी लागतील कारण रवींद्रनाथांनी त्यांना शेकडो सुंदर गाणी रचून दिली. त्या गीतांना सुंदर चाली लावल्या गेल्या. बंगाली माणसाचे बालपण या गीतांनीच समृद्ध झाले.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा